सर्व देवी देवतांच्या आरतीनंतर म्हटली जाणारी ‘घालीन लोटांगण’ ही प्रार्थना चार वेगवेगळ्या कालखंडात, वेगवेगळ्या संत-महात्म्यांनी रचली आहेत. ही चारही कडवी श्रीकृष्णाला उद्देशून त्याचे गुणगान करणारी आहेत.
पहिले कडवे –
घालीन लोटांगण वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।
प्रेमें आलिंगीन आनंदे पूजन ।
भावे ओवाळिन म्हणे नामा ।।
संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे.
अर्थ : श्रीकृष्णाला उद्देशून संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रुप पाहीन. तसेच मी तुला प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन.
दुसरे कडवे –
त्वमेव माता पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धु: सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव ।।
आद्यगुरु शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे. हे आठव्या शतकात संस्कृतमध्ये लिहिले गेले आहे.
अर्थ : प्रथमतः तूच माझी माता तदनंतर पिता, त्यानंतर तूच माझा बंधू आणि मित्र आहेस, तूच माझे ज्ञान आणि शेवटी (द्रविणं) धन-संपत्ती आहेस. तूच माझे सर्वस्व आहेस.
तिसरे कडवे –
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा ।
बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् ।
करोनि यज्ञत सकलं परस्मै ।
नारायणायेती समर्पयामि ।।
श्री वेदव्यासांनी लिहिलेली ही रचना श्रीमदभगवत् पुराणातील आहे.
अर्थ : हे नारायणा, माझी काया, माझी वाचा, माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी, माझी प्रकृती तसेच माझा स्वभाव यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला ‘नारायणाला’ समर्पित करीत आहे.
चौथे कडवे –
अच्युतं केशवं राम नारायणम्
कृष्णदामोदरं वासुदेवं हरी।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम्
जानकीनायकं रामचंद्र भजे ।।
आद्यगुरु शंकराचार्यांच्या ‘अच्युताष्टकम्’ मधील आहे.
अर्थ : मी त्या अच्युताला, केशवाला, रामनारायणाला, श्रीधराला, माधवाला, गोपिकावल्लभाला, श्रीकृष्णाला, जानकी नायक श्रीरामचंद्राला भजतो.
हरे राम हरे राम l
राम राम हरे हरे l
हरे कृष्ण हरे कृष्ण l
कृष्ण कृष्ण हरे हरे ll
हा सोळाअक्षरी मंत्र ‘कलीसंतरणं’ या उपनिषदातील आहे. हा मंत्र श्रीराधाकृष्णाला समर्पित आहे. अशी ही वेगवेगळ्या कवींची, मराठी आणि संस्कृत भाषेत रचलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे.
खूप छान माहिती आहे. स्तुत्य….
Thank you..
Very informative. Appreciable
Thank You..