प्रतिभावान हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतकार व गायक गणेश नवाथे

0
1018
Pt Jitendra Abhisheki Sahityakalp

प्रतिभावान हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतकार, संगीतज्ञ व गायक पं. जितेंद्र अभिषेकी. त्यांचे मूळ नाव गणेश आडनाव नवाथे; पण मंगेशी देवस्थानातील पूजा व अभिषेक सांगणारे भिकाजी (बाळुबुवा) यांचे पुत्र म्हणून आडनाव अभिषेकी झाले. सुस्पष्ट उच्चार, लयकारी व सरगम यांनी नटलेली ख्यालगायकी आणि विशेष कटाक्ष ठेऊन मांडलेल्या बंदिशी हे त्यांच्या गायनाचं मर्म होतं.

अभिषेकींचा जन्म गोव्यातील मंगेशी येथे झाला. त्यांचे वडील भिकाजी कीर्तनकार होते. वडिलांना कीर्तनात लहानपणी साथ केल्याने स्वर, ताल, लय व उच्चार यांची त्यांना चांगली जाण आली. संगीताचे सुरुवातीचे धडे त्यांनी जितेंद्रांना दिले. संगीताबरोबर संस्कृत भाषाही त्यांना शिकविली. बांदिवड्याच्या गिरिजाबाई केळेकर या त्यांच्या पहिल्या गुरू. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात अनाथाश्रमात राहून, वारावर जेवून, माधुकरी मागून ते शिकले. त्यांनी एकूण २१ गुरु केले व प्रत्येक गुरुकडून नेमकं तेवढंच घेतलं. ते सारे संस्कार आत्मसात करून आपली स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. शालेय शिक्षणासाठी १९४३ साली ते पुण्यात आले. १९४९ मध्ये ते शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. मराठी, कोंकणी, पोर्तुगीज, इंग्रजी आदी भाषा त्यांना अवगत होत्या. पुण्यात नरहरबुवा पाटणकर व यशवंतराव मराठे यांच्याकडे ते गाणे शिकले. तेथून ते बेळगावला गेले व तेथे पेटीवादक विठ्ठलराव कोरगावकरांकडून त्यांनी संगीताचे काही धडे घेतले. पुढे भवन्स कॉलेज, मुंबई येथून संस्कृत विषय घेऊन ते बी. ए. झाले (१९५२). संगीताची आराधना करत असताना त्यांनी त्यांच्या शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांचे वाचन अफाट होते. संस्कृतपासून ते उर्दु शेरोशायरी पर्यंतचे कितीतरी साहित्य त्यांना मुखोद्गत होते.

मुंबई आकाशवाणी केंद्रात कोंकणी विभागात संगीत संयोजक म्हणून ते रूजू झाले (१९५२). नोकरी करीत असतानाच उस्ताद अझमत हुसेन खाँसाहेब यांच्याकडून गायनाचे मार्गदर्शन घेण्याची संधी त्यांना मिळाली. शास्त्रीय संगीताच्या अभ्यासासाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर (१९५९) ज्येष्ठ गायक जगन्नाथबुवा पुरोहित (गुणीदास) यांच्याकडून त्यांना दीर्घकाळ तालीम मिळाली. याबरोबरच अभिषेकी यांनी निवृत्तीबुवा सरनाईक, रत्नाकर पै, अझिझुद्दीन खाँ, मास्टर नवरंग, केसरबाई बांदोडकर इत्यादींकडून मार्गदर्शन घेऊन आपली गायकी अधिक समृद्ध केली. त्यानंतर त्यांनी गुलुभाई जसदनवालांकडून जयपूर घराण्याच्या गायकीची काही वैशिष्ट्ये आत्मसात केली. विविधांगी व्यासंगामुळे आपली अशी स्वतंत्र शैली त्यांनी निर्माण केली. गमकयुक्त स्वरावली, प्रतिमेचा स्वतंत्र आविष्कार, उत्कट, भावनापूर्ण आणि सौंदर्यप्रधान प्रस्तुती, रागभावाला आणि रागस्वरूपाला योग्य स्वराकृती देत केलेले आम आणि अनवट रागांचे गायन आदी गोष्टींमुळे त्यांचे सादरीकरण अविस्मरणीय होत असे.

भावपूर्ण आवाजातील सुंदर व संथ अशी आलापी, मोकळा, स्वच्छ व दीर्घकाळ लावलेला षड्ज, अप्रतिम लयकारी, आग्रा गायकीची वैशिष्ट्ये दाखविणारी बोलबनावाची पखरण आणि मग आक्रमक गायकीचा प्रभावी आविष्कार, शब्दांची फेक, भरपूर दमसास व त्याच दमसासाने जाणारी तनाईत ही त्यांच्या ख्यालगायकीची गुणवैशिष्ट्ये होत. मैफलीत ते विशेषकरून अनवट रागांतील (उदा. खोकर, जैत, चारुकेशी, कौंसगंधार, मिश्र शिवरंजनी इत्यादी) नवनव्या बंदिशी सादर करीत असत. ‘श्यामरंग’ या टोपणनावाने त्यांनी विविध रागात बंदिशी केल्या. अभिषेकी अगदी सहजपणे नाट्यगीते, अभंग, भावगीत, ठुमरी, दादरा, कजरी, टप्पा आदी उपशास्त्रीय प्रकार रंगवीत. स्पष्ट उच्चारण पद्धतीने विशिष्ट शैलीत ते अभंग म्हणत. त्यांची अभंग गायनाची पद्धती चित्तवेधक होती. त्यांच्या या गायनात वारकरी संप्रदायाप्रमाणे नामसंकीर्तनाची छटा अधिक असे. ते नाट्यगीते शांत, सुंदर व एका विशिष्ट लयीत आणि अर्थानुकूल चालीत म्हणत.

अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे. विद्याधर गोखल्यांच्या नंतरच्या काळात मराठी रंगभूमीला आलेली मरगळ दूर करून रंगभूमी पुन्हा टवटवीत झाली ती १९६४ साली आलेल्या वसंत कानेटकर लिखित आणि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित संगीत मत्स्यगंधा या नाटकामुळे. या नाटकातल्या पदांचं संगीत अभिषेकींचे होतं. त्यांनी एकूण १७ नाटकांना संगीत दिलं. गोवा कला अकादमीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातला महत्त्वाचा गुणधर्म. त्यांनी त्यांच्या संगीतदिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांनाही खूप आवडले. उदा. मैलाचा दगड ठरलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाची सुरुवात त्यांनी भैरवीने केली होती. तर १९६६ साली रंगभूमीवर आलेल्या लेकुरे उदंड झाली या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्र या नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला. या नाटकात सगळ्यात पहिल्यांदा रेकॉर्डेड साऊंड ट्रॅक्स वापरले गेले. हे संगीत काळाच्या पुढे जाणारं होतं.

त्यांनी लोणावळा या गिरीस्थानात गुरुकुल पद्धतीने सुमारे दहा वर्षे संगीताचे शिक्षण दिले. पुढे पुण्यात स्थायिक झाल्यावरही (१९८७) त्यांनी काही शिष्यांना गुरूकुल पद्धतीने संगीत शिक्षण दिले. शिवाय त्यांनी ‘तरंगिणी प्रतिष्ठान’ हा विश्वस्त न्यास स्थापण्यात पुढाकार घेतला. होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, वृद्ध कलावंतांना मदत आदींसाठी हा निधी होता. होमी भाभा संशोधन केंद्राकडून ‘लोकनाट्यातील संगीत’ या विषयावरील संशोधनासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. त्याद्वारे त्यांनी प्रदेशपरत्वे कुडियाट्टम, मोहिनीआट्टम्, कथकली, माच, नौटंकी, दशावतार इत्यादी लोकनाट्यातील संगीताचा अभ्यास केला. पं. रविशंकर यांच्याबरोबर ते १९७० मध्ये अमेरिकेस गेले, तेथे सुमारे पाच ते साडेपाच महिने त्यांनी ‘किन्नरम’ या त्यांच्या संस्थेत विद्यादानाचे कार्य केले.

संदर्भ : दरेकर, मोहन, माझे जीवन गाणे, मधुश्री प्रकाशन, पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here