जांभळ्या समुद्राची गोष्ट

0
676

– मेघना अभ्यंकर / लघुकथा /

मध्यंतरी घरी आले तेव्हा आई म्हणाली, “तुला ती बयो माहिती आहे ना? आपल्या समोर राहायची ती, ती गेली अगं! “गेली म्हणजे गेली?” मी वर आकाशाकडे बोट करत विचारलं. आई हो म्हणली. “बिचारी…” असं मी म्हणाले आणि हा विषय तिथंच थांबला. कारण बयोशी काही आमच्या कुणाचं फार सख्य नव्हतं. आमच्या घरा समोरच्या घरात ती राहायची, पण मुळात समोरच्यांशीच आमचं फार काही बोलणं व्हायचं नाही त्यामुळे बयोशी पण काही फार संबंध नव्हताच. गावातलं कुणीही गेल्यानंतर जेवढी आणि जितकी हळहळ व्यक्त व्हायला हवी तेवढीच माझ्याही घरातल्या सर्वांना झाली होती.. आजीला जरा जास्त वाईट वाटलं होतं पण त्याचं कारण म्हणजे बयो काही समोरच्या घरातल्यांची मुलगी नव्हती ती त्यांच्याकडे आश्रित म्हणून तरी राहत होती किंवा कोणीतरी तिला, ती अनाथ आहे म्हणून सांभाळ करायला आणलं होतं, कारण जसा बाकीच्या कोणाशी बयोचा संबंध नव्हता तसा तीच्या घरच्यांशीही तिचा फार काही संबंध, जिव्हाळा आहे असं वाटायचं नाही, ती फक्त तिथे राहते असं वाटायचं ती तिथली आहे असं कधी वाटलं नाही.

आईने बयोचा विषय सांगितल्यानंतर, थोडाकाळ का होईना पण बयो माझ्या डोक्यात तरळत राहिली. तसं तिच्याविषयी लक्षात याव्यात अशा माझ्याकडे काही फार आठवणी नव्हत्या. पण एकदा कधीतरी मी ८-९ वर्षांची असेन तेव्हा शेतात जाण्यासाठी मी रडत होते आणि मला घेऊन जायला कुणी नव्हतं तेव्हा बयो आईला म्हणाली होती, “वहिनी मी घेऊन जाते तिला.” आणि मग बयो आणि मी सरळ रस्याने जायच्याऐवजी रानातल्या रस्त्याने शेताकडे निघालो होतो. लहानपणी ती कधी घरी आली तर आजी जरा अधिक प्रेमळपणे तिची चौकशी करायची, “जेवलीस का?” वगैरे विचारायची, अगदी न चुकता तिच्या हातावर काहीतरी ठेवायची, आणि बयो परत गेली की म्हणायची, “अनाथ आहे गं पोरगी बिचारी, वाईट वाटतं”, आजीचा हा बयोविषयीचा चांगुलपणा मी लहान असले तरी माझ्या चांगला लक्षात आला होता कारण बाकी आल्या-गेलेल्यांबरोबर आजी खूप कामापुरतं वागायची, आणि बयोबरोबरचं हे वागणं ती अनाथ आहे म्हणुन आहे हे ही मला समजलं होतं, त्यामुळे मी आजीला विचारलं, “आजी, अनाथ म्हणजे काय गं”, आजी म्हणाली होती, “ज्यांना आई-वडील नसतात ते.” “आई-वडील नसतात ते म्हणजे?, कुठे जातात त्यांचे आई-वडील, आणि परत येतचं नाहीत कि काय?”

