लेखक – जयंत नारळीकर
पुस्तकाचे नाव – यक्षांची देणगी
सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प
निवृत्त होणाऱ्या आपल्या मित्राचा, प्रमोदचा अंतिम कसोटी सामना प्रताप पाहायला गेला होता. पुष्कळ वर्षांनी असा सामना पाहायचा योग आल्याने आणि आपल्या मित्राने कळकळीची विनंती केल्याने प्रतापला जाणे भाग होते.
सामना सुरु झाला आणि काही षटकांनंतर कर्णधाराने प्रमोदला गोलंदाजीसाठी पाचारण केले. क्रिकेटमधील संपूर्ण कारकीर्द उजव्या हाताने गोलंदाजी करणारा प्रमोद आज पहिल्यांदा, त्याच्या कारकिर्दीच्या अंतिम सामन्यात, तसेच निर्णायक सामन्यात डाव्या हाताने गोलंदाजी करत होता आणि तशी त्याने आपल्या कर्णधाराला त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण करण्यास सांगितले. कर्णधार भंडारीला प्रमोदच्या या आयत्यावेळी सुचलेल्या प्रयोगाबद्दल विचित्र वाटलं पण एकदा गोलंदाजी दिली असताना परत काढून घेऊ शकत नाही त्यामुळे हे षटक पूर्ण कर अशी भंडारीने प्रमोदला सूचना दिली.
प्रमोदच्या षटकाला सुरुवात झाली आणि त्याच्या पहिल्याच चेंडूने विरोधी टीममधील फलंदाजाला बाद केले. या अनपेक्षित बदलामुळे आणि घडलेल्या घटनेमुळे विरोधी टीम आश्चर्यचकित झाली. पुढले दोन तीन चेंडू कसेबसे खेळत, प्रमोदने षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विरोधी टीमच्या कर्णधाराला बाद केले. संपूर्ण सामन्यात प्रमोदच्या गोलंदाजीची पृथक्करण आश्चर्यकारक होते कारण दोन्ही डावात प्रमोदनेच सर्व खेळाडूंना बाद केले होते. या अभूतपूर्व खेळामुळे अभिनंदन करणाऱ्या प्रेक्षकांपासून बचाव करण्यासाठी प्रमोदला पोलीस एस्कॉर्ट देण्यात आला आणि प्रमोद मैदानाबाहेर उभ्या असलेल्या अँब्युलन्समधून पसार झाला आणि संपूर्ण एक आठवडा तो कुठे होता याचा पत्ता कुणाला ठाऊक नव्हता. त्या आठवड्यानंतर तो पोलिस स्टेशनवर हजर झाला तेव्हा तो स्वतः कुठे होता, आपण काय पराक्रम केलेत त्याची त्याला जरासुद्धा माहिती नव्ह्ती.
त्यानंतर काही महिन्यांनी प्रतापला त्याच्या दुसऱ्या मित्राचा, संजूचा फोन आला आणि घरी मला भेटण्यासाठी तो येणार असल्याचे कळविले. डिफेन्स लॅबोरेटरी मध्ये तो खूप वर्षे गुप्त संशोधन कार्यात व्यस्त होता. घरी आल्यानंतर, इथल्या तिथल्या चर्चा केल्यानंतर प्रतापच्या मुलाने दिलेल्या पुस्तकावर त्याची स्वाक्षरी मागितली. संजूने स्वाक्षरी देण्यास नकार दिला आणि ते प्रतापला खटकलं पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर ते दोघे स्टडीरुममध्ये गेलो. संजूने प्रतापला त्याच्या कामाबद्दल सांगायला सुरुवात केली आणि तितक्यात त्याने त्याच्याजवळ असलेली गणपतीची लहान अशी प्रतिमा प्रतापला दाखविली. त्या प्रतिमेचे वैशिष्ट्य म्हणजे तो गणपती उजव्या सोंडेचा होता. ती प्रतिमा प्रतापला देत संजू म्हणाला की, हे तुझ्या संग्रहालयासाठी आहे. प्रतापला त्याची ती उदारता बघून भरून आलं. त्याने संजूला विचारले की ही प्रतिमा त्याच्याजवळ कशी आली? तर त्याने प्रतापला सांगण्यास कबूल केले आणि याबाबत गुप्तता ठेवावी अशी सूचनादेखील केली आणि या प्रकारात प्रमोदच्या पराक्रमाशीसुद्धा संबंध आहे असे संजूने सांगितले.
