लेखक – जयंत नारळीकर
कादंबरीचे नाव – प्रेषित
सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प
स्पेस अकॅडेमीचा दीक्षांत समारोह. सॅन्ड्रा आणि आलोक पदवी ग्रहण करून पुढील आयुष्याला सुरुवात करणारहोते. आलोकला अकॅडमीचे सुवर्णपदक मिळणार होते. आलोक आणि सॅन्ड्राने एकमेकांशी वैवाह कारण्याचा निर्णयही घेतला होता. आलोकचे आई वडीलही या समारंभाला उपस्थित होते. आलोकला दीक्षांत समारोहाच्या दुसऱ्या दिवशी अकॅडमीच्या संचालकांनी डॉ. मम्फर्ट यांनी आपल्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले. त्याचं अभिनंदन करत त्याला पुढच्या करिअरबद्दल पुन्हा विचारले. आलोकने महिन्यापूर्वीच त्यांच्याजवळ विनंती केली होती की त्याला पुढच्या शिक्षणासाठी सायक्लॉप्स प्रकल्पावर काम करायचे आहे.
डॉ. मम्फर्ट यांनी सायक्लॉप्स प्रकल्प किती नाजूक आहे आणि अमेरिकेतील मिलिटरी यंत्रणा त्यावर काम करत आहे, तू दुसरा प्रकल्प निवडलास तर बरे होईल हे त्याला पुन्हा पटवून दिले. तरी आलोकला सायक्लॉप्समध्येच आपला प्रकल्प पूर्ण करायचा होता. आता आंतरराष्ट्रीय परिस्थिती निवळली आहे मग त्यावर काम करायला काय हरकत आहे असा आलोकचा मुद्दा होता. शेवटी, डॉ. मम्फर्ट यांनी त्यांच्याजवळ आधीच तयार असलेले अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांची मंजुरी असलेले कागदपत्र आलोकला दिले.
या प्रकल्पासाठी काही नियम आणि अटी आलोकला पाळायच्या होत्या आणि हा प्रकल्प ६० दिवसांपुरताच होता. आलोकने सॅन्ड्राला फोन करून सांगितले आपले लग्न ६१व्या दिवशी. तयार रहा. सायक्लॉप्समध्ये आलोकला वेगळे ठेवण्यात आले. स्वतःची बुद्धी आणि कौशल्य वापरून त्याने सायक्लॉप्समध्ये बऱ्याच सुधारणा सुचवल्या. तिथल्या शास्त्रज्ञाना पहिल्या त्या पाटल्या नाहीत परंतु काही दिवसांनी त्यांना त्या सुधारणा योग्य वाटल्या. तिथला एक तंत्रज्ञ फ्रेड मॉरिस आलोकचा चाहता झाला. फ्रेडने सायक्लॉप्सबद्दल आलोकला पुष्कळ माहिती दिली. इथल्या कामाच्या गुप्ततेचा पडदा १० वर्ष ठेवला जातो. त्यावर त्या दोघांनी चाचण्या करून पहिल्या. सहा वर्षांपूर्वीची माहिती, दहा वर्षांपूर्वीची माहिती पडताळून पाहिली.
आलोकने अचानक त्याला एक ठराविक तारीख (४ नोव्हें २०२०५) तपासून पाहायला सुचविले. फ्रेड म्हणाला, का रे? हीच नेमकी का? तुझा जन्मदिवस आहे का?
नाही सहज. या दिवशी दोन ऍस्ट्रोइड एकमेकांवर आदळले. आलोकने थाप मारली. पण त्या तारखेवर गुप्ततेचा पडदा होता. आलोक मनातून फारच अस्वस्थ झाला. काय घडलं असेल या दिवशी? त्याने फ्रेडकडे जॉन प्रिंगलविषयी चौकशी केली. फ्रेडने सांगितले, की तो एक शास्त्रज्ञ होता. एकटाच खाजगी विषयावर काम करत असायचा. एकदा तो सुरक्षा अधिकाऱ्यांनी इथली मॅग्नेटिक टेप नेताना आढळला. पण त्याचा मध्येच एका घाटात मृत्यू झाला. पण टेपचं काय झालं? आलोकने विचारले. कारचा चक्काचूर झाला, टेप कुठून सापडणार? पण तुला अजून माहिती हवी असेल तर इथल्या चौकशी समितीचा रिपोर्ट वाच. मी हा रिपोर्ट कसातरी मिळवला. पण तुला दिला आहे हे कोणाला सांगू नकोस.