प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री, अनुवादक, बाल साहित्य लेखिका, संगीतकार कै. शांता जनार्दन शेळके. विविध साहित्यप्रकारात विहार करूनही त्यांच पहिलं आणि खरं प्रेम राहिलं ते कवितेवर. आईच्या मृदू स्वभावाचे, तिच्या चित्रकलेचे, तिच्या वाचनवेडाचे संस्कार कळत-नकळत शांताबाईंवर होत राहिले. लहानपणी आजोळी गेल्यावर विविध पारंपरिक गीते, ओव्या, श्लोक त्यांच्या कानावर पडत. त्यामुळे कवितेची आवड, वाचनाची आवड, त्या संस्कारक्षम वयात रूजत गेली. हळूवार भावकवितेपासून नाट्यगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते, चित्रपटगीते, प्रासंगिक गीते अशा विविध रूपातून त्यांची कविता आपल्याला भेटत दिसते. ‘रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी’ – सारख्या लावणी लिहिणाऱ्या शांताबाई – या मराठीतील पहिल्या स्त्री लावणीकार होत्या. शांताबाईंनी डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने देखील गीते लिहिली.
संतांच्या काव्यातील सात्विकता, पंडितांच्या काव्यातील विद्वत्ता आणि शाहीराच्या काव्यातील ललितमधुर उन्मादकता शांता शेळके यांच्या कवितेत आढळते. शांता शेळके यांच्या कथा ह्या त्यांनी बालपणी अनुभवलेल्या ग्रामीण जीवनाचे शब्दचित्र आहे. प्रौढवयात अनुभवलेले शहरी जीवनातील अनुभवही नंतर त्यांच्या कथेत आले आहेत. मनोविश्लेषण किंवा धक्कातंत्र या निवेदनशैलीचा वापर न करता अगदी सहज रोजच्या अनुभवाप्रमाणे त्यांच्या कथा अभिव्यक्त होतात. हीच बाब त्यांच्या ललित लेखनाबद्दल मांडता येते.
रोजच्या दैनंदिन अनुभवाला एक मानवी, वैश्विक स्तर देऊन त्यांनी ललितलेखन केले आहे. मानवी जीवनाकडे बघण्याची कुतूहलपूर्ण दृष्टी, मानवी स्वभावाविषयीची उत्सुकता या पोटी मिळालेले अनुभव अतिशय चिंतनशिलतेतून शांता शेळके यांनी त्यांच्या ललितलेखनातून मांडले आहेत. अनुवादित कृतीला स्वतंत्र निर्मितीच्या जवळपास नेण्याची दृष्टी ठेवून अनुवादातून जवळजवळ पुनर्निर्मितीचा आनंद मिळावा ह्या गांभीर्याने शांत शेळके यांनी त्यांचे अनुवाद कार्य केले आहे. सौंदर्यदृष्टी, रसिकता, मानवी मनोभूमिका आणि सहजता ही शांता शेळके यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये होत. अवतीभवतीचा सामाजिक, सांस्कृतिक अवकाश त्यांनी याच सौंदर्यदृष्टीतून आणि सहजतेतून अभिव्यक्त केला आहे.