एक नवी पहाट हवीहवीशी..

sunrise and woman

लघुकथा / माधुरी महेश खेडकर /

“अभय… चहा…” मानसीची चाहूल जाणवली, तसा तिच्या हातातील चहाचा कप घेऊन, अभय पुन्हा पेपरमध्ये गर्क झाला. जवळजवळ आठ-दहा दिवसांनी तो घरी आला होता आणि हे नेहमीचेच झाले होते. कधी थोड्या तर कधी जास्त दिवसांसाठी.. कधी भारतात तर कधी भारताबाहेर…
“मला दुपारी ऑफिसमध्ये मीटिंग आहे. मी जेऊनच जाईन.” अभयन सांगितले आणि टीव्ही सुरू केला.
“आई मी चालले.. तू केव्हा चालली आहेस डॉक्टरांना भेटायला? बाबा येणार आहेत बरोबर?” “अगं नीलू कसं सुरू आहे कॉलेज..?” बाबांच्या प्रश्नांनी नीलूच्या प्रश्नांची गाडी थांबली. “मजेत.. तुम्हाला माहित आहे बाबा, काल प्रॅक्टिकलला काय मज्जा आली…” बाबांच्या बाजूला बसून नीलूची बडबड सुरू झाली. पण अभयचं लक्ष मात्र….. अगदी आईच्या रूपाचे प्रतिबिंब मुलीत पडलं होतं जणू. उजळ कांती.. मस्त उंच बांधा.. हट्टानं वाढविलेले लांब केस.. फक्त डोळे मात्र आपल्यावर गेलेत. वीस-बावीस वर्षांपूर्वी मनूसुध्दा अशीच दिसायची… मनू!! अभय थोडा दचकलाच.. कारण हे नाव मनात कुठेतरी हरवूनच गेलं होतं. आज अचानकपणे असं…
त्यानं मानसीकडे बघितले.. कित्येक दिवसांनी… अगदी लक्षपूर्वक… चेहरा ओढल्यासारखा वाटत होता. आणि… बरंच काही सोसल्यावर येणारी अलिप्तता चेहऱ्यावर ठळक दिसून येत होती.

मायलेकींची कुजबुज चालली होती. “ममा, तू सांगितलंस बाबांना?”
“अगं नको.. तुला उशीर होतोय तू निघ. मी जाऊन येईन नंतर. आणि बाबांशीही बोलेन सगळं..”
पण तू एकटी जाऊ नकोस. परवा किती त्रास झाला तुला. मी आणि निखिल घाबरुनच गेलो होतो. नशीब डॉक्टर लवकर आले घरी. बघ बाबांना यायला जमणार असेल तर.. नाहीतर मला कॉल कर.. मी निघते आता”

टेबलवरच मोबाईल विसरून.. फोन कर असे सांगणाऱ्या लेकीकडे बघताना मानसीला वाटले किती जबाबदारीनं वागतेय ही..
“निखिल येईल इतक्यात क्लासवरून.. त्याच्याबरोबर बसताय जेवायला?”
“ठीक आहे.” दुसरं चॅनेल लावत अभय म्हणाला.
“आज चार वाजता डॉक्टर गोखल्यांनी बोलावलंय”
“मग…? जाऊन ये. नाहीतरी मला यायला उशीरच होणार ऑफिसहून. त्यामुळे मला जमणार नाही यायला.”
हे सारे अपेक्षितच असल्याने मानसीनं आपले केस पेपर अभयला दिले. त्याने ते घेतले पण टीव्ही वर महत्त्वाची बातमी लागल्यानं त्याचं लक्ष तिकडे गेलं. मानसी उठून अंघोळीला गेली.

“बाबा आज काय मस्त टेस्ट झाली. फक्त एक स्टेप विसरलो.. दोन मार्क्स उडाले.. नाहीतर पूर्ण ३० मार्क्स हातात होते..”
पायातले बूट काढता काढता निखिल सांगत होता, आणि मिळालेल्या पेक्षा गमावलेल्या गुणांनबद्दल बाबांची ओरड कशी ऐकू आली नाही म्हणून त्याने बघितले, तर….
“निखिल या टेस्ट आधीच्या?”

“परवाच्या… त्या रात्री आई माझ्याबरोबर रोजाच्यासरखी बसली होती. तशी ती नेहमी मला कंपनी देते अभ्यासाला. पण त्या रात्री एक नंतर तिच्या पोटात खूप दुखायला लागले. इतकं की नीलूनं शेजारच्या डॉक्टर गोखल्यांना बोलावलं. त्यांनी पेनकिलर दिल्यावर जरा बरं वाटलं ममाला. नंतर काही तपासण्या सांगितल्या आहेत. आज बोलावलंय.”

