मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार कै. विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर – कुसुमाग्रज. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले गेले. एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून ‘कुसुमाग्रज’ असे नाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर कवी ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे करतात.
वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. मराठी आभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्त्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे. मराठी कुसुमाग्रजांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणा-या आहेत. त्यांची कणा ही कविता युवकांना स्फूर्ती देणारी आहे. सामाजिक अन्याय व विषमता या विषयांवर
कुसुमाग्रजांनी त्यांच्या लिखाणातून कठोर टीका केली. “साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे” या मताचा त्यांनी पुरस्कार केला. कुसुमाग्रज, क्रांती ही साहित्याची प्रेरणा मानतात. साहित्य परिवर्तनास पूरक ठरू शकते, असे मानतात. त्यामुळे साहित्याला ते विशुद्ध कला मानत नसून सामाजिक साधन मानतात. कुसुमाग्रजांचा साहित्यविचार बा. सी. मर्ढेकर आणि कुसुमावती देशपांडे यांच्या साहित्यविचारांचा संवादसेतू आहे. मर्ढेकरांच्या नंतर मराठी साहित्यात दुर्बोधता, अश्लीलता आणि लैंगिकता हीच श्रेष्ठ साहित्याची लक्षणे रूढ होत होती, त्यावर कुसुमाग्रजांनी टीका केली आहे. मात्र त्याचबरोबर पारंपरिक नीतिमत्ता आणि श्लीलता या कल्पनांना ढोंगी ठरवून नकार दिला आहे. नाटक मूलतः वाङमय असते, नाटकाच्या पात्रांमध्ये लेखकाचे मीपण असते, असे म्हणणे त्यांच्या अहंकार-आविर्भाव सुसंगत आहे. मीपणाशिवाय अहंकार आणि आविर्भाव शक्य नाहीच.
“साहित्य ही मानवी संसारातील एक समर्थ, किंबहुना सर्वात अधिक समर्थ अशी वस्तू आहे. समाज हा संस्कृतीच्या वातावरणात जिवंत राहत असतो आणि या संस्कृतीच्या प्रवाहात सातत्य ठेवण्याचे, त्याला प्रगत करण्याचे कार्य साहित्य करीत असते. माणसे मर्त्य असतात, पण त्यांनी उच्चारलेला वाङ्मयीन शब्द मात्र अजरामर असतो. पृथ्वीवरच्या नाशवंत पसार्यामध्ये हीच एक शक्ती अशी आहे, की जिला चिरंजीवनाचे वरदान लाभलेले आहे. शब्दाच्या या शक्तीचा उपयोग करूनच संस्कृती जगत असते, पुढे जात असते. देशादेशांतील अंतर या शब्दाने कमी होते आणि युगायुगांची साखळी या शब्दानेच जोडली जाते. या प्रभावी शक्तीचे, शब्दाचे अवतारकार्य कोणते? माणसांच्या मनावर संस्कार करणे हे एकच एक त्यांचे अवतारकार्य होय. संस्कार करणे हा शब्दांचा स्वभाव आहे. साहित्य हे शब्दाश्रित असल्यामुळे तेही वाचकाच्या किंवा श्रोत्याच्या मनावर कोणते न कोणते संस्कार केल्याविना राहत नाही.”
कुसुमाग्रजांच्या या विचारात मर्ढेकरी कलाविचारातील आत्मनिष्ठा, सौंदर्य किंवा नेमाडेप्रणित लेखकाची नैतिकता, देशीयता यांपेक्षा वेगळी भूमिका दिसते. सर्व संत ज्या अहंकाराच्या विसर्जनाला महत्त्व देतात त्या अहंकाराला शिरवाडकर कलेत महत्त्वाचे मानतात. त्यांचे म्हणणे असे की, “लेखकाचा अहंकार अनन्यसाधारण रूप धारण करतो तेव्हाच लेखकाला लिहावेसे वाटते. या अहंकारामुळेच स्वतःचे स्वत्व बाहेर पल्लवीत करण्याचा एक आंतरिक आग्रह त्याच्या ठिकाणी उत्पन्न होतो. अहंकाराची ही प्रवृत्ती नुसत्या आविष्काराने नव्हे तर वर्चस्वाने समाधान पावते. हे वर्चस्व लेखकाला जवळ व दूर प्रत्यक्षात वा अप्रत्यक्षात असलेल्या वाचकांच्या संदर्भात प्राप्त होते”, असे त्यांचे म्हणणे आहे. कुसुमाग्रजांच्या मते, आविर्भावाने साहित्याचे रूप ठरते तर अनुभवाने त्याचा आशय निश्चित होतो. अनुभव या संज्ञेचा अर्थ प्रत्यक्षाशी येणारा संबंध असा नसून, लेखकाच्या मनात उद्भवणारी एक भावावस्थेतील जाणीव असा आहे. म्हणजे लौकिक अनुभवानंतरची लेखकाची भावावस्थाच कलाकृतीचा आशय निश्चित करते. “आविर्भाव आणि अनुभव यांच्या संयोगाने साहित्याचे पोत तयार होत असले तरी त्यातील धागेपणाचे स्थान अनुभवाकडे आहे… लेखकांमध्ये अहंकाराची प्रेरणा प्रबळ आहे, अविर्भावाचे सामर्थ्यही प्रभावी आहे; परंतु त्याची अनुभव घेण्याची शक्ती जर संकुचित, बोथट आणि केवळ वरच्या थरालाच स्पर्श करणारी असेल तर त्याचे साहित्य उथळ आणि घायपाताच्या रेशमी कापडासारखे दिखाऊ परंतु तकलादू होण्याची शक्यता असते.” म्हणजे, जे स्थान मर्ढेकर आत्मनिष्ठेला देतात तेच कुसुमाग्रज अनुभवाला देतात.
या अनुभवाचे अधिक विश्लेषण करताना ते म्हणतात, अनुभव प्रत्येक माणसागणिक वेगळा असल्यामुळे एकाच विषयाबाबतही सारखेपणा येत नाही. माणसे संपत नाही, माणसाचे अनुभव संपत नाही, विषय संपत नाहीत. त्यामुळे साहित्यसरितेचा प्रवाह सतत जिवंत, वाहता आणि वाढता ठेवण्याचे कार्य मुख्यत: अनुभवाकडून होत असते. शिवाय साहित्याला कलाकृतीचे स्वरूप अनुभवामुळेच येते. कुसुमाग्रज, अनुभव आणि आविर्भाव यांचा परस्पर संबंध असा स्पष्ट करतात: आविर्भाव-सामर्थ्य प्रभावी असूनसुद्धा योग्य अनुभवाच्या अभावी साहित्याला श्रेष्ठ कलाकृतीचे रूप येणार नाही. आशय आणि आकार यांत सुसंवाद असतो मात्र त्यांच्यात अभिन्नता नसते. समाजाने दिलेला शब्द, साहित्यक्षेत्रातील प्रचलित परंपरा, त्या सांभाळण्याची अथवा तोडण्याची प्रवृत्ती आणि आवश्यकता, परिसरातील बदलती परिस्थिती इत्यादी गोष्टी आविर्भावाचे नियमन करतात. “साहित्यासारख्या कलेत हे जे पारंपरिक असते, आवाहनात्मक असते, समाजाच्या जवळ जाणारे असते ते आविर्भावातून उत्पन्न होते. आणि याच्या पलीकडचे, साहित्यकृतीच्या अंतरंगातील गर्भागार सिद्ध करणारे, त्या ठिकाणी एका नवीन जीवनाची आपल्याला देणगी देऊन आपले व्यक्तिगत जीवन परमेश्वराच्या साहाय्याशिवाय द्विगुणित करणारे, साहित्याला अजरामरता देणारे, जे काही असते ते या अनुभवामुळेच आपल्याला लाभते.”
कुसुमाग्रजांच्या मते, काव्य हा माणसाच्या भोवतालच्या परिसराशी असलेला संवाद होय. आपल्याला उत्कटपणे जाणवलेले दुसर्यापर्यंत पोहोचवणे ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. काव्यातून हा अनुभव दुसर्यापर्यंत पोचतो तेव्हा कवीला मीपण व्यापक झाल्याचे समाधान मिळते म्हणजे त्याचा अहंकार सुखावतो. एकाचा अनुभव अनेकांचा होतो. कुसुमाग्रजांच्या मते, हीच काव्यलेखनाची प्रक्रिया व प्रेरणा होय. येथे शब्दांच्या द्वारा कवीचे व्यक्तित्व बाहेर पल्लवीत होते. कवी काव्याच्या साह्याने एक सामाजिक संबंध जोडीत असतो. अशाप्रकारे काव्य म्हणजे अखेरत: कवी आणि वाचक यांच्यामधला एक शब्दांकित, प्रतिमामय संबंध होय.
काव्य हा कवीचा आत्मविष्कार असला तरी आत्माविष्काराची परिणती जेव्हा शब्दांच्या द्वारा संवादात होते, तेव्हाच काव्याचा उदय होतो. हा आविष्कार जेव्हा शब्दाचा म्हणजे सामाजिक व्यवहाराच्या माध्यमाचा आश्रय घेतो, तेव्हा तो काव्यरूप पावतो. शब्द ही एक सामाजिक घटना आहे. म्हणून शब्दांचा वापर करणे म्हणजे स्वतःकडून इतरांकडे, आविष्कारातून संवादाकडे जाणे होय. यात शब्दांची निवड असते आणि छंद, यमक, लय आणि प्रतिमा यांचीही योजना असते, असे कुसुमाग्रज म्हणतात. म्हणजेच काव्यातील आविष्कारात कल्पना आणि रचना यांचेही पदर विणले जातात.
शब्दांची सामाजिकता आणि कवीची कल्पकता यांची प्रक्रिया येथे घडून येते. या प्रक्रियेचे आणखी स्पष्टीकरण ते करतात: “नदीचे वाहते पाणी एखाद्या खड्ड्यात थांबते, साचते आणि तिथे डोह तयार होतो. त्याप्रमाणे जीवनासंबंधीच्या प्रतिक्रिया काही व्यक्तित्वात थांबतात, साचतात, आणि काव्याला जन्म देतात. ही निर्मितीदेखील पूर्णतः स्वयंभू नसते, तर अपरिहार्यपणे संस्कारित असते. हे संस्कार पूर्वसूरींचे असतात, प्रचलित ज्ञानाचे असतात, आणि ज्या परिसरात कवी जन्मतो, वावरतो, त्या परिसराचेही असतात.”
शिरवाडकरांचे आनंद हे पुस्तक काव्याचे उत्तम उदाहरणआहे. त्यातील आनंदच्या मुखी गुंफलेल्या कविता मनाचा ठाव घेतात.
‘नटसम्राट’ या महान नाट्यकृतीसाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आणि १९८८ साली ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला.