मराठी कवी, कादंबरीकार पु. शि. रेगे

0
1344

श्रेष्ठ मराठी कवी, तसेच कादंबरीकार नाटककार, समीक्षक व संपादक पुरुषोत्तम शिवराम रेगे.

सृजनशक्ती म्हणजेच स्त्रीशक्ती हा त्यांचा कवितेचा प्रधान विषय होता. जीवनात विविध रूपाने वावरणारी सृजनशक्ती आणि विशेषतः तिचे स्त्रीदेहधारी स्वरूप हेच वेगवेगळ्या रूपांनी आणि स्त्रीप्रतिमांच्या साह्याने त्यांच्या कवितेत प्रकट होते आणि म्हणूनच त्यांच्या कवितेमागील प्रेरणा, त्यामधील अनुभवविश्व, तिची प्रतिमासृष्टी, बंदिश आणि शब्दकळा या स्वतंत्र व वेगळ्या जातीच्या आहेत. या सगळ्यांमध्ये त्यांचे आगळे काव्यात्म व्यक्तिमत्त्व आणि स्वत्व व्यक्त झाले आहे. त्यांच्या कवितांची इंग्रजी, जर्मन, डॅनिश, स्पॅनिश व चिनी भाषांत भाषांतरे झाली आहेत कारण त्यांत भारतीय परंपरेतून आलेली स्त्रीविषयक जाणीव आणि या जाणिवेवर झालेले आधुनिकतेचे संस्कार यांचा एक ह्रद्य मेळ आढळतो.

‘सुहृद चंपा’ आणि ‘रूप कथ्थक’ ही दोन टोपण नावे त्यांनी अनुक्रमे साधना आणि इतर कविता (१९३१) यातील कवितांसाठी तर ‘रूपकथ्थक’ हे टोपण नाव रंगपांचालिक आणि दोन नाटके (१९५८) या पुस्तकासाठी घेतली होती. त्यांचे अन्य साहित्य पु.शि. रेगे या नावानेच प्रसिद्ध झाले. छांदसी नावाचा त्यांचा १९६२ साली प्रसिद्ध झालेला समीक्षात्मक लेखांचा संग्रह. साधना आणि इतर कविता ह्या त्यांच्या काव्यसंग्रहानंतर फुलोरा (१९३७), हिमसेक (१९४३), दोला (१९५०), गंधरेखा (१९५३), पुष्कळा (१९६०), दुसरा पक्षी (१९६६) आणि प्रियाळ (१९७२) हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. १९४५ पर्यंतची त्यांची कविता मुक्तच्छंदात लिहिलेली असली, तरी नवकाव्य म्हणता येईल अशीही ती नव्हती. ते वळण १९४५ नंतरचे पण तरीही ते मर्ढेकरी नवकाव्याच्या वळणाचे नव्हते. त्याचे स्वरूप खास रेगेय म्हणता येईल असे होते. रंगपांचालिक आणि दोन नाटके या त्यांच्या संग्रहात ‘माधवी : एक देणे’, ‘रंगपांचालिक’ व ‘कालयवन’ अशी तीन छोटी नाटके समाविष्ट झाली आहेत. रेगे यांच्या या नाटकांनाही काव्याची मिताक्षरी अर्थगर्भता लाभलेली असून चित्रमयता, श्रवणसुभगता आणि चिंतनप्रेरकता ही त्यांच्या नाटकांची वैशिष्ट्ये आहेत. या नाटकांची त्यांनीच हिंदीत भाषांतरे केली आहेत. पालक (१९७५), मध्यतंर (१९७६) व चित्रकामारव्यम् (१९७७) ही त्यांची छोटी नाटकेही नियतकालिकांतून प्रसिद्ध झाली आहेत.

छांदसी (१९६२) हा त्यांच्या समीक्षालेखांचा संग्रह असून १९६८ मध्ये त्याची सुधारित आवृत्ती निघाली आहे. रेगे साहित्याला स्वतंत्र्य वस्तू मानतात. जीवन जगले तर साहित्य जगणार नसून साहित्य जगले तरच जगण्यासारखे काहीतरी उरणार आहे, असा साहित्याच्या सामर्थ्याचा त्यांनी गौरव केला आहे. कलाकृतीचे सौंदर्य तिच्या घाटात असून तिचे श्रेष्ठत्व तिच्यातील जीवनदर्शनाच्या संपन्नतेवर अवलंबून असते, असे सांगताना रेगे यांनी ‘परतत्त्वस्पर्श’ हा शब्दही वापरला आहे.

या साहित्याखेरीज त्यांनी काही शैक्षणिक पुस्तकेही लिहिली आहेत. छंद या द्वैमासिकाचे संपादन ही रेगे यांची आणखी एक महत्वपूर्ण लक्षणीय कामगिरी. भाषा, कला व साहित्य या विषयांना वाहिलेले हे एक वाङ्मयीन नियतकालिक. मराठीतील वाङ्मयीन नियतकालिकांच्या परंपरेत महत्वाची भर घालणारे. १९५४ मध्ये काही समानधर्मीयांच्या सहकार्याने त्यांनी ते सुरू केले. १९६० साली ते त्यांनी बंद केले. रेगे यांनी छंदमध्ये विपुल लेखन तर केलेच पण त्याची संपादकीय व्यावहारिक व आर्थिक बाजूही आस्थेने संभाळली. ते सरकारी नोकरीत असल्याने छंदवर संपादिका म्हणून त्यांच्या पत्नीचे, सरिता रेगे यांचे नाव छापलेले असे.

कुलकर्णी, गो. म.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here