लॉकडाऊन मधली चंपी!!

0
588

– ओंकार परांजपे / लघुकथा /

ऑफिसच्या एका ई-मेलला रिप्लाय करून लॅपटॉप बंद करणार इतक्यात हिचा मागून आवाज आला, “डोक्यावर केवढं जंगल झालंय ते! अजून असं काही दिवस ठेवलंस तर चिमण्या घरटं बांधून राहतील त्यामध्ये!!” छान! म्हणजे निदान त्या चिमण्यांना तरी माझ्या अस्वच्छतेची किळस येणार नाही असं वाटतंय तुला, असा एक बाउन्सर माझ्या जिभेच्या टोकावर आला होता, पण गेल्या १-२ तासांत हवामानाची काही कल्पना नसल्यामुळे आणि पुढचे २ तास हिचे यॉर्कर्स खाण्याच्या भीतीने, जिभेच्या टोकावर आलेला बाउन्सर मी गपगुमान गिळून टाकला!  गेल्या १-२ वर्षांपासून माझ्या बाऊन्सर्सचा इतका काही प्रभाव पडत नाही, ती गोष्ट वेगळी ! पण असो, तर विषय होता माझ्या डोक्यावरचं जंगल! आणि तिचं पण काही चुकीचं नव्हतं, आता गेल्या ६-७ महिन्यात हजामतीसाठी जाणं झालंच नसल्यामुळे, खरीप म्हणू नका, रब्बी म्हणू नका, सगळ्या हंगामातली पिकं डोकयावर उगवली होती! आणि “आज मात्रं मी तुझे केस कापणार आहे”, हे सरळ सोपं वाक्य हिने मला जंगल, चिमण्या इत्यादी इत्यादी उल्लेख करून ऐकवले होते! नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता, कारण प्रस्ताव २-३ वेळा नाकारला गेला होता, आता महाविकास आघाडी करायची तर काहीतरी गमवावं लागणारच की, माझ्या तोंडून आपसूकच हो निघून गेलं आणि मला त्वरित पेपर मांडून खाली बसायला सांगितलं गेलं! 

आता माझी अवस्था पुलंनी रेखाटलेल्या बोकडासारखी झाली ! म्हणजे मालकाने बोकडाला सांगितले की मी लवकरच तुझ्या मानेवरून सूरी फिरवणार आहे, तर जितक्या उत्साहाने बोकड जाईल, तितक्याच उत्साहात मी पुढे सरसावलो ! प्रथमतः माझे डोके बेसिन च्या नळाखाली धरण्यात आले! बाजारातून आणलेले बटाटे, उकडायला ठेवण्यापूर्वी मी असेच पाण्याखाली धुऊन घेतो! “काय रे मद्दड, तुझ्या डोक्यात कांदे-बटाटे भरले आहेत का!” ही उक्ती लहानपणापासून अगदी सर्वांकडून ऐकत आलोय आणि इथे जणू काही ते खरंच आहे असं ही पटवून देते आहे की काय असा विचार मनाला चाटून गेला! केस ओले चिंब करून मला खुर्चीवर बसवण्यात आलं आणि ही कंगवा आणि कात्रीकडे वळली. ते ओले चिंब केस, केसावरुन टप टप ओहोळणारं पाणी, माझी तिथे एक मिनी अंघोळ चालू झाली! आता हिला म्हणावं की टॉवेल दे, तर ही बिझी आणि मी जावं तर “२ मिनिटं बसता पण नाही येत एका जागेवर, राहू देत केस थोडा वेळ ओले”, असा हिचा सूर! मग अशा वेळी प्रत्येक हजरजबाबी नवरा करेल, तेच मी केलं, शांतपणे तिथेच बसून राहिलो! इतक्यात मॅडम सगळी अवजारं घेऊन हजर झाल्या आणि माझी मान ४७ अंशांनी कुठे तरी वळवली! कुठे तरी म्हणण्याचे कारण असे, कारण अजूनपर्यंत मला थांगपत्ता लागलेला नाही कि ती मान नक्की कुठल्या अंशात वळली होती ! पण उजव्या डोळ्याच्या पट्टीत कुठेतरी पश्चिमेच्या प्रवासाला निघालेला सूर्य मला दिसत होता, म्हणजे मान बहुदा आग्नेयेकडे झुकलेली असावी! आता काहीही विचार न करता मी त्या पाण्याखाली धुतलेल्या बटाट्यासारखे बसायचे ठरवले होते! “जो होगा देखा जायेगा” अशा निर्णयावर मी पोहोचलो होतो! पण तरीही मनाला चिंता वाटतच होती ! वरून कट कट असा आवाज येत होता, म्हणजे केस कापले जातायत हे कळात होतं पण कसे ते ईश्वर जाणे! एका बाजूला कर्तन चालू होते, तिला थोडं प्रोत्साहन म्हणून बोललो अजून काप, तर तिने एका साईड चे कल्ले छाटून टाकले ! आता एका साईड चे चुकून कापले म्हणून दुसऱ्या साइड चे झक मारत कापावे लागले !

