मराठी भाषेचे जनकवी ‘पी सावळाराम’

0
1206

मराठी भाषेतील प्रसिद्ध भावकवी कै. निवृत्तीनाथ रावजी पाटील – ‘पी सावळाराम’. पी. सावळाराम यांची काव्यलेखनाची भाषा साधी व सोपी होती. त्यामुळेच मराठी माणसांच्या जीवनातील घडामोडींना सर्वांगीण स्पर्श करणारी त्यांची गाणी अजरामर झाली. शेत, रान, नदी, तळे, सागर, देव, आई, लहान बाळ, वृक्ष, पाऊल, संसार इत्यादी सर्वपरिचित शब्द त्यांनी आपल्या काव्यात वापरून सोप्या तालबद्ध भाषेत काव्यरचना केली. गीतरचनेचं वैशिष्ट्य लोकमनाशी निगडित असणं होय, हे त्यांनी ओळखलं होतं. त्यातूनच पुढे हे प्राकृतिक वैशिष्ट्य अर्वाचीन मराठी कवितेच्या कालखंडात थोडं वेगळं वळण घेऊन ‘भावगीत’ बनलं. त्यांची अशी ७२ भावगीतं अतिशय लोकप्रिय झाली. त्यापैकी कित्येक गीतांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. त्यांत भक्त‌िपर, स्त्रीमनाच्या विविध भावभावना उलगडणाऱ्या अनेक गीतांचा समावेश दिसतो.
पी. सावळाराम यांचा चित्रपट गीतलेखनातही योगायोगानेच प्रवेश झाला. ‘राम राम पाव्हणं’ ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक दिनकर पाटील प्रथमच दिग्दर्शन करत होते. त्यांच्या ह्या चित्रपटाला संगीत लता मंगेशकर देणार होत्या. त्यातील गाणी शांता शेळके यांनी लिहिली. पण त्यातल्या लावण्या तुम्ही दुसऱ्या कुणाकडून तरी लिहून घ्या, असं शांताबाईंनी सांगितल्यावर, पाटलांना आपल्या कॉलेजमधल्या कवीमित्राची म्हणजे सावळाराम यांची आठवण झाली. सावळाराम यांनी त्यांना दोन दिवसांत लावण्या लिहून दिल्या. ह्या लावण्यांसाठी मात्र सावळाराम ह्यांच्या आग्रहावरून त्यांचा आकाशवाणीमुळे मित्र झालेल्या वसंत प्रभू यांना संगीत देता आलं. तेव्हापासून दिग्दर्शक दिनकर पाटील, संगीतकार वसंत प्रभू व गीतकार पी. सावळाराम ही त्रिमूर्ती मराठी चित्रपटाला लाभली. त्याकाळी मराठी चित्रपटसृष्टीत पाटील-प्रभू-सावळाराम हे तिघे एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला राजा परांजपे, सुधीर फडके, ग. दि. माडगुळकर ही त्रयी होती.
स्त्री मनाची हळुवाररूपं साकारणारा कवी सावळारामांच्या गीतांतून दिसतो. स्त्रीचं अवघं भावविश्व ज्या एका महत्त्वाच्या घटनेवर आधारित असतं, तो प्रसंग म्हणजे तिचं लग्न. यावर आधारित सावळारामांनी लिहिलेली गाणी आठवून पाहा. ‘लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची’ असं म्हणणारी अवखळ मुलगी, ‘गोड गोजिरी लाज लाजरी, ताई तू होणार नवरी’ असं चिडवणारी धाकटी बहीण, ‘गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का?’ म्हणत आपल्या लाडक्या लेकीला निरोप देणारी वत्सल माता, ‘लिंबकोण उतरता अशी का झालीस तू बावरी, मुली तू आलीस अपुल्या घरी’ म्हणणारी प्रेमळ सासू, ‘हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशिला का?’ असं विनवणारी प्रिया, ‘जिथे सागरा धरणी मिळते, तिथे तुझी मी वाट पाहाते’ म्हणणारी आतुर प्रेयसी, ‘माझिया नयनांच्या कोंदणी उमलते शुक्राची चांदणी’ म्हणत लाजणारी यौवनातील मुग्धा, ‘हसले गं बाई हसले अन् कायमची मी फसले’ म्हणत प्रेमबंधात हरवून बसलेली यौवना, ‘गंध फुलांचा गेला सांगून’ मधील मीलनाची आस बाळगणारी ललना, ‘कोकीळ कुहू कुहू बोले’ म्हणत प्रीतीला साद घालणारी प्रिया, ‘सप्तपदी मी रोज चालते’ म्हणणारी कृत्यकृत्य पत्नी, ‘बाळ होऊ कशी उतराई? तुझ्यामुळे मी झाले आई’ असं म्हणत आपल्या मुला-बाळांसाठी आपल्या आयुष्याचंही दान देऊ पाहणारी ममताळू माता… अशा विविध स्त्री-रूपांतून स्त्रीमनाचे विविध पैलू त्यांनी उलगडले. आजही त्या गीतांचे सूर कानी पडले तरी कान टवकारले जातात, कारण शब्दांमधून होणारी अर्थप्रतीती, उत्कट भाव, चित्रमयता, संवेदनप्रधानता ही सर्व वैशिष्ट्यं त्या गीतांमध्ये एकवटलेली आहेत. त्यामुळेच ती आजही आपलं लक्ष वेधून घेतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here