इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे

0
2136

मराठी भाषेतील इतिहास, भाषाशास्त्र, व्याकरण अशा बहुविध विषयांचे संशोधक कै. विश्वनाथ काशिनाथ राजवाडे. त्यांचा जन्म २४ जून १८६३ साली पुण्यात झाला. एक अतिशय परिश्रमी, प्रतिभावान, दृढनिश्‍चयी आणि निष्ठावान असे विद्वान व्यक्तिमत्त्व असलेले विश्वनाथ काशिनाथ राजवाडे हे ‘इतिहाससंशोधक’ म्हणून विशेषेकरून मान्यता पावले. मुंबईस एल्फिन्स्टन कॉलेज व पुण्यास डेक्कन कॉलेज येथे महाविद्यालयीन शिक्षण घेऊन १८९० मध्ये बी.ए.झाले. १८९१ मध्ये ते पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले, पण अडीच वर्षांनी १८९३ मध्येच त्यांनी ती नोकरी सोडली. पुढे आयुष्यात त्यांनी कधीही, कसलीही नोकरी अशी केली नाही. विद्यार्थिदशेतच १८८९ मध्ये त्यांचा विवाह झाला होता, पंरतु १८९२ मध्येच त्यांची पत्नी निवर्तली आणि त्याच वेळी त्यांनी दुसऱ्या विवाहाचा विचारही न करता स्वतःस प्रापंचिक पाशातून कायमचे सोडवून घेतले.

विश्वनाथ काशिनाथ राजवाडे बहुधा महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही ऐतिहासिक साधनांच्या आणि प्राचीन साहित्याच्या शोधात सतत हिंडत राहिले. दऱ्याखोऱ्यातून प्राचीन अवशेष पहात व कानाकोपऱ्यातून जुनी दप्तरे गोळा करीत असतानाच, त्यांचे लेखनकार्यही अव्याहतपणे सुरू होते. १८९४ पासून स्वतः सुरू केलेल्या भाषांतर तसेच कोल्हापूर येथील समर्थ, तसेच ग्रंथमाला, विश्ववृत्त, सरस्वती मंदिर, प्राचीप्रभा इ. नियतकालिकांतून ते भरपूर लिहू लागले. मराठ्यांच्या इतिहासाची साधने ह्या शीर्षकाचे अस्सल मराठी साधनांचे बावीस खंड त्यांनी संपादित करून प्रसिद्ध केले (१८९८ – १९१७). ह्यापैंकी नऊ खंडांना त्यांनी विस्तृत प्रस्तावना लिहिल्या आहेत.

आजन्म भ्रमंती करून त्यांनी मराठय़ांच्या इतिहासाची कागदपत्रे जमविली आणि अस्सल साधनांचे बावीस खंड संपादित करून प्रसिद्ध केले. याचबरोबर ज्ञानेश्‍वरीची फार जुनी हस्तलिखित पोथी, ‘राधामाधवविलासचंपू’, ‘महिकावतीची बखर’, ‘सुबंत विचार’, ‘संस्कृत भाषेचा उलगडा’, ‘महाराष्ट्राचा वसाहतकाल’, ‘मराठी धातुकोश’, ‘नामद्विशब्दव्युत्पत्ति कोश’ इ. ग्रंथ संपादिले. इतिहासाचे मूलगामी भाष्यकार असणा-या राजवाडय़ांचा निर्मत्सर, तटस्थ, निरहंकार व निर्लेप वृत्तीने इतिहास लिहिण्याचा आग्रह असे. पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना करणा-या राजवाडय़ांनी समाजशास्त्र व आरोग्य मंडळे स्थापन केली. स्वभाषेच्या आणि स्वदेशाच्या इतिहासातून स्वाभिमान जागृत करून सामान्यजनास संघर्षाला प्रवृत्त करण्याचेच जीवितकार्य मानलेले राजवाडे अत्यंत आग्रही व एककल्ली स्वभावाचे होते. मराठीतून इतिहास, भाषाशास्त्र, व्याकरण, व्युत्पत्तिशास्त्राचे व्यासंगपूर्ण संशोधन हेच सर्वस्व मानलेल्या राजवाडय़ांनी कीर्ती, संपत्ती व अधिकाराचा मोह टाळून एकनिष्ठ वृत्तीने ज्ञानोपासना केली.

विश्वनाथ काशिनाथ राजवाडे फक्त मराठ्यांच्या इतिहासाची साधने गोळा करीत हिंडणारे एक संग्राहक आणि मराठ्यांच्या भूतकाळावर बहुधा स्वाभिमानमूलक आणि स्वाभिमानपोषक असे लिहिणारे एक इतिहासकार एवढेच नसून, एकूण इतिहास ह्या विषयावरचे मूलग्राही भाष्यकार होते, हे त्यांनी तत्कालीन महाराष्ट्राला जाणवून दिले. तथापि भूतकाळ म्हणजे सर्व मानवजातीचा इतिहास, एखाद्या प्रांताचा किंवा एखाद्या लोकसमूहाचा नव्हे आणि त्याचप्रमाणे इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन, केवळ राजकीय घडामोडी,सत्तातरांसाठी कटकारस्थाने आणि युद्धे ह्यांच्याच हकिकती नव्हेत, हे त्यांचे प्रतिपादन निश्चितच व्यापक आणि प्रागतिक दृष्टीचे द्योतक होते.

मराठ्यांच्या इतिहासाचा म्हणजे प्रथम मुख्यतः राजकीय इतिहासाचा शोध घेत घेत ते त्यांच्या प्राचीन साहित्याकडेही वळले. जुन्या मराठी साहित्याचा अर्थ उलगडण्यासाठी तत्कालीन मराठी भाषेचे ज्ञान अपरिहार्य ठरले. ह्यांतून ते शब्दाच्या उगमांकडे-व्युत्पत्तिशास्त्राकडे व भाषेतील स्थित्यंतरांच्या अनेकविध प्रश्नांकडे वळले. महाराष्ट्रातील व्यक्तींची उपनामे, ग्रामनामे वगैंरेची मुळे ते शोधू लागले आणि ती बहुशः संस्कृतोद्भव आहेत, अशा निष्कर्षाप्रतही ते पोहोचले. त्यासाठी संस्कृत भाषेचा आणि वैदिक भाषेचाही सखोल विचार करणे आवश्यक झाले आणि त्या दृष्टींनीही त्यांनी संशोधन करून काही प्रंबधही सिद्ध करून ठेवले. त्यांपैकी काही त्यांच्या हयातीत तर काही त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले. राजवाड्यांचे ह्या क्षेत्रातील कार्य गौरवास्पद असले, तरी त्यांचे भाषाव्युत्पत्तिविषयक निबंध सदोष असल्याचे काही भाषाशास्त्रज्ञांनी दाखवून दिले. ह्या एवढ्या गहन विषयात शिरणाऱ्या राजवाड्यांनी ललित साहित्याचे वाचन आणि रसग्रहणही सुंदर रीतीने केले, हे त्यांच्या ‘कांदबरी’ ह्या दर्जेदारसमीक्षात्मक लेखावरून कळून चुकते.

महाराष्ट्राच्या विचारविश्‍वात इतिहासाचार्य राजवाडे यांचा मोठा धाक होता. राजवाडे आपल्या हयातीतच एक आख्यायिका बनून गेले होते राजवाडे यांच्यावर भरपूर टीका झाली. त्यांच्या हयातीतच प्रबोधनकार के.सी. ठाकरे, विठ्ठल रामजी शिंदे, जिवाजी मंगेश तेलंग यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरले होते. नंतरही इतिहाससंशोधक त्र्यं.शं. शेजवलकर यांनी राजवाडे यांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. तथापि, या सर्व गोष्टी एकत्र केल्या तरी राजवाडे यांचे वाक्‍य न्‌ वाक्य ब्रह्मवाक्‍य मानणारा एक वर्ग अस्तित्वात राहिलाच आणि विशेष म्हणजे मराठी विचारविश्‍वात याच वर्गाचे वर्चस्व असल्यामुळे राजवाडे यांचे स्थान अबाधित राहिले. राजवाडे बुद्धिमान तर होतेच; पण त्यांना प्रतिभाशक्तीचीही देणगी लाभली होती. जबरदस्त आत्मविश्‍वास हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य होते. त्यामुळं साधा अंदाज किंवा कयाससुद्धा ते अशा पद्धतीने व अशा आक्रमकपणाने मांडत, की जणू काही तो त्रिकालाबाधित सत्य असलेला महासिद्धान्तच आहे.

राजवाड्यांनी देशासाठी प्रत्यक्ष राजकारण केले नाही, तरी त्यांच्या संपूर्ण बौद्धिक कार्याची प्रेरणा देशप्रेमातूनच आलेली होती. स्वभाषेच्या आणि स्वदेशाच्या इतिहासातून स्वाभिमान जागृत करणे आणि सर्वसामान्यास संघर्षाला प्रवृत्त करणे, हीच आपल्या कार्याची दिशा त्यांनी पक्की केली होती. आयुष्यभर त्यांनी एवढा व्यासंग केला; पण आपले सर्व संशोधन आणि चिंतन त्यांनी प्रतिज्ञापूर्वक मराठीतून आणि फक्त मराठीतूनच व्यक्त केले. त्यांच्या संशोधनाचा आवाका फार मोठा होता आणि त्यांनी केलेली कामगिरी भरीव झालेली आहे, हे संशयातीत आणि वादातीतच आहे. कीर्ती, संपत्ती, अधिकार ह्या सर्वांचा मोह टाकून, एकनिष्ठ वृत्तीने ज्ञानोपासना करण्याचा आदर्श मागे ठेवून ते धुळे येथे निवर्तले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here