मराठी भाषेचे गद्य लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार कवी स्व. राजा बढे. राजा बढे यांचा संस्कृत काव्याचा आणि उर्दू शायरीचा चांगला अभ्यास होता. तरीही त्याच्या कवितेतेला भाषा बोजड नव्हती. गीत, गझल याप्रमाणेच ‘चारोळी’ हा रचनाप्रकार बढे यांनी हाताळला. ‘कोंडिबा’ हे टोपण नाव वापरून काही राजकीय वात्रटिका त्यांनी लिहिल्या.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे राजा बढे यांचे दैवत होते. त्यांचे राष्ट्रप्रेम त्यांच्या ‘क्रांतिमाला’ (१९५२) या संग्रहातून वेळोवेळी दिसून येते. त्यात २१ कविता आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील देशभक्तिपर गीते आहेत. प्रत्यक्ष सावरकरांनी ‘प्रस्तावनेत’ ‘‘आपण स्वतःच नामवंत, सुप्रतिष्ठित प्रतिभासंपन्न साहित्यिक असल्याने, माझ्या प्रस्तावनेची गरज नाही असे गौरवोद्गार काढले आहेत.
कथाकथनाचे कार्यक्रम आज सर्वत्र होतात. या कथाकथनाचे खरे बीज रोवले राजा बढे यांनीच. १९६४ साली मुंबईत बढे यांच्या पुढाकाराने प्रथमच कथाकथनचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पु. ल. देशपांडे, ग.दि. माडगूळकर यांनी प्रथमच त्यांच्या कथा कथन केल्या होत्या.