“अरे मला काहीच कळवल नाही तुम्ही…”
“तुम्ही टेन्शन घ्याल म्हणून आईच नको म्हणाली.”
अभयला एकदम वाटलं.. का एवढ सगळं ही एकटी सहन करते? त्या दिवशी सकाळी कॉलवर काही बोलली ही नाही. अगोदर प्रत्येक गोष्टीसाठी हट्ट करायची… माझी सोबत हवी म्हणून भांडायाचीसुध्दा… पण आता…
“एवढा त्रास झाला, का नाही सांगितलंस?”
“तुम्ही एवढ्या लांब.. उगाच काळजी वाटत राहिली असती तुम्हाला. इथे मुलं होती बरोबर..”
“मानसी आठवण नाही आली माझी?”

मानसीने त्याच्याकडे फक्त बघितलं… गढूळलेल्या तिच्या डोळ्यात त्याला दिसले असे काही क्षण… जेव्हा फक्त आणि फक्त अभयच्या सोबतीची गरज होती. नीलूचं बाळंतपण.. निखिलच्या वेळच अवघड गरोदरपण… नंतरसुध्दा मुलांना वाढवताना… आईचं शेवटचं आजारपण निभावताना… कुठेतरी तिला माझी साथ हवी होती… मानसिक बळ हवं होत.. पण माझे दुर्लक्ष… कुठेतरी काहीतरी बिनसत गेलं. तिचं माझ्यावरचं प्रेम फक्त एक स्वार्थ आहे.. असा विचार.. अविश्वास… दोघांच्या मनात कधी दरी निर्माण करून गेला कळलेच नाही…

सुरुवातीला आपल्या प्रत्येक कामात मदत करणारी.. माझ्या जबाबदाऱ्या स्वतः हसत हसत पार पाडणारी.. माझ्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध पेटणारी.. माझं प्रेम… लक्ष कमी होतंय म्हणून वाद घालणारी… शब्दाला शब्द वाढत जायचा… मग हळू हळू मुलांसाठी ते ही कमी झाले. एकमेकांचे मान जपण्यात मनू कुठेतरी नकळत हरवून गेली आणि तिच्या ‘अभी’ ह्या गोड हाकेची साद विरून जाऊन ‘अहो’नं जागा घेतली…… अनेक क्षण, झर्रकन डोळ्यासमोरून गेले. अभयनी मीटिंग पुढे ढकलली आणि तो तिच्या सोबत..
दुसऱ्या दिवशी संध्याकाळची ऑपरेशन ची वेळ ठरवली गेली. कारण आधीच उशीर झाला होता. काळजीचं कारण नव्हतं… कारण सुसज्ज हॉस्पिटल… मोठे डॉक्टर… पण तरीही अभयच्या मनातील अस्वस्थता…

रात्री हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायला सांगितले होते. थोडे उशिरा येऊ असे सांगून दोघे परतले. येताना मानसीने चार-पाच दिवस पुरेल इतकी भाजी फळं घेतली. तिथेही प्रत्येकाची आवड… स्वतःसाठी हर्बल शॅम्पूची बाटली तिने उचलली…पण ‘किती महाग’ असे म्हणून ठेऊन दिली. ‘अगं असुदे, घे ना..’ असे अभय ने म्हणताच, ‘ऑपरेशन नंतर’ असे म्हणून ती बाहेर आली.

नीलूला घराची जबबदारी माहित होती म्हणून काळजी नव्हती, पण घरातून निघताना देवासमोर हात जोडताना मानसी थोडीशी आतून हाललीच… तिच्या हातात दही देत नीलू म्हणाली, “आई अगं.. चार दिवसांची तर बाब आहे. एवढी हळवी नको होऊ. सगळं छान होणार आहे. cool ga.”
फॉर्म भरून दोघेही रूमवर आले. संधिप्रकाश पसरलेला.. गार वारे वाहत होते.. ती कॉटवर बसली. बाजूला कोचवर तो. दोघांमधली जाणवणारी शांतता!! रात्री इथेच थांबावं.. की.. हिला आवडेल का? तो थोडा अवघडलाच.

