मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार कै. प्रल्हाद केशव अत्रे ‘केशवकुमार’. राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज) यांना आपल्या गुरुस्थानी मानत. गोविंदाग्रजांच्या विनोदी लेखनाचा, काव्यशैलीचा प्रभाव अत्रेंवर मोठ्या प्रमाणावर पडला. गोविंदाग्रजांच्या शैलीची नक्कल करणारे अनेक जण होऊन गेले. पण अत्रेंनी त्यांच्या शैलीला खऱ्या अर्थाने आदर्श मानून घेऊन गोविंदाग्रजांच्या तोडीचे लेखन त्यांनी केले.
प्र. के. अत्रे हे शिक्षण क्षेत्रात विशेष गाजले. त्यांनी सर्व स्तरांतील मुलांना एकाच शाळेत शिकवले. त्यांनी तत्कालीन पाठ्यपुस्तकांवर जबरदस्त ताशेरे ओढले व स्वतः काही शिक्षकांच्या व शिक्षणतज्ज्ञांच्या मदतीने प्राथमिक शाळेसाठी “नवयुग वाचनमाला” व दुय्यम शाळेसाठी “अरुण वाचनमाला” ह्या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या. मुलांना अभ्यासात गोडी वाटावी, म्हणून सोप्या भाषेतील अनेक धडे आणि कविता त्यांनी या वाचनमालेत निवडल्या. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण करण्यासाठी मराठीतील अद्ययावत, जिवंत वाङ्मयाचा व विचारांचा परिचय करून देण्याचा प्रयोग राबवणे हे त्यांचे महत्त्वाचे शैक्षणिक कार्य ठरले. त्यांचे शैक्षणिक कार्य लक्षात घेऊनच सावरकरांनी त्यांना ‘आचार्य’ ही पदवी दिली.
आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. ‘मी कसा झालो’ (१९५६) ह्या अत्रे यांच्या वाङ्मयीन आत्मशोधनातून व ‘कऱ्हेचे पाणी – १ ते ५ खंड’ या विस्तृत आत्मचरित्रातून अत्रे उलगडत जातात. लेखन, पत्रकारिता, वक्तृत्व, चित्रपट, शिक्षण व राजकारण या सर्वच क्षेत्रांत अद्वितीय प्रभुत्व गाजवून एका विशिष्ट कालावधीत महाराष्ट्राला दिशा देणारे ‘आचार्य’..!
आदर्शांची पायमल्ली, मनाविरुद्ध मते मांडली की तुटून पडणे, चारित्र्यहनन, माहितीची शहानिशा करून न घेता प्रहार करणे, अशा अत्र्यांच्या काही उणिवांवर बोट ठेवले जाते. असे असले तरी त्यांच्या काही निष्ठा पक्क्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे सामाजिक बांधिलकी. समाजातील दुर्बल घटक, गोरगरीब, तळागाळातील माणसे, अज्ञजन, उपेक्षित, दलित यांचा आपल्या सामर्थ्यानिशी अत्र्यांनी सतत कैवार घेतला.
आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांनी आणि शंकर केशव कानेटकर (कवी गिरीश) यांनी संपादित केलेली अरुण वाचनमाला नावाची मराठीची क्रमिक पुस्तके शाळेच्या इंग्रजी पहिली ते इंग्रजी पाचवी (हल्लीची पाचवी ते नववी) च्या अभ्यासक्रमांत होती, सन १९३४ साली निघालेल्या या क्रमिक पुस्तकांसारखी सुरेख पुस्तके त्यापूर्वी आणि त्यानंतर कधीही निघाली नाहीत, असे शिक्षकांचे आणि पालकांचे मत आहे. ही पुस्तके पहायला मिळणेही अशक्यप्राय झाल्याने, डिंपल प्रकाशनाने या पुस्तकांची नवीन पुनर्मुद्रित आवृत्ती आचार्य अत्रे यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त १३ ऑगस्ट २०१७ रोजी बाजारात आणली आहे. आचार्य अत्रे यांचे नवयुग मराठा साप्ताहिकाचा पहिला अंक १९४० २१ जानेवारी रोजी प्रकाशित झाला.
आचार्य अत्रे आणि गिरीश दोघेही हाडाचे द्रष्टे शिक्षक होते. त्यावेळी ते अनुक्रमे कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथे मराठीचे अध्यापक होते. अत्रे तर लंडनहून शिक्षणशास्त्रातील उच्च पदविका घेऊन परतले होते; आणि शाळेचे मुख्याध्यापक होते. तेव्हा अशा जाणकारांच्या अनुभवातून ही पुस्तके तयार झाली आणि एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे अवघ्या शिक्षणक्षेत्राला दिशादर्शकाचे काम करू लागली. २०१७ सालीही या पुस्तकांतील कल्पना कालसुसंगत असल्याचे जाणवते. पुस्तकांच्या प्रस्तावनेत उल्लेख केल्याप्रमाणे ही पुस्तके आधुनिक भाषा-शिक्षणाची व अध्यापनशास्त्राची तत्त्वे लक्षात घेऊन तयार केली आहेत. पुस्तकांची रचना (Design) करताना कला आणि वाङ्मय हा मुख्य दृष्टिकोन ठेवला आहे. पुस्तके मनोरंजक करण्याच्या प्रयत्नात फार सोपी होतात आणि शैक्षणिकदृष्ट्या निरुपयोगी ठरतात. ‘मनोरंजकत्व म्हणजे सुलभत्व नव्हे!’ गद्य-पद्य लेखनातील विविध फुलोरे, छटा आणि तऱ्हा यांचा मनोज्ञ संगम या पुस्तकांत अनुभवायला मिळेल. सारांश, राष्ट्रीय, महाराष्ट्रीय आणि मानवी अशा तिहेरी दृष्टीने या पुस्तकांची केलेली रचना जाणकारांना प्रतीत होईल.’
विनोदा इतकेच गंभीर लेखन आणि राजकारणा इतकेच समाजकारण पण सहजतेने हाताळणारे, मुलांचे मानसशास्त्र चांगले अवगत असणारे अत्रे भारतवर्षांतील एक महान नेते..
आचार्य अत्रे यांच्याच शब्दांत त्यांच्याबद्दल सांगायचे झाले, तर ‘गेल्या दहा हजार वर्षांत असा माणूस झाला नाही, पुढच्या दहा हजार वर्षांत असा माणूस होणार नाही.’ अशा या बहुयामी व्यक्तिमत्वाला त्रिवार प्रणाम…!