मराठी भाषेतील नावाजलेले साहित्यिक विंदा करंदीकर

0
2635

मराठी भाषेतील सुप्रसिद्ध कवी, लेखक व समीक्षक कै. गोविंद विनायक करंदीकर. करंदीकरांनी बालकविता, विरूपिका, छंदोबद्ध काव्य, मुक्तछंद आणि लघुनिबंध असे मह्त्वाचे साहित्यप्रकार लीलया हाताळले. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. विंदा करंदीकर यांनी ‘स्वेदगंगा, मृदगंध, धृपद, जातक, विरूपिका, संहिता’ असे कवितासंग्रह तर ‘राणीचा बाग, परी गं परी, सर्कसवाला’ यासारखे बालकवितासंग्रह दिले.

१९४९ साली प्रथम प्रकाशित झालेल्या ‘स्वेदगंगा’ पासून सुरू मा. विंदांचा साहित्यिक प्रवास सुरु झाला. विंदांचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठीभाषकांस परिचय झाला. मराठीतील महत्वाचे समीक्षक म्हणूनही त्यांना मान्यता मिळाली होती. लघुनिबंधकार म्हणूनही ते प्रसिद्ध होते. गझल, गीत, मुक्तसुनीत, तालचित्रे, विरूपिका असे जुने काव्यप्रकारही त्यांनी हाताळले.

विंदांच्या बालकविता हा त्यांचा एक वेगळाच पैलू आहे. एकदा काय झाले सशाचे कान, एटू लोकांचा देश, परी ग परी, अजबखाना, सर्कसवाला, पिशीमावशी आणि तिची भुतावळ, अडम् तडम्, टॉप, सात एके सात, बागुलबोवा. हे त्यांचे बाल काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. या बालकविता अत्यंत वेगळ्या अशा आहेत. नाविन्यपूर्ण कल्पना आणि विनोदाची छानशी फोडणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. स्पर्शाची पालवी व आकाशाचा अर्थ हे त्यांचे लघुनिबंधसंग्रह, ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवाचे अमृतानुवाचे अर्वाचिनीकरण हा त्यांचा अभिनव प्रयोग होता. स्वतःच्याच काही कवितांचा त्यांनी इंग्रजीतही अनुवाद केला होता. पण मा. विंदा आठवतात ते त्यांनी महाराष्ट्रभर केलेल्या काव्यवाचनामुळे. दर्जेदार मराठी कवितांना घरे मिळवून देण्याचा हा अफाट यशस्वी प्रयोग होता. काव्यवाचनाचा प्रकार फारसा रूढ नसतानाही मा.वसंत बापट, मा.मंगेश पाडगावकर आणि मा.विंदा या तिघांनी काव्यवाचनाच्या जाहीर अनेक कार्यक्रम केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here