तेव्हा खरं तर मला तुळतुळीत टक्कल असलेल्या लोकांचा इतका हेवा वाटला! मनात आलं की आत्ता, डोक्यावर बोडका डोंगर धारण करणारे महाभाग दुनियेला म्हणत असतील की घ्या नेहमी आम्हाला चिडवता ना, आम्ही या उपद्व्यापातून तरी सुटलो बुवा या लॉकडाऊनमध्ये ! खरं आहे राव, आता टक्कल असतं तर किती बरं झालं असतं, असा विचार आला पण भीतीने तो पण पळून गेला ! अहो टकल्याची भीती नाही. मला डोकयावर हे लटांबर परिधान करायला अजिबात आवडत नाही, पण अहो लग्नानंतर कसली आवड आणि कसलं काय! वरून ऑर्डर आलेली असते की डोकं पूर्ण भादरलं, तर घरातच घेणार नाही! त्यामुळे मग, केस कसे कापायचे आहेत, याच्या इंट्रकशन्स मला ही लिहून देते आणि त्या इंस्ट्रकशन्स मी न्हाव्याला देतो! थोडी जरी चूक झाली, तर पुढचे २ महिने तुझ्याकडे राहायला येईन अशी वर दमदाटी करून घेतो! आजपर्यंत म्हणा त्या न्हाव्याने काही चूक केली नाहीये (भाग्यच तिचं ! म्हणजे न्हावी तो नसून ती आहे)
आता इथे बसून बसून कंटाळा आल्यामुळे, आमच्या शरीराचा अजिबात न थकणारा अवयव सुरु झाला ! तो अवयव म्हणजे तोंड ! माझ्या अखंड बडबडीला कंटाळून ही म्हणाली, “बोलू नकोस, विडिओमध्ये सांगितलेलं मी विसरले”. माझं असं झालं की म्हणजे गेल्या १५ निनिटांत डोक्यावर काय झालं आहे! दिसण्याचा काही वाव नव्हता कारण आरसा मुद्दामून माझ्या समोर ठेवला नव्हता! तेवढ्यात हिने काहीतरी व्हिडिओची रिविजन केली आणि माझी मान आग्नेयेकडून नैऋत्येकडे वळली, तिथे पण पुढची ५ मिनिटे काहीतरी खुट खुट झाली आणि ही एकदम म्हणाली “मी पटकन नाईफ घेऊन आले “, नाईफ म्हटल्याबरोबर माझ्या डोळ्यासमोर एकाच वेळेला बोकड आणि काजवे चमकले आणि मी बैठकीवरून ताडकन उठलो, आणि घाबरून पळत सुटलो! पळता पळता अचानक आरशासमोर आलो तर अरे देवा! मला माझे अर्धे भादरलेले डोके दिसले! ते पाहून रस्त्यातली लहान मुलं घाबरून पळाली असती! काही कारणास्तव पोलिसाने पकडले असतेच, तर पहिले डोक्यावरचं नक्षीकाम बघून वेगळा आकार लावला असता! “अगं , काय गं हे, काय झालंय हे!! मी माझ ओळखपत्र कुठे घेऊन गेलो तर मला कोणी ओळखणार पण नाही, आता काय करायचं!!” “ही कात्री ना एकदम बेकार आहे, पुढच्या वेळेला आणताना नीट बघून आण, चुकीची कात्री घेऊन तूच चुकी केलीस” (मनात म्हटलं, तिच्यामारी कात्री घेतली तेव्हा काय हे माहित होत, की २ वर्षांनी कोरोना येणार आहे आणि तेव्हा ही कात्री घेऊन तू माझ्या डोकयावर नक्षी काम करणार आहेस!!)

“अगं, पण आता काय करू!! असा बाहेर कसा जाऊ!” “जळलं मेलं लक्षण त्या कात्रीचं, दे तो हेअर रेझर, डोक्यावरून फिरवते आणि उरले सुरले केस पण कापून टाकते, नाहीतरी तुला तेच हवं असतं, घेऊन बस तुझं टक्कल तुझ्याकडे” माझ्या मनात जोरजोरात बेंडबाजा वाजत होता काय सांगू तुम्हाला! आता बऱ्याच वर्षांनी पूर्ण रान मोकळं, वा रे वा गड्या !!  मी उगीच चेहरा जितका सुन्न वगैरे ठेवता येईल त्या स्वरात म्हटले “अगं ठीक आहे, राहू देत की अशीच हेअर स्टाईल, काय फरक पडतोय” असं बोलून एकदम जीभ चावली, म्हटलं चुकून हो म्हणाली, तर ही नक्षी घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल! साहेब, नको तिथे तोंड उघडू नका ! पण एक नाही ना दोन नाही, ही इतकी त्या कात्रीवर चिडलेली होती की तिने अक्षरशः पुढच्या ५ मिनिटात झाड तर सोडा साधं रोपटं पण डोक्यावर ठेवलं नाही ! आज दूध आणायला बाहेर पडलो तर समोरचा बोडका डोंगर सुद्धा माझ्याकडे बघून हसला! बहुतेक त्याला त्याच्याच पठडीतला एक सवंगडी मिळाला !! आणि हो, हिच्याकडून टक्कल करवून घेऊन मी अजून घरीच आहे बरं का ! म्हणजे अजून तरी हिने मला घराबाहेर काढलेले नाही!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here