त्या दिवशी तिच्याबरोबर तिचा हात धरुन चालताना मी तोंड उघडून विचारलेला पहिला प्रश्न हाच होता, बयो तुझे आई-बाबा देवाघरी गेले का गं, मग तुला त्यांची आठवण नाही येत? मी वर मान करुन बयोचा चेहरा पाहिला मला वाटलं आता तिला रडायला येईल, पण तसं काहीच झालं नाही, ती म्हणाली, “नाही, मला आठवत पण नाही ते कसे दिसायचे, कसे असायचे, मला फक्त त्यांच्या सोबत असतानाच्या भावना आठवतात त्या घटना नाहीत.” मला काहीही समजलं नाहीये असं बघून बयोने माझा गालगुच्चा घेतला आणि म्हणाली, “म्हणजे बघ तुला गोळा आवडतो की नाही, उद्या तू कितीही मोठी झालीस तरी पहिल्यांदा जेव्हा तो लाल-लाल गारे गार गोळा तू तुझ्या तोंडापर्यंत नेलास आणि सुर्रररररररर….. असा चोखलास तेव्हा डोळेबंद करुन तुला जे वाटलं होतं आणि पोटात गोळा जाताना घशापासून ते पोटापर्यंत जो गारवा तयार झाला होता तो तू विसरशील का? हो की नाही? पण हेच तो गोळा देणारा गोळेवाला कोण होता, तो दिवस कोणता होता, तुझे कपडे काय होते हे तुला आठवेल का? नाही….. तसंच आहे माझं. पण मला हुरडा खाताना बाबांनी दिलेला तो ज्वारीच्या कणसापासून बनलेला चमचा आठवतो, दह्यात कालवलेला हुरड्यामध्ये मस्तपैकी तो चमचा घोळतोय आणि त्या चमच्याला लागलेला तो दही, लसुणीची तिखट चटणी असलेला हुर्डा, मी मस्त चोखून चोखून खातीय.. सगळ्यांना साधे चमचे पण मला मात्र स्पेशल चमचा असल्यामुळे मला खूप स्पेशल वाटतंय, हे माझ्या लक्षात आहे, पण तो चमचा सोडून मला काही आठवत नाही… तसंच एकदा जत्रेत मी बाबांच्या खांद्यावर बसले होते आणि कोणा फुगेवाल्याच्या हातून सगळे फुगे सुटले होते तेव्हा आकाशभर झालेले ते रंगेबीरंगी फुगे मला आठवतात पण ज्यांच्या खांद्याबर बसले होते ते बाबा आठवत नाहीत, मागून चालणारी आई… कोणी.. कोणी आठवत नाही…”

बयो शांत झाली.. मध्ये शेतात पोहोचेपर्यंत कोणीच काही बोलंल नाही. खरंतर मी कोणालाच माझी स्वप्न सांगायचे नाही… म्हणजे शाळेतल्या माझ्या एका बेस्ट फ्रेंडला सोडून हं.. पण सुट्टी चालू होती ना… मग दररोज मी माझी स्वप्न लिहून ठेवायचे आणि एकदा का शाळा सुरु झाली की मग मी तिला दररोजच्या सुट्टीत एक याप्रमाणे स्वप्न सांगणार होते.. पण आत्ता बयो ने मला जे काही सांगितले होते त्यामुळे ती मला जरा जवळची वाटायला लागली होती… शिवाय मला काही न बोलता बसून राहणं फार बोअर होतं.. म्हणून मी तिला म्हणलं, “बयो, तुला मला आज पडलेलं स्वप्न सांगू? आज किनई मी आणि अजून एक गोरापान मुलगा एका जांभळ्या समुद्राच्या किनारी उभे होतो.. आणि तो समुद्र क्षणात बर्फ आणि क्षणात पाणी होत होता… तो बर्फ झाला की एक मोठा जांभळ्या रंगाचा गोळा वाटत होता… आम्ही एका दगडावर बसलो होतो आणि अचानक बर्फाचं पाणी झालं आणि त्यात तो मुलगा वाहून जायला लागला पण मग मी त्याला वाचवलं.. तुला माहिती आहे त्याने मला घाबरुन मिठी मारली तेव्हा मला जाणवलं की हा मुलगा बारीक पण आहे आणि गुबगुबीत पण.. मी त्याचे गालपण ओढून पाहिले, कापसासारखे मऊ-मऊ होते…. पण नंतर एका पुलावरुन तो पळुन गेला.. असा मुलगा इथे असता तर नक्की मी त्याला माझा मित्र बनवलं असतं.” बयो हसली नाही मला वाटलं होतं की सगळ्यांसारखी हसेल, काय गं वेडाबाई आहेस असं म्हणेल.. पण उलट तिने मला विचारलं माझी खुप इच्छा आहे अशा जागी जायची मला नेशील?…माझ्या स्वप्नातली जागा खरोखर असु शकते असं वाटणारी बयो एकटीच होती बहुदा…मी म्हणलं मला सापडली कि नक्की नेईन…
बयो हसली… आणि शेतातून चालताना प्रत्येक पानाशी जणू काही बोलते आहे अशा थाटात पानांच्या हातात हात देत बोलत होती.. मध्येच वळून माझ्याकडे बघून म्हणाली, उद्या तुला अशी जागा सापडली आणि तुला घरच्यांनी सोडलं नाही तर…? “तर..” मी पटकन उत्तर दिलं, “मी भांडेन.. गच्चीतून पळून जाईन.. पण नक्की त्या जागी जाईन” बयो म्हणाली.. “लक्षात ठेव हं, कधीही विसरु नको तू जाशील…. जिथे तुला आनंदी वाटेल तिथे.. अडकून पडणार नाहीस..”