“तुम्ही घरी जा आता. जेवायला उशीर झाला की त्रास होईल.. आणि इथे झोप ही होणार नाही तुमची.” काही न सुचून अभय घरी आला. पण रात्र मात्र कूस बदलण्यात गेली.
सकाळी लवकरच तो हॉस्पिटलला निघाला. सोबत तिची आवडती कॉफी आणि निशिगंधाची फुले!! खोलीत पोहोचला तर मानसी खिडकीजवळ उभी होती. लांबसडक केस विंचरत..तेवढ्यात आलेल्या सिस्टरनी चेष्टा केलीच… “काय मॅडम, कुणासाठी जपलेत एवढे लांब केस?”
मानसीची नजर अभयकडे गेली. नकळत गालावर हसू उमटलं. नव्या नवलाईचे दिवस आठवले तिला. नहालेल्या ओल्या केसांच्या गंधांन वेडवणारा तो… केस कधीही न कापण्याची शपथ घालणारा तो…

बघता बघता वेळ पुढे सरकत होती. संध्याकाळी सातचं ऑपरेशन. तिला थोडा त्रास होत होता.. बोलत नव्हती पण जाणवत होता. दोघांना जाणवणारा कमालीचा ताण!!!! ही अबोल शांतता… जणू आधी कित्येक वर्षे सारं काही बोलून संपल्यासारखं…
“मला काही बोलायचंय…”
“बोल ना..” अभय जणू तिच्या शब्दांची वाटच बघत होता.

कित्येक वर्षांपसून गप्पा मारणं, एकत्र बाहेर फिरणं… एकमेकांसाठी वेळ काढणं विसरूनच गेलो आपण. तिचा हट्ट कुठेतरी विरून गेला होता… सोयीस्करपणे तिच्याकडे झालेलं दुर्लक्ष…. कामासाठी, स्वतःसाठी मिळालेला वेळ छान वाटायचा. पण आता जाणवणारी ही रिकाम पोकळी भयाण वाटत होती. ज्या व्यक्तीबरोबर एवढी वर्ष संसार केला …तिच्याशी बोलताना असे शब्दच हरवून जावेत?

“अभय आज पहिल्यांदा तुम्ही मला असं पाहताय. अचानकपणे हे सारं तुमच्यासमोर आलंय. डॉक्टरने सांगितलंय ९९% काहीच प्रॉब्लेम येणार नाही. पण मी राहिलेल्या १% चा विचार करतेय. सगळं नीट व्हावं म्हणून देवासमोर हात जोडलेत पण तुमची अस्वस्थता जाणवतेय म्हणून सांगते…. कालपासून तुम्ही सतत बरोबर आहात, तुमच्या चेहऱ्यावर जाणवणारी काळजी पाहून इतक्या वर्षांचा मनातला सल निघून गेला. शून्यातून जग निर्माण करायचं होत तुम्हाला. एकमेकांच्या साथीने घेतलेले निर्णय, तुमचे कष्ट, मुलांनी त्याचं केलेलं चीज.. तुम्ही आज ज्या उंचीवर पोहोचलात त्याचा सार्थ अभिमान आहे मला पण….. शून्यातून जग निर्माण करताना, आपल्या दोघांसमोर एक मोठ्ठं शुन्य कधी निर्माण झाले तेच कळले नाही आपल्याला… वाटलं होत फक्तं मुलांसाठी जगतेय… आपल्या दोघांचे भावविश्व कधीच संपून गेलंय… माझा आनंद, माझं हसू त्याबरोबर हरवून गेलंय… पण, ‘अभी’ आज तुझ्या डोळ्यातले भाव बघितले आणि…. आणि… जगण्याची नवी उभारी मिळाली मनाला!! तू सोबत आहेस हा एकच दिलासा पुरे आहे जगण्याला…”

डोळ्यात आलेले अश्रू त्याला परतवावेसे वाटले नाहीत. किती सहजपणे तिने आजही त्याचे मन वाचले होते. त्याच्या प्रत्येक उपेक्षांना हळुवार पुसले होते, ते ही कुठेही त्याला दोष न देता…. त्याच्या दोन क्षणाच्या प्रेमळ सहवासावर जग जिंकण्याचं बळ ती त्यालाच देत होती… निश्चयानं आश्वासत होती, की मी नाही अशी अर्धवट साथ सोडणार… तुला नाही कधी एकटं पाडणार…

भरल्या डोळ्यांनी मनू अभीच्या कुशीत शिरली. इतक्या वर्षांचा दुरावा दूर होताना तिचं मन मात्र म्हणत होतं.

श्रावण सरी ओघळतात,
तशा आठवणी बरसतात..
तुझी साथ…तुझी सोबत..
मन माझे भिजवत राहतात!!!! 

मावळतीचा सूर्य अलगद हसला…सकाळच्या कोवळ्या किरणांचं आश्वासन देत त्याने हळुवार निरोप घेतला…

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here