हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जयपूर-अत्रौली घराण्याचे अग्रगण्य गायक पंडित निवृत्तीबुवा सरनाईक. निवृत्तीबुवांनी आठ वर्षांचे असताना चलती दुनिया या हिंदी संगीत-नाटकात तोता-मैना या पात्रांपैकी ‘तोता’ हे पात्र साकारले. पुढे १४ वर्षांचे झाल्यावर नायिकेच्या भूमिकाही त्यांनी केल्या. काही काळ संगीत नाटकांत स्त्री-भूमिका करून त्यांनी नाव मिळवले. त्यांची सत्याग्रही या नाटकातील नारदाची भूमिका खूप गाजली. या काळात त्यांना सवाई गंधर्व यांच्याकडून किराणा घराण्याच्या स्वरमाधुर्यप्रधान गायकीची तालीम मिळाली. काका शंकरराव यांना ख्यालगायकी शिकण्याचा खूपच नाद होता; मात्र नाटक मंडळीच्या व्यापातून तालीम घ्यायला त्यांना वेळ होत नसे. अशा वेळी उस्तादांनी आपला पुतण्या निवृत्तीस शिकवावे, असे ते सांगत. त्यामुळे निवृत्तीबुवांना उस्ताद रजब अलीखाँ आणि उस्ताद अल्लादियाखाँ या दोघांचीही तालीम मिळाली. त्यांच्या गायनात किराणा व जयपूर-अत्रौली या दोन्ही गायकींचा सुरेख मिलाप झालेला दिसतो. १९३४ साली नाटक मंडळी बंद पडल्याने निवृत्तीबुवा कोल्हापुरास परतले आणि गवई म्हणून मैफली पेश करू लागले. देवल क्लबमध्ये त्यांचा पहिला जलसा झाला. पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकाता इत्यादी ठिकाणी त्यांचे कार्यक्रम होत असत.
माधुर्यपूर्ण स्वरोच्चार, सुरेल, लोचदार आलापकारी, लयक्रीडा करणारे बोलबनाव व बोलताना, स्वर व लयबंधांच्या गुंतागुंतीमुळे स्तिमित करणारी तयारीची तानक्रिया ही त्यांच्या ख्यालगायकीची वैशिष्ट्ये होती. ज्या काळात विशिष्ट घराण्याच्या गवयाचा गंडा बांधून तालीम घेऊन त्याच घराण्याची गायकी पेश करण्याबद्दलचे निर्बंध कडक होते, त्या काळात विविध घराण्यांतील गायनतत्त्वांचा मिलाप करून स्वत:ची गानप्रतिमा निर्माण करणे ही बंडखोरी मानली जाई. जयपूर-अत्रौली घराण्याच्या कक्षा रुंद करणारी, स्वत:ची अशी ढंगदार गायकी निवृत्तीबुवा गात असत. त्यामुळे त्यांच्या पिढीतील एक बंडखोर गायक म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांचे सांगीतिक विचारही तेव्हाच्या चाकोरीबाहेरचे, खुले असे होते. यमन, तोडी, शुद्धकल्याण अशा आम रागांसह विराट भैरव, बडहंस सारंग, लक्ष्मी तोडी, बहादुरी तोडी, फुलश्री, विहंग, वराटी, रूपमती मल्हार, पटमंजरीचे प्रकार, गौडबहार, ललतबहार इ. अनवट रागांचीही प्रभावी पेशकश ते करीत. मैफलीचा समारोप ते बऱ्याचदा ‘मालवी’ या रागातील ‘आयो फागुन मास’ या बंदिशीने करीत. निवृत्तीबुवांकडे अनेक आम व अनवट रागांतील विविध ढंगांच्या बंदिशींचा खजिना होता. त्यांनी पतियाळाचे ‘तान कप्तान’ फतेह अली यांचे चिरंजीव आशिक अली यांच्याकडूनही अनवट रागांतील सुंदर बंदिशी प्राप्त केल्या होत्या. त्यांनी पारंपरिक बंदिशींच्या संग्रहाबरोबरच स्वत:ही काही चीजा बांधल्या. उदा. कित ढूंडन जाऊं (संपूर्ण मालकंस), ध्रुवमंडल प्रसार हुआ (ललितागौरी) इत्यादी. तसेच काही जुन्या चीजांना थोडे वेगळे आकर्षक रूपही दिले.
सरदारबाई कारदगेकर, आझमबाई, प्रभुदेव सरदार, विजया जाधव-गटलेवार, मुरलीधर पेठकर, लाडकूजान, पुरुषोत्तम सोळांकूरकर, पंचाक्षरी मत्तीकही, दिनकर पणशीकर, रमेश गणपुले, ज्योत्स्ना मोहिले, प्रसाद सावकार, नीलाक्षी जुवेकर, सुधाकर डिग्रजकर, विनोद डिग्रजकर, लता गोडसे, प्रसाद गुळवणी, प्रभा अत्रे हे त्यांचे काही शिष्यगण. तसेच किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेकी, जयश्री पाटणेकर, पद्मा तळवलकर इत्यादी कलाकारांनाही त्यांचे मार्गदर्शन लाभले. अरुण कशाळकर व उल्हास कशाळकर या गायकांवर निवृत्तीबुवांच्या तानक्रियेचा ठळक प्रभाव दिसून येतो.