– मानसी बोडस / लेख / #मानसीअद्वैत /
नलुबाई: आई गं! खूप दुखतंय रे आज पाठीत! (नलूबाई लेकाकडे मन हलके करत होत्या)
बोलता बोलता अचानक पाठीत कळ आली “आआ, अगं माझं” (दोन मिनिटे त्या श्वास धरून बसल्याच)
(सुनेनी पटकन पाठीवरून हात फिरवला) “आई इथे दुखतंय का?”
नलुबाई: “नाही गं बरे वाटतेय पण आता”
ह्यात काही नलुबाई खोटं बोलत नव्हत्या किंवा सुनेनी केलेल्या त्या स्पर्शात जादूही नव्हती पण जादू मात्र झाली ती ‘स्पर्शानी’.
कित्येक आजारपणात आपल्या आजी, आई ह्यांचा झालेला मायेचा स्पर्श. बाबा किंवा वडील माणसांचा शाबासकीचा स्पर्श, हळहळ व्यक्त करताना पाठीवर मित्राने ठेवलेला हात तोही स्पर्शच, एखाद्या मित्र/ मैत्रिणीला किंवा अगदी एखादया अनोळखी पण भारतीय माणसाला एका अनोळख्या प्रदेशात मारलेली मिठी हाही एक स्पर्शच. आपण प्रेमात पडलो की त्या व्यक्तीचा हात धारावासा वाटतो कारण त्या स्पर्शातून आपले प्रेम तिला अथवा त्याला कळत असावे.
कित्येक प्रकारचे असतात हे स्पर्श पण त्यांच्यामुळे जिवंत होतात माणसे, त्यांची नाती. त्यांच्यातले हेवेदावे दूर करण्याचे असीम सामर्थ्य असलेले हे स्पर्शच असतात.
एखाद्या दुखऱ्या हळव्या जखमेवर अलगद फुंकर घालणारे हे स्पर्श नक्की जपा. आपल्या माणसाला नमस्कार करताना, किंवा आशीर्वाद देताना, आनंद दुःख व्यक्त करताना, एखादा स्पर्श खूप काही सांगून जातो, शब्दांची गरज स्पर्श पूर्ण करू शकतो.
तेव्हा आपल्यातल्या ह्या असीम ताकदीवर विश्वास ठेवा आणि आपल्या माणसांना ह्या सुंदर अनुभूतीपासून वंचित ठेवू नका. एखादी आजी आजोबा किंवा हळवे मन तुमच्या स्पर्शाने नक्कीच प्रफुल्लित होईल.
फक्त सध्या Covid-19 च्या काळात आपण हात स्वच्छ धुऊन disinfect करून मगच कोणालाही स्पर्श करा .
हा जादूचा स्पर्श नक्की तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तींना कोणत्याही असाध्य रोगातून negativity मधून बाहेर काढेल.