– स्नेहा मनिष रानडे / ललित लेख /
जात्यावर दळता दळता,
गाणे आनंदाचे गावे,
भरडून सारे दु:ख,
क्षण सुखाचे पहावे..
किती सहज सुंदर वर्णन केलंय.
पुर्वीच्या काळी सर्व स्त्रिया जात्यावर धान्य दळताना ओव्या म्हणायच्या, त्यातूनच आपल्या मनातील आनंद सुख वाटून घ्यायच्या. प्रत्येकाला सुखाची कल्पना विचारली तर ती प्रत्येकाची वेगळी असते.. सुख म्हणजे नक्की काय हे विचारल्यावर पटकन कोणालाही उत्तर सुचतंच असं नाही मग आपण त्यावेळी जे आठवतं ते पुढे करतो आणि यालाच सुख असं म्हणतो.. खरंच सुख ही कल्पना एवढी सोपी आहे का जी सहज पटकन मांडता येईल..
संत ज्ञानेश्वरांनी तर “अवघाचि संसार सुखाचा करीन” असे उद्दात्त ध्येय डोळ्यासमोर ठेवले आणि आपले कार्य केले.. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) सारखा ग्रंथ लिहिला आणि जनमानसाला आनंदाची, सुखाची वाट कशी शोधायची याचे मार्गदर्शन केले..
संत रामदास तर “जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे” असे म्हणत प्रश्न पण केला आणि उत्तर ही दिले. जगात कोणीच १००% सुखी नसतं. आपण येणाऱ्या संकटाकडे कसं पाहतो याचे उत्तर मनातील चांगले विचार, भावना, सुखाचा शोध कसा घेतो यावर अवलंबून असतं. जो संकटातही सकारात्मक विचार करतो, येणाऱ्या संकटावर मात करण्याची तयारी दाखवतो तोच खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकतो..
“सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं तर ते घरबसल्या मिळतं” यामधे सुद्धा चांगल्या विचारांना गती द्या असं सुचवलं जातं.. सर्वसामान्य माणूस भौतिक सुखामधे सुख शोधायचा प्रयत्न करतो… प्रत्येकाला चांगल्या प्रकारची नोकरी, गाडी, बंगला असला तर तो सुखी असे म्हटलं जातं… तर मग माझ्या सुखाची कल्पना असं विचारल्यावर माझंही तसंच उत्तर येतंय. छान राहता आलं पाहिजे, म्हणेल ती वस्तू हातात मिळाली पाहिजे, मन म्हणेल तसं वागता आलं पाहिजे.. मग हीच माझ्या सुखाची कल्पना तर भौतिक सुखापलीकडे मी विचारच करीत नाही. त्यातूनच मग मला खरा सुखाचा शोध घ्यायची आस लागते आणि मग मी खरं सुख कोणतं याचा विचार करते.. तेव्हा हळूहळू मला उमगतं की, मला माझ्या मनाला आनंदी, उत्साही ठेवायचं आहे.. त्यासाठी दर्जेदार साहित्य वाचलं पाहिजे.. छोट्या छोट्या गोष्टी आनंदाने केल्या पाहिजेत. कोणताही चांगला विचार गोष्ट आवडली की, मला ती दुसऱ्यांना सांगता आली पाहिजे..
सुख हे कल्पतरु वृक्षासारखं जेवढं आनंदाने प्रयत्न करेन तेवढं मला ते मिळेल हीच माझी सुखाची कल्पना… मला छान कल्पना सुचावी, मला लोकांना मदत करता यावी, लोकांचा आदर करता यावा ही माझी सुखाची कल्पना.. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य पाहता यावं हीच माझी सुखाची कल्पना. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या भगवंताने मला हा अव्यंग देह दिला, दिलखुलास मन दिलं, विचार करण्यासाठी सत्शील बुद्धी दिली त्या भगवंताविषयी कृतज्ञता व्यक्त करता यावी ही माझी सुखाची कल्पना..
अजून काय लिहू? सुखाची कल्पना काय? विचार करण्याची संधी हाच माझ्यासाठी, आनंदाचा सुखाचा ठेवा..