गच्चीभर चांदणं

0
538

– मेघना अभ्यंकर / ललितलेख

खरंतर मला रात्री एकटीला झोपायला भीती वाटते, म्हणजे मी एकटी झोपू शकत नाही, कुणी भुत-बीत येईल, कुणी घाबरवेल, वाईट स्वप्न पडतील असं म्हणून नाही पण लहानपणापासूनच मला पूर्ण अंधारात झोपता येत नाही, म्हणजे डोळे मिटतच नाहीत. झोपले असेन आणि लाईट गेली तरी मी दचकुन ओरडत उठते. त्यामुळे, झोपायच्या खोलीत डिम लाईट आहे का?, शेजारी झोपणाऱ्या माणसाला वेळ प्रसंगी उठवता येईल का? याचा आधी विचार करते आणि मगच झोपते. शिवाय मला मेणबत्ती पेटवता येत नाही. त्यामुळे, कधी रात्री लाईट गेली तर ती येईपर्यंत मी तशीच बसून राहते किंवा दचकुन उठले तर शेजारचा माणूस रॉकेलचा दिवा, चिमणी, लहान मेणबत्ती, अगदी गरज पडली तर बॅटरीचा टॉर्च चालू करुन जातो तेव्हा कुठे मी परत झोपते.

पण, गच्चीत झोपले तर मात्र यातलं काही घडत नाही. रात्री चंद्राचा प्रकाश गच्चीभर पडलेला असतो आणि तो काही लाईट नाहीये त्यामुळे तो मध्येच गायब होईल अशी काही भिती नसते. त्यामुळे, घरी आलं कि मला गच्चीत झोपायला आवडतं. हो तिथे जरा लवकर म्हणजे सात वाजेपर्यंत उठावं लागतं, पण ते सोडलं तर मात्र गच्चीत झोपण्यासारखं सुख नाही. आता उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळी दिवेलागणीच्या सुमारास मी गच्चीत गादी घालून ठेवते. म्हणजे, रात्र होईपर्यंत गाद्या थंडगार होतात. घरात इतरत्र कुठेही गरमीने हाश-हुश होत असेल तरी गच्चीतल्या गार गाद्यांवर झोपलं की थंडगार वाटतंच. शिवाय दोन्ही बाजूला असणारी चिंचेची झाडं, जराशा वाऱ्याने सळसळतात आणि त्यांच्या पानांना स्पर्श करत वारा झुळूक बनतो, आणि जसा फ्रिज मधून काढलेला बर्फ चेहऱ्याला स्पर्श केल्यानंतर त्याचा थंडगारपणा सगळ्या चेहऱ्यावरुन ओघळतो तसा हा पाना-पानांतून आलेला वारा अख्ख्या शरीरभर ओघळतो.

गच्चीवर झोपायचं अजून एक कारण म्हणजे आपण गच्चीवर झोपायला जरी एकटे असलो तरी आपण एकटे कधीच नसतो, तो गोल-गरगरीत, पांढरा शुभ्र, एखाद्या पांढऱ्या लोकरीत्या गुंड्यासारखा असणारा चंद्र आपण झोपेतून कधीही उठलो तरी, आजारी पडल्यानंतर आजी जशी उशाशी बसून आपली काळजी घेते तसा आपल्या उशाशी बसून असतो. एखादं आलं वाईट स्वप्नं तरी त्याच्याकडे बघून हायसं वाटतं आणि कधीही झोपेत डोळे उघडले तरी इतकं सुंदर दिसणारं कोणीतरी आपल्याकडे पाहतं आहे यानेच पोटात लाजाळू उमलून मिटल्याचा भास होतो… शिवाय सकाळीदेखील तो मला उठवल्याशिवाय जात नाही.. त्यामुळे सकाळी उठलं कि पहिल्यांदा डोळे त्याला शोधायला लागतात, कधी उशीर झाला उठायला तर पाण्यात विरघळणाऱ्या बर्फाच्या खड्यासारखा तो निळ्या आकाशात विरघळताना दिसतो… की मी पटकन त्याचा निरोप घेते….रात्री परत भेटू असा आश्वासक निरोप तो देतो आणि दिसेनासा होतो…

लहानपणी साधारण सहावी-सातवीत असताना ययाति हे पुस्तक माझ्या हाती पडलं होतं, त्यावेळेच्या माझ्यासाठी ययातिची भाषा, लिखाण शैली, मोठ्ठाले वर्णनात्मक परिच्छेद, आणि एकूणच कथेचा गाभा जरा डोक्यावरुनच गेला होता. पण, त्यातला एक प्रसंग मात्र इतरांपासून लपवून ठेवलेल्या, गाभुळलेल्या चिंचेच्या बुटुकासारखा, डोक्यात लपवून ठेवल्याप्रमाणे सेफ होता. एकदा ययाति झोपला असताना त्याच्या गवाक्षातून येणारा चंद्राचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत होता आणि तो चंद्राचा शीतल प्रकाशाने देखील ययातिची झोपेत चलबिचल होत आहे म्हणुन शर्मिष्ठा आपला भला मोठा केशसंभार त्याच्या चेहऱ्यासमोर झुकवते आणि शर्मिष्ठेच्या केसातुन चंद्राची किरणं पाझरत ययातिच्या सुमुखावर पडत असतात. चंद्राच्या किरणांचा प्रकाश देखील सहन न होणारा नाजुक ययाति, आपल्या केसांनी किरणं आडवणारी शर्मिष्ठा, आणि ययातिची झोपमोड होऊ नये म्हणुन जाग्या असणाऱ्या शर्मिष्ठेची गवाक्षात येऊन सोबत करणारा चंद्र हा अवघा नजारा मी आजही माझ्या