संजूने सर्वप्रथम प्रतापला त्याच्या प्रयोगाबद्दल सांगितले, त्याने केलेल्या सरकारी जागेसाठी अर्जाबद्दल सांगितले. ऑफिसच्या कामानंतर संजू कसा स्वतःच्या प्रयोगांवर काम करत होता त्याबद्दल त्याने सांगितले. गुरुत्वाकर्षण आणि मूलकण यांच्याविषयी त्याला संशोधन करायचं होतं. मोबियसच्या पट्ट्याबद्दल त्याने मला काही प्रयोग करून दाखवले. एक साधा चामडी पट्टा घेतला आणि त्यावर छोटे मनुष्याकृती जीव सोडले तर तो त्या सरळ पट्ट्यावर कितीतरी वेळा चालला तरी तो डावरा तो डावरा किंवा उजवा तो उजवाच राहणार, परंतु मोबियसच्या पट्टीवर म्हणजे त्या पट्ट्याला समजा पीळ दिला तर डावा हात उजवा झालेला असेल. विशिष्ट प्रकारचा पीळ असलेल्या अवकाशातून चक्कर मारून आल्यावर कुठल्याही वस्तुचे तिच्या प्रतिबिंबात रूपांतर होईल. पण असा खरा पीळ निर्माण करता येईल का? काही विशिष्ट मूलकणांमध्ये फिरकीसारखे काही आंतरिक गुण असतात आणि अशा विशिष्ट तऱ्हेची फिरकी असलेले मूलकण अवकाशात सोडले तर पीळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
संजूने त्याच्या प्रयोगशाळेत हा प्रयोग करून पाहिला. त्यासाठी त्यानं त्याचं मनगटी घड्याळ वापरलं. त्याचं प्रतिबिंबात रूपांतर होताना काही बदल होतो का ते पाहिलं. पण त्याच्या कालमानात काही फरक पडला नाही. काही दिवसांनी बरेच प्रयोग केल्यानंतर संजूने तो प्रयोग स्वतःवर करून बघितला. कसल्याही वेदना न होता स्वतः स्वतःच्याच प्रतिबिंबात रूपांतर झालं पण त्यामुळे त्याला काही वाचता येईना कारण सर्व अक्षरं उलटी दिसत होती. त्याच्यात झालेले बदल त्याने नोंद करून घेतले आणि परत तो त्या झोतात शिरला आणि बाहेर पूर्ववत झाला. पण बाहेर आल्यावर संजूची उलटेपणातली सर्व स्मृती नष्ट झाली होती. प्रतिबिंबात्मक अवस्थेत त्याने काय केलं तेच आठवत नव्हतं.
संजूने नंतर प्रतापला प्रमोदबद्दल सांगितले. सामन्याच्या आदल्या दिवशी प्रमोद संजूकडे उदास मनःस्थितीत आला होता. अंतिम सामना असल्याने दडपण होतं. आणि त्यामुळे संजूने प्रमोदवर केलेला प्रयोग आणि त्यामुळे प्रमोदने केलेला विक्रम तसेच संग्रहालयातील डाव्या सोंडेचा गणपती लंपास करून उजव्या सोंडेचा केल्याबद्दलची कबुली संजूने दिली.
काही दिवसांनी डिफेन्स लॅबोरेटरीमध्ये अत्यंत दुर्मिळ अशा धातूची चोरी झाली. तो धातू ज्या सेफमध्ये ठेवला होता त्याचे कॉम्बिनेशन फक्त तेथील संशोधकांना माहित होते. पण मला संशय होता की ही चोरी संजूनेच केली कारण स्वतःच्या प्रतिबिंबाच वापर करून स्वतःचे ठसे तसेच ठेऊन कोणी चोर अशी उपयुक्त माहिती पोलिसांना ठेऊन जात नाही.
भरपूर वशिला लावून प्रतापने या प्रकरणाचा छडा लावला आणि त्याला जे वाटत होते तेच घडले. संजू प्रयोग करत असताना मोठा स्फोट झाला आणि त्याच्या सर्व सामग्रीच्या ठिकऱ्या उडाल्या त्यात संजू बचावला पण महिनाभर बेशुद्ध होता. प्रतिबिंबातून परत येताना स्मरणशक्ती शाबूत राहावी हे ध्येय गाठताना तो आपली संपूर्ण स्मरणशक्ती गमावून बसला होता. पण त्याने किती महत्वाचा शोध लावला हे त्याच्या लक्षात नव्हते.