अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी कै. भास्कर रामचंद्र तांबे. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि ग़ज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली.
काव्यास विशेष अनुकूल नसणाऱ्या व्यवसायांतही तांब्यांचा काव्यलेखनाचा छंद कायम राहिला. इंग्रजी स्वच्छंदतावादी संप्रदायाचे कवी, टेनिसन–ब्राउनिंग हे पुढील कवी, जयदेव हा संस्कृत कवी तसेच रवींद्रनाथ टागोर यांच्या काव्याचे संस्कार त्यांच्यावर वेळोवेळी होत गेले परंतु त्यांच्या कवितेचे मुख्य स्वरूप गीतांचे, भावगीतांचे राहिले. ब्राउनिंगच्या नाट्यात्मक एकभाषितांप्रमाणे त्यांनी मराठीमध्ये प्राचुर्याने नाट्यगीते लिहिली.
कवी भा.रा. तांबे हे मराठी काव्यसृष्टीमध्ये फुललेले व रसिकतेला आपल्या हजारो नवकल्पनांच्या पाकळ्यांनी भुरळ पाडणारे विलोभनीय व सप्तरंगी कमळ होते. मृत्यूसारख्या धीरगंभीर व अथांग अशा खोल विषयाला कल्पक शब्दरचनांच्या शृंखलांमध्ये बांधण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या कवितेतून केला. मृत्यू म्हणजे परमेश्वर भेटीचे एक माध्यम असल्याचे त्यांनी मानले होते. आजचा दिवस हा आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे असे समजून स्वतःचा आणि इतरांचा प्रवास सुखकर कसा होईल यासाठी प्रयत्न करावा असे त्यांनी नेहमी सुचविले.
त्यांच्या गीतपद्धतीची छाप रविकिरणमंडळातील कवी बोरकर, कुसुमाग्रज आदि पुढील कवींवरही पडली. केशवसुतादी अर्वाचीन कवितेच्या प्रणेत्यांहून स्वतंत्र राहूनच तांबे यांनी आपली स्वच्छंदतावादी कविता लिहिली. संदेश देण्याचा अभिनिवेश त्यांनी बाळगला नाही. स्वतःचे प्रेमसंतृप्त जीवन आणि इतरांच्या प्रेमाबद्दलची आस्था ह्यांतून त्यांची बहुतेक नाट्यगीते निर्माण झाली आहेत. परमेश्वरावर त्यांची दृढ श्रद्धा होती. त्यांतून काही ‘अनुभवा’ची कविता त्यांच्याकडून लिहिली गेली परंतु आध्यात्मिकतेचे स्तोम त्यांनी माजविले नाही. सुनीतरचनेमध्ये केशवसुतांना त्यांनी साथ दिली तथापि त्यामध्ये त्यांचे मन विशेष रमले नाही. एक सौंदर्यवादी आणि स्वतंत्र प्रतिभेचा कवी म्हणून त्यांचे अर्वाचीन कवींमधील स्थान फार वरचे आहे. त्यांनी रूढ केलेला गीतसंप्रदाय हा तांबेसंप्रदाय म्हणूनही ओळखला जातो.