मराठी इतिहाससंशोधक, लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर

मराठ्यांच्या इतिहासाचे भाष्यकार, संशोधक, इतिहासकार व लेखक कै. त्र्यंबक शंकर शेजवलकर. रत्‍नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील कशेळी येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शंकर ह. शेजवलकर हे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या़ संस्थापकांपैकी एक होते. मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतून मॅट्रिक (१९११) व विल्सन महाविदयालयातून बी.ए. (१९१७). पुढे मुंबईतच लष्कराच्या लेखा विभागात नोकरी (१९१८). हे खाते पुण्यास वानवडी येथे हलविण्यात आल्याने शेजवलकर पुण्यास आले मात्र २० जून १९२१ पर्यंतच ते या नोकरीत राहिले. पुण्यात असताना ते भारत इतिहास संशोधक मंडळाचे सभासद झाले. साहजिकच त्यांचा दत्तो वामन पोतदार, दत्तोपंत आपटे, गो. स. सरदेसाई प्रभृतींशी परिचय झाला. या वास्तव्यात गो. स. सरदेसाई यांनी त्यांना बडोद्यास आपल्या सहकार्यास येण्याचे आवाहन केले व त्यानुसार ते बडोद्यास गेले (१९२२) तथापि त्यांना प्रबंधाव्दारे एम्.ए. ही पदवी घ्यावयाची होती, म्हणून ते मुंबईस आले. ‘मुसलमानी संस्कृतीचा हिंदू संस्कृतीवरील प्रभाव’ हा प्रबंध त्यांनी मुंबई विदयापीठास सादर केला परंतु परीक्षकांशी मतभेद झाल्यामुळे त्यांना पदवी मिळू शकली नाही. पुढे हा इंग्रजी प्रबंध पुस्तकरूपात प्रकाशित झाला (१९९८). बडोद्याच्या वास्तव्यात शेजवलकरांच्या गुणवत्तेमुळे रियासतकार सरदेसाई प्रभावित झाले होते. त्यामुळे जेव्हा त्यांनी नानासाहेब पेशवे हे पुस्तक लिहिले (१९२६), तेव्हा शेजवलकरांना त्यास प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली. त्यांनी भिन्न मतप्रदर्शक व विचारप्रवर्तक अशी दीर्घ प्रस्तावना लिहिली. तेव्हापासून एक साक्षेपी इतिहासकार म्हणून शेजवलकरांचा नावलौकिक झाला. शिवकाल, पेशवेकाल ह्या काळातील इतिहासाविषयी त्यांनी चिकित्सक लेखन केले आहे. निजाम-पेशवे संबंध, पानिपत : १७६१, श्रीशिवछत्रपती इ. त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. इतिहासाप्रमाणेच समाजशास्त्र हाही त्यांच्या चिंतनाचा विषय होता. इतिहास आणि समाजजीवन ह्यांविषयीचे त्यांचे समीक्षणात्मक लेखन प्रगती साप्ताहिकातून प्रकाशित झाले आहेत.

ग्रंथलेखनाबरोबरच त्यांनी वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके, गौरवग्रंथ आदींमधून पुष्कळ लेखन केले. तसेच भारत इतिहास संशोधक मंडळातही शोधनिबंध वाचले. यांपैकी काही लेख, त्र्यंबक शंकर शेजवलकर : निवडक लेखसंग्रह या नावाने ह. वि. मोटे यांनी प्रसिद्घ केले आहेत (१९७७). त्यांनी केलेली काही ग्रंथपरीक्षणे त्यांच्या मर्मभेदक व स्वतंत्र समीक्षादृष्टीची निदर्शक आहेत. त्यांचे पानिपत व शिवचरित्र साधने हे दोन गंथ विशेष मान्यता पावले. पानिपत हा ग्रंथ शेजवलकरांनी जदुनाथ सरकारांचे दोषपूर्ण विवेचन व मराठ्यांवरील अन्यायकारक टीका, याला उत्तर म्हणून लिहिला. विविध प्रकारच्या ऐतिहासिक साधनांची सूक्ष्म चिकित्सा, नकाशांचा सूक्ष्म अभ्यास, प्रत्यक्ष भेटी देऊन भौगालिक स्थळांचे सूक्ष्म निरीक्षण, आंतरशाखीय दृष्टी यांचा ताळमेळ घालून हा ग्रंथ लिहिला आहे. इतिहास-संशोधनपद्धतीत या ग्रंथाने एक उच्च् मानदंड निर्माण केला आहे. त्यांचे लेखन अभ्यासपूर्ण, चिकित्सक, विचारप्रवर्तक, अन्वयार्थी आणि बहुआयामी आहे. क्वचित त्यात विसंगती आढळते.

मराठ्यांचा सर्वांगीण इतिहास हा त्यांचा अभ्यासविषय होता. पेशवाईच्या कालखंडात शिवाजी महाराजांच्या धोरणापासून जी फारकत घेतली गेली, तिच्यावर बोट ठेवून आणि मराठ्यांच्या अवनतीसाठी पेशव्यांना जबाबदार धरून त्यांनी कठोर चिकित्सा केली. स्वातंत्र्य, समता व बंधुता या फ्रेंच राज्यक्रांतीच्या तत्त्वत्रयीमुळे शेजवलकर प्रभावित झाले होते. या तत्त्वांच्या निकषावर त्यांनी वेळोवेळी केलेली ऐतिहासिक चिकित्सा अभ्यसनीय आहे. भूतकाळाबाबत अशी चर्चा करतानाच वर्तमानाच्या संदर्भात राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारणा या दोहोंचा मेळ घालण्यावर त्यांनी भर दिला. इतिहासाचार्य राजवाडे यांच्याप्रमाणे फटकळ व आग्रही तसेच प्रखर बुद्घिमत्तेचे आणि चतुरस्र विद्वान म्हणून शेजवलकर ओळखले जातात. ते निव्वळ संकलक-संशोधक नव्हते, तर इतिहासाचे प्रतिभावंत भाष्यकार आणि समाजचिंतक होते. आधुनिक मराठी इतिहासलेखनपरंपरेत तात्त्विक, बहुशाखीय आणि स्वयंभू मर्मदृष्टी लाभलेल्या न्यायमूर्ती म. गो. रानडे व वि. का. राजवाडे यांच्यासारख्या मोजक्या इतिहासकारांमध्ये शेजवलकर यांची गणना करावी लागेल.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here