लेखक – जयंत नारळीकर
कादंबरीचे नाव – प्रेषित
सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प
सायक्लॉप्स – यंत्रेच यंत्रे असणारे एक टुमदार गाव. एक सहस्त्र रेडिओ दुर्बिणींनी बनलेलं हे गाव. या दुर्बिणी जेव्हा एका दिशेने वळवल्या जात तेव्हा आकाशातून पाहणाऱ्याला वाटे की एक प्रचंड डोळा अंतराळात कुठेतरी काहीतरी शोध घेत आहे. ग्रीक पौराणिक कथेतल्या एक डोळ्याच्या राक्षसावरून या गावाला हे नाव दिले होते.
पृथ्वीपलीकडे जीवसृष्टी असेल काय? आपल्याभोवती पसरलेल्या अंतराळात आपणच केवळ हुशार, विचारवंत, प्रगत जीव आहोत का? किंवा कुणी असल्यास त्यांच्याशी संपर्क कसा साधायचा? यासाठी अमेरिकन सरकारने सायक्लॉप्सची निर्मिती केली होती.
परंतु या यंत्राकरवी शोध घेण्याचे सुख शास्त्रज्ञांना फार काळ घेता आले नाही, कारण लगेच काही काळाने दुसरे सरकार आले. त्या सरकारची उद्दिष्टे वेगळी होती. विज्ञानाला सढळ हाताने पाठिंबा देणे हे या सरकारला सहमत नव्हते. नवीन राष्ट्राध्यक्षांनी राष्ट्रीय विज्ञान संस्थेकडून सायक्लॉप्स काढून घेतला आणि मिलिटरीच्या सुपूर्त केला. त्या सायक्लॉप्स टाऊनची सर्वच बदली झाली. आत शिरणाऱ्यांवर कडक प्रतिबंध आले. खेळीमेळीचे वातावरण जाऊन औपचारिकपणा आला. खूप नियम आले. पण तरीसुद्धा हे अवाढव्य यंत्र चालवायला शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ पाहिजेच होते. अशा मोजक्याच वैज्ञानिकांत जॉन प्रिंगल होता.
प्रथम सायक्लॉप्सचा दुरुपयोग चाललेला पाहून त्याला खंत वाटे. हळूहळू त्याने वेळेचा सदुपयोग करून पुष्कळ संशोधन केले. अर्थात तो हे संशोधन प्रसिद्ध करू शकत नव्हता. या चोरून केलेल्या संशोधनाला त्याने ‘काळे विज्ञान’ हे नाव दिले होते.
सायक्लॉप्सच्या गेटवरील सुरक्षा अधिकारी मॅकार्थी हा या वैज्ञानिक टाऊनमध्ये काम करणाऱ्यापैकी जॉन प्रिंगल आणि पीटरवर संशय ठेऊन होता. बऱ्याच दिवसांनी मॅकार्थीने आपल्याबद्दल आणि पीटरबद्दल केलेली विचारपूस जॉनला खटकली. आपल्या काळ्या विज्ञानाची कुणकुण मॅकार्थीला कळली का? या विचारात तो आत टाऊनमध्ये शिरला.
आत शिरताना जॉन त्या भव्य टाऊनमध्ये असलेल्या दुर्बिणींना दररोज कुतूहलाने बघत असे. त्याच्या मते हे सहस्र टेलिस्कोप मानवी कौशल्याचा परमोच्च बिंदू आहेत आणि पीटरचा मते खरे कौतुक या अजस्र धुडांवर नियंत्रण ठेवणाऱ्या कंट्रोलरुममधल्या लहानग्या गणकयंत्राचे.