मराठी भाषेतील अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत, कुशल छायाचित्रकार आणि त्याचबरोबर निसर्ग आणि दुर्गप्रेमी असे प्रथितयश साहित्यिक कै. गोपाळ नीलकंठ दांडेकर. गो. नी. दांडेकर ह्यांचा जन्म परतवाडा (विदर्भ) येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. वयाच्या १२ व्या वर्षी गो. नी. दांडेकर यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी पलायन केले. त्यासाठी त्यांनी सातव्या इयत्तेमध्ये शाळा सोडली. त्यानंतर गोनीदा संत गाडगे महाराजांच्या सहवासात आले. इतकेच नाहीत तर त्यानंतर ते गाडगेमहाराजांचा संदेश पोहचवण्यासाठी गावोगाव हिंडले. नंतर गोनीदांनी वेदान्ताचा अभ्यास करणे सुरू केले. पुढे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बनले. १९४७ मध्ये गोनीदांनी लेखनकार्यावर जीवितार्थ चालविण्याचा निर्णय घेतला, आणि त्यांनी पुढील आयुष्यात कुमारसाहित्य, ललित गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले. त्यांच्या ‘पडघवली’ आणि ‘शितू’ ह्या कादंबऱ्या कोकणचे नयनरम्य चित्र डोळ्यासमोर उभे करतात. त्यांचे ‘दुर्गभ्रमणगाथा’ हे महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे.
गो.नी. दांडेकरांच्या कादंबऱ्यांच्या वाचनाचा सार्वजनिक कार्यक्रम वर्षातून अनेकदा होतो. या उपक्रमाची सुरुवात १९७५ मध्ये प्रत्यक्ष गोनीदांनी केली. संत ज्ञानेश्वरांच्या सातव्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी सर्वप्रथम ‘मोगरा फुलला’ या कादंबरीचे अभिवाचन केले होते. यामध्ये त्यांची कन्या डॉ. वीणा देव, जावई डॉ. विजय देव हे सहभागी झाले होते. कादंबरीतील कथानाट्य वाचनातून लोकांपुढे उभे करण्याच्या या अभिनव प्रयोगाचे त्या वेळी सर्वत्र स्वागत झाले होते. यानंतर गोनीदांच्या कुटुंबीयांनी या अभिवाचनाची एक चळवळच उभी केली. ‘मोगरा फुलला’च्या पाठोपाठ मग शितू, पडघवली, मृण्मयी, पवनाकाठचा धोंडी, वाघरू, जैत रे जैत, देवकीनंदन गोपाला, हे तो श्रींची इच्छा अशा एकेक कलाकृती या अभिवाचन संस्कृतीतून वाचकांना भेटू लागल्या.
गो.नी.दांडेकर यांनी पन्नास वर्षे दुर्गभ्रमण केले. या काळात त्यांनी गडाकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे काढली. त्यांपैकी निवडक अशा ११५ कृष्णधवल छायाचित्रांचे एक पुस्तक ’गोनीदांची दुर्गचित्रे’ या नावाने प्रकाशित झाले आहे. हे दुर्गप्रेम त्यांनी परोपरीने जागवले. त्यांनी स्वतः जन्मभर दुर्गभ्रमंती केलीच पण ‘दुर्गदर्शन’, ‘दुर्गभ्रमणगाथा’ ह्या आपल्या पुस्तकांमधून त्यांनी दुर्गभ्रमंतीचे अनुभव शब्दबद्ध केले. मराठीतील ललित साहित्यात त्यांचे हे लेखन अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या लेखनामुळे हजारो माणसे दुर्गभ्रमंतीकडे आकर्षित झाली. त्यातल्या अनेकांना गोनीदांनी स्वतः प्रत्यक्ष दुर्गदर्शनही घडवले. ‘किल्ले’ हे त्यांचे छोटेखानी पुस्तक दुर्गप्रेमींच्या मनात मानाचे स्थान मिळवून आहे. ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘जैत रे जैत’, ‘रानभुली’, ‘त्या तिथे रुखातळी’, ‘वाघरू’, आणि ‘माचीवरला बुधा’ या त्यांच्या कादंबऱ्यांमधे त्यांनी प्रत्ययकारी दुर्गदर्शन घडवले आहे.