मला पण जायचं होतं अशाच ठिकाणी… मुळात मला यायचंच नव्हतं इथे पण आले… म्हणलं इथे सगळ्यांची मन जिंकेन.. त्यांना म्हणेन आता मला मोकळी करा.. पण शक्य झालं नाही.. आता होईल असं ही वाटतं नाही.. घरातला प्रत्येक क्षण बाहेर पडायच्या विचारात जातो… सारखं जाणवतं ज्यांच्यासोबत राहतो ती आपली नाहीत…. ज्या गावात राहतो ते गाव आपलं नाही…. या माणसांना आपण जवळचे नाही… बर्फाचा खडा वितळतो ना तसं वितळून जावसं वाटतं, वाऱ्याप्रमाणे विरुन जावंसं वाटतं.. कोणालाही कळणार ही नाही इतक्या अलगद दिसेनासं व्हावं.. म्हणजे मग कदाचित ते मोकळे आकाश, ओसाड माळरान, फळा-फुलांनी डवरलेल्या बागा, न संपणारे रस्ते, सोसाट्याचा वारा, वळीवाच्या गारा, नदीचे किनारे सगळं सगळं खूप खोलवर शोषून घेता येईल, ओतप्रोत अनुभवता येईल, जगता येईल… एखादा माणूस, घर, परिवारासाठी बनलेलाच नसतो, त्यामुळे या चौकटी कितीही आरामदायी असल्या तरी खिडकितून येणारं अंगाला चटके देणारं उनंच जास्त आश्वासक वाटतं…. बयोचे शब्द कानावर पडत होते आणि बाकी शब्द आणि शब्द कळत नसला तरी इतकं कळत होतं की ती आत्ता आहे तिथे खुष नाहीये आणि तिला बाहेर पडायचंय पण तिला पडता येत नाहीये म्हणजे दादाने काजवा धरुन आणला होता आणि त्याला काडेपेटीत ठेवलं होतं तेव्हा थोडी पेटी उघडली की तो काजवा बाहेर यायचा आणि आम्ही काजवा जाऊ नये म्हणून पेटी लगेच बंद करायचो.. तेव्हा त्या काजव्याचं जे व्हायचं ना तेच बयोच होतंय.
या घटनेला आता अनेक वर्ष झाली आहेत… मी आईला विचारलं, “आई बयो कशाने गेली?” आई म्हणाली, “खाणंपिणं बंद केलं होतं.. आधी वाटलं कि ते डाऐट का बिऐट करतीये कि काय.. पण जाईपर्यंत तोंडात पाण्याचा थेंब घेतला नाही… खोलीतल्या खिडकीतून एकटक बाहेर बघत होती.. डोळ्यातून प्राण सोडला म्हणे…..”

मध्ये मुराकामीची एक गोष्ट वाचली होती.. एक डॉक्टर एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि ती मुलगी मात्र याचा वापर करुन कोणा दुसऱ्या सोबत देश सोडून निघून जाते.. तेव्हा जगामध्ये सगळ्यात सुंदर असलेली प्रेम नावाची गोष्ट आपल्याला मिळूनसुद्धा मिळाली नाही… याच्या दु:खाने तो खाणं-पिणं सोडतो.. त्याच्या कमी होणाऱ्या प्रत्येक हालचालीनुसार त्याच्या डोळ्यात या जगातून नाहीसे होण्याचा आनंद दिसायला लागतो… एका नवीन जगाच्या.. एका नव्या आयुष्याच्या अधिकाधिक जवळ जाण्याची आशा… मुराकामी म्हणतो, “आयुष्यात हवी असलेली एकमेव गोष्ट जेव्हा आपल्याला मिळतं नाही तेव्हा काही माणसं “erase to nothinग” हा पर्याय निवडतात, हे आयुष्य संपवणे नाहीये हे आपण जगलेल्या आयुष्याला खोडुन टाकणे आहे, आपलं अस्तित्व पुसून टाकणं आणि एक नवीन आयुष्य जगण्यासाठी बाहेर पडणं आहे…

बयोला बाहेर पडायचं होतं… तिच्या खोलीतल्या खिडकीतून येणाऱ्या ऊन, वाऱ्याचा हात धरुनच बयो बाहेर पडली होती.. आणि म्हणाली तिचा प्राण डोळ्यातून गेला… पण तिचा प्राण नाही बयोच गेली डोळ्यांच्या वाटे, त्या प्रकाशाचा हात धरुन… तिला हव्या असणाऱ्या जगात… कदाचित आत्तापर्यंत तिला जांभळा समुद्र सापडला असेल… त्याच्या काठावर बसून तिने आपले घट्ट बांधलेले केस सोडले असतील… वाळूत पाय रुतवून ती चालत असेल.. उमटलेल्या पावलांच्या ठश्यांकडे बघत असेल…. त्या ठश्यांना न्हाऊ घालणाऱ्या पाणाच्या फेसाकडे बघत असेल… बयो जगत असेल..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here