मराठी साहित्यातील ज्येष्ठ कादंबरीकार, चरित्रलेखक, ललितलेखक शिवाजी सावंत. भव्योदात्त जीवनांबद्दल त्यांना वाटणारा आदर मृत्युंजय ते युगंधर पर्यंतच्या त्यांच्या तीनही कादंबऱ्यांमधून उत्कटपणे प्रकट होतो. छावामध्ये जनमानसात संभाजी महाराजांबद्दल निर्माण झालेली नकारात्मक स्वरूपाची प्रतिमा पुसून त्या जागी औरंगजेबाने दिलेल्या क्रूर मृत्युदंडाच्या शिक्षेला धीरोदात्तपणे सामोरे जाणारे, आपले राजेपद जबाबदारीने आणि विवेकाने सांभाळणारे संभाजी महाराज ते उभे करतात. त्यासाठी त्यांनी संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या भोवतालच्या परिस्थितीचा मानसशास्त्रीय अंगाने विचार केला. भारतीय ज्ञानपीठाने ह्या कादंबरीचे हिंदी भाषांतर प्रसिद्घ केले आहे.
श्रीकृष्णाच्या जीवनातले जे चमत्कार सांगितले जातात, ते वगळून श्रीकृष्ण दाखविणे हा युगंधर लिहिण्यामागचा त्यांचा हेतू होता. श्रीकृष्णासारखा एक माणूस भगवानपदापर्यंत पोहोचतो त्याचप्रमाणे श्रीकृष्णासारखे आचरण आपण करू शकू असा विश्वास सर्वसामान्य माणसातही निर्माण होण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन तो विश्वास जागृत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण केला आहे, असे त्यांचे प्रतिपादन होते. जीवनमूल्य नष्ट होत असताना आणि त्यामुळे सामाजिक विघटनाचा अनुभव येत असताना भारतीय मिथकांचा आणि इतिहासाचा आधार घेऊन मानवी जीवनातील आत्मिक शक्तींचा त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून पुरस्कार केला. मृत्युंजय आणि छावा ह्या कादंबऱ्यांची नाट्यरूपेही त्यांनी निर्माण केली.
ह्या साहित्यकृतींच्या व्यतिरिक्त सावंत यांनी जे लेखन केले, त्यांत लढत (दोन भाग–१९८६) आणि संघर्ष (१९९५) ह्या दोन जीवनकहाण्यांचा अंतर्भाव होतो. लढत ही सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे-पाटील ह्यांची, तर संघर्ष ही प्रसिद्घ कामगारनेते मनोहर कोतवाल ह्यांची जीवनकहाणी. आपल्या जीवनात हाती घेतलेल्या कामासाठी ध्यास घेऊन काम करणारी ही माणसे त्यांना चरित्रकथनासाठी योग्य वाटली. ह्यात त्यांची उदात्ततेकडे पूर्णपणे झुकलेली मानसिकता पुन्हा एकदा प्रत्ययास येते. अशी मने असे नमुने (१९७५) आणि मोरावळा (१९९८) मध्ये त्यांनी वेगवेगळ्या माणसांची व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. अशी मने असे नमुने मध्ये त्यांच्या जीवनाशी एकरूप झालेली, त्यांच्यावर प्रेम करणारी, निर्मळ मनाची माणसे त्यांनी रंगविलेली आहेत, तर मोरावळामध्ये त्यांना भेटलेली शिक्षण, समाजकारण, राजकारण, प्रकाशन, साहित्य अशा क्षेत्रांतील कर्तृत्ववान माणसे त्यांनी शब्दचित्रित केली आहेत. प्रकाशक अनंतराव कुलकर्णी, साहित्यिक ग. दि. माडगूळकर, ना. सं. इनामदार, शिक्षणाच्या क्षेत्रातील अशोक गगराणी, राजकीय नेते यशवंतराव चव्हाण ही मोरावळामधील काही व्यक्तिचित्रे होत. सावंत यांनी ही दोन पुस्तके लिहून मराठीतील व्यक्तिचित्रणात्मक साहित्य अधिक संपन्न केले. शेलका साज (१९९४) मध्ये त्यांचे ललित लेख अंतर्भूत आहेत.
बडोदे येथे १९८३ मध्ये भरलेल्या ‘बडोदे मराठी साहित्यसंमेलना’चे ते अध्यक्ष होते. १९९७ मध्ये पुणे महानगरपालिकेतर्फे त्यांना सन्मानपत्र देण्यात आले. कोल्हापूर येथे १९९८ मध्ये भरलेल्या सातव्या कामगार साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना १९९९ मध्ये मिळाला. २००० मध्ये ‘कोल्हापूरभूषण’ म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. भारत सरकारच्या मानव संसाधन व सांस्कृतिक कार्यालयाकडून त्यांना ज्येष्ठ साहित्यिक शिष्यवृत्ती देण्यात आली होती.