मराठी भाषेतील प्रसिद्ध लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी व व्याख्याते कै. हरी नारायण आपटे. आपटे अर्वाचीन मराठी कादंबरीचे जनक मानले जातात. त्यांच्या लिखाणावर महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले प्रभृतींचा प्रभाव होता. १२ सामाजिक आणि ११ ऐतिहासिक अशा एकूण २३ कादंबऱ्या लिहिणाऱ्या ह.ना. आपटयांची ‘पण लक्षात कोण घेतो?’ ही कादंबरी मराठी साहित्यात मानदंड समजली जाते. सतत २५-३० वर्षे अशाप्रकारचे मराठी साहित्य निर्माण झालेल्या त्या ह.ना.आपट्यांच्या कालखंडाला ‘हरीभाऊ युग’ म्हणतात, आणि हरीभाऊ आपट्यांना युगप्रवर्तक.
त्यांची कादंबरी अवतरताच मराठी कादंबरीने प्रगतीचा एक फार महत्त्वाचा टप्पा गाठला. अनेक अनिष्ट वाङ्मयीन संकेतांतून मराठी कादंबरीस त्यांनी मुक्त केले. तिला अद्भुत आणि असंभाव्य घटनांच्या पकडीतून सोडवून वास्तवतेच्या दिशेने विकसित केले. कादंबऱ्यांनी केवळ मनोरंजन करण्याऐवजी समाजास सद्बोध करून सन्मार्गास लावावे, अशा बोधवादी भूमिकेतून लिहूनही त्यांच्या कादंबऱ्या प्रचारपुस्तकांच्या पातळीवर आल्या नाहीत. कादंबऱ्यांची प्रकरणे मासिकांतून क्रमशः लिहिण्याच्या पद्धतीमुळे पाल्हाळिक भाषाशैली, प्रमाणबद्धतेचा अभाव, गौण्यगोपनाच्या अतिरेकामुळे अनेकदा होणारी रसभंग इ. दोष त्यांच्या कादंबऱ्यांत दिसतात. तथापि त्यांची दखल घेऊनही आधुनिक मराठी कादंबरीचे जनक म्हणून त्यांचे मानाचे स्थान मान्य करावे लागते.
हरिभाऊंनी नाटकेसुद्धा लिहिली आहेत. दोन नाटके स्वतंत्र आहेत, त्यांतले ’सती पिंगळा’ हे नाटक त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. उरलेली तीन नाटके व तीन प्रहसने रूपांतरित आहेत. धूर्तविलसत, मारून मुटकून वैद्यबुवा व जबरीचा विवाह ही फ्रेन्च नाटककार मोलियरच्या प्रहसनांची रूपांतरे आहेत तर, जयध्वज (मूळ व्हिक्टर ह्यूगोचे ‘हेर्नानी’), श्रुतकीर्तचरित (कॉग्रेव्हचे ’द मोर्निंग ब्राइड’) व सुमतिविजय (शेक्सपियरचे ’मेझर फॉर मेझर’) ही रूपांतरित नाटके आहेत. त्यांनी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या तेराव्या वार्षिक सभेपुढे दिलेल्या व्याख्यानांची पुस्तिका ’विदग्धवाङ्मय’ या नावाखाली प्रकाशित झाली होती. बिचारा या टोपणनावाने ह.ना. आपट्यांनी २९ मार्च, इ.स. १८८१च्या केसरीच्या अंकात कालिदास व भवभूती यांच्या संबंधांत लिहिलेल्या पत्रांतून त्यांचा व्यासंग व समीक्षा दृष्टी दिसून येते. निबंधकार चिपळूणकर यांच्या निधनानंतर हरीभाऊ आपट्यांनी शिष्यजनविलाप ही ८८ श्लोकांची विलापिका लिहिली होती. ती विद्वज्जनांनी वाखाणली होती.
‘केसरी’ आणि ‘सुधारक’ यांची खडाजंगी एका बाजूला सुरू असताना आपटे लोकरंजनाच्या द्वारा लोकजागृती करण्यासाठी त्यांनी करमणूक हे स्वतंत्र नियतकालिक सुरू केले होते. पहिल्या अंकात त्यांनी ‘करमणूक’चा उद्देश सांगितला होता तो असा – ‘‘केसरी, सुधारक एखाद्या कठोर पित्याप्रमाणें कठोर शब्दाने सांगणार व समाजाचे अप्रशस्त वर्तन झाल्यास वेळी वाक्प्रतोदाचे तडाके लगावणार, तीच गोष्ट हे पत्र प्रेमळ मातेप्रमाणे गोड गोड शब्दांनी व चांगल्या चांगल्या गोष्टींनी अप्रशस्त वर्तनाबद्दल मायेचे शासन करणार. एवढे मात्र ध्यानांत ठेवावे, की हे पत्र आचरट आईप्रमाणे फाजील लाड करणार नाही.. ज्यास पुढल्या माडीपासून चुलीपर्यंत व दिवाणखान्यांतील टेबलापासून फणीकरंडय़ाच्या पेटीपर्यंत कोणाच्या हाती पडले तरी हवे त्याने, हवे त्याच्या देखत नि:शंकपणें वाचण्यास हरकत नाही, असे पत्र पाहिजे असेल तर त्यांनी अवश्य करमणुकीचे वर्गणीदार व्हावे.. शनिवारी संध्याकाळी थकून भागून आल्यावर आपल्या कुटुंबांतील लहानमोठ्या माणसांस जमवून खुशाल हंसत खेळत करमणूक करून ज्ञान मिळविण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांचे आम्ही नम्र सेवक आहोत.’’
सौजन्य : कुलकर्णी, अ. र.