‘नवकथेचे अध्वर्यू’ गंगाधर गाडगीळ

0
879

मराठी भाषेतील लेखक, साहित्यसमीक्षक कै. गंगाधर गाडगीळ. आधुनिक मराठी साहित्यिक. कथा, कादंबरी, प्रवासवृत्त, समीक्षा, नाटक, बालसाहित्य, अर्थशास्त्रविषयक इ. विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना ‘नवकथेचे अध्वर्यू’ असे संबोधले जाते. त्यांनी नवकथेमध्ये नवनिर्मिती घडवून आणली. कथेचे नवे वळण विकसित करण्याचे श्रेय गंगाधर गाडगीळ यांच्याकडे जाते.

लहानपणापासून गाडगीळांना वाचनाची आवड होती. त्यातूनच पुढे कॉलेजमध्ये असताना त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली. ‘प्रिया आणि मांजर’ ही त्यांची पहिली कथा जून इ.स. १९४१ मध्ये ‘वाङ्मयशोभा’ या मासिकात प्रकाशित झाली. पुढे बरीच प्रसिद्धी मिळालेली ‘बाई शाळा सोडून जातात’ ही त्यांची कथा देखील ‘वाङ्मयशोभा’ याच मासिकात इ.स. १९४४ मध्ये प्रसिद्ध झाली होती. काही कालावधीनंतर ‘मानसचित्रे’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह इ.स. १९४६ साली प्रकाशित झाला.

मानवाचे बाह्यवर्तन आणि अंतर्गत भावविश्व ह्यांत अनेक कारणांनी विसंगती निर्माण होते, ह्याची जाण ठेवून त्याच्या अनपेक्षित, उठवळ व चमत्कारिक उक्तिकृतींमागील सूक्ष्म-तरल भावना व संवेदना आणि सुप्त मनातील संज्ञाप्रवाह यांचा गाडगीळांनी वेध घेतला. यंत्रयुगातील शहरी जीवनातल्या ताणाबाणांचे सूक्ष्मसूचक दर्शन त्यांच्या कथांनी घडविले. नवीन्यपूर्ण प्रतिमा व लवचिक, मार्मिक शब्दकळा यांमुळे त्यांच्या कथांतील जीवनदर्शन कलात्मक झाले. साचेबंद घटनाप्रवणता कमी करून मनोविश्लेषणावर भर देणारी जी नवकथा १९४५ पासून रूढ झाली, तिचे ते अध्वर्यू समजले जातात. गाडगीळांच्या कथाविश्वातील व्यक्ती मध्यमवर्गीयच असल्या, तरी त्यांच्या अनुभवांकडे सखोलतेने पाहण्याच्या वृत्तीमुळे त्यातील जीवनदर्शन अस्सल वाटते.

गंगाधर गाडगीळ आपल्या कथेतून वाचकांसमोर मनोरम चित्र रेखाटतात, एकरूप होतात. मराठी साहित्यक्षेत्रातील एक अर्थपूर्ण वाङ्मयीन घटना त्यांच्या कथांना म्हणता येईल. १९४० नंतरच्या दशकात उदयाला आलेल्या या कथांनी नव्या वाङ्मयीन युगधर्माचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व केले. गंगाधर गाडगीळांचे एकूणच लेखन त्यातील कलागुणांमुळे तर लक्षणीय आहेच, त्याचबरोबर ते बीजधारमी स्वरूपाचे, परंपरेला नवविणारे असल्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्याही विशेष मोलाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here