– स्नेहा रानडे / स्फुट लेखन /
आज सकाळी आरशात बघताना जाणवलं अरे बापरे डोळ्याखालची काळी वर्तुळे जास्तच वाढलीय, केसांमधे रूपेरी छटा जरा जास्तच दिसायला लागल्यात.. मग पुन्हा पुन्हा चेहरा वाकडातिकडा करत कधी या angle ने तर कधी त्या angle ने बघत होते. पण तो काय मला मनासारखं उत्तर देत नव्हता. मग काय मन जरा खट्टूच झालं. मग विचार केला तो तरी कुठे खोटं दाखवतोय? खरं तेच दाखवतोय ना आणि क्षणात मला त्याच्याविषयी एकदम आदर वाटायला लागला..
“दोस्ती या दुष्मनी, नहीं निभाता है आईना
जो उसके सामने है, वहीं दिखाता है आईना”
आरसा ही अशी वस्तू जी आपल्याला प्रतिबिंब दाखवते. छान कसं राहयचं शिकवते. आम्हा स्त्रियांना तर ह्याच्याविषयी जरा जास्तच लळा असतो.. येता जाता आम्ही त्याला निरखत असतो. नवविवाहित पत्नी आपल्या पतीदेवांना जेव्हा सांगते, “माझे तुमच्यावर फार प्रेम आहे” ते वाक्य सुद्धा ती दहादा आरशासमोर म्हणते. आपलं प्रेम ती त्याच्याकडेच व्यक्त करते.. म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीपेक्षांही काकणभर जास्तच प्रेम आपण आरश्यावर करतो नाही का..?
बिचारा पुल्लिंगी असूनसुद्धा किती वेळा टिकल्या चिकटवून घेतो. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करतो. प्रसंगी मदत करतो. आपण कधीतरी कुणी गुर्मीत असेल, जरा दिखाऊपणा करत असेल तर म्हणतो आरशात जाऊन बघ एकदा स्वत:चा चेहरा.. असा हा आरसा सगळ्यांचा लाडका असतो.. त्याला आपण साफ, चकचकीत करतो.
आरसा जसं आपलं प्रतिबिंब दाखवतो तसाच मनाचा आरसा पण असतो तो पण वेळोवेळी आपल्याला चांगल्या वाईट गोष्टी दाखवत असतो.. योग्य अयोग्य समजावत असतो. तो आरसा जसा दृष्य गोष्टी दाखवतो तसा मनाचा आरसा ही स्वच्छ, निर्मळ असायलाच हवा तरच जीवन आनंदी, उत्साही, आणि सुगंधित राहील.