भारतीय आधुनिक साहित्याचे निर्माते, मराठी भाषेचे निबंधकार, लेखक, पत्रकार कै. विष्णुशास्त्री चिपळूणकर. विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा जन्म मे २०, १८५० रोजी महाराष्ट्रातील पुणे शहरात झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील पूना कॉलेज व डेक्कन कॉलेज या महाविद्यालयांमध्ये झाले. १८७१ साली चिपळूणकरांनी पदवीचा अभ्यासक्रम पुरा केला.
विष्णुशास्त्री यांनी इतिहास, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र व नीतिशास्त्र या विषयांचा तसेच इंग्रजी, संस्कृत व मराठी या भाषांतील उत्तमोत्तम ग्रंथाचा सखोल अभ्यास केला होता. बी.ए. होण्यापूर्वी विष्णुशास्त्री आपल्या वडिलांच्या ’शालापत्रक’ या मासिकाचे कामकाज पहात असत. शालापत्रकातून केलेल्या ब्रिटिश सरकारचे धोरण व ख्रिश्चन मिशनरी यांवरील टीकेमुळे, ते मासिक ब्रिटिशांनी इ.स.१८७५मध्ये बंद पाडले. पण त्यापूर्वीच विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी एकहाती मजकूर असलेले निबंधमाला हे मासिक (पहिला अंक : २५ जानेवारी १८७४) सुरू केले होते. ते सात वर्षे अखंड चालले. १८७४ साली चिपळूणकरांनी निबंधमाला हे मासिक प्रकाशन आरंभले.
१८७४ सालापासून हयात असेपर्यंत, म्हणजे सुमारे आठ वर्षे, त्यांनी निबंधमाला चालवली. निबंधमालेतील निबंधांतून त्यांनी तत्कालीन ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध टीकात्मक लिखाण, तसेच साहित्यिक लिखाणही लिहिले. त्यांनी १८७८ साली महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी लोकांची जाणीव वाढवण्याच्या व सामान्यजनांची काव्याभिरुची घडवण्याच्या हेतूने काव्येतिहास संग्रह हे मासिक सुरू केले. त्याच वर्षी त्यांनी पुण्यात आर्यभूषण छापखाना व चित्रशाळा स्थापण्यात पुढाकार घेतला. १८७५ साली मराठी समाजाला प्रेरित करणारे साहित्य उपलब्ध करण्याच्या हेतूने किताबखाना नावाचे पुस्तकांचे दुकान उघडले.
उमलत्या पिढीला ‘राष्ट्रीय शिक्षण’ देण्याच्या उद्दिष्टातून, १८८० साली त्यांनी बाळ गंगाधर टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल शाळा स्थापली. १८८१ सालाच्या जानेवारीत त्यांनी केसरी हे मराठी व मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले. चिपळूणकरांच्या मृत्यूनंतर बाळ गंगाधर टिळकांनी ही दोन्ही वृत्तपत्रे पुढे चालवली. त्यांनी, आपल्या वडिलांच्या शालापत्रक या मासिकात कालिदास, भवभूती, बाण, सुबंधु व दंडी या पाच संस्कृत कवींवर स्वतंत्र लेख लिहिले होते. त्या लेखामध्ये कवींची उपलब्ध माहिती आणि त्यांच्या काव्यांचे, जरूर तेथे उतार्यांसहित, रसपूर्ण विवरण असे. निबंधकार, मराठी साहित्याला आणि भाषेला आधुनिक आणि दर्जेदार असे वळण देणारा महापुरुष म्हणून विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा उल्लेख होतो.
आधुनिक भारतीय साहित्याचे निर्माते विष्णुशास्त्री चिपळूणकर
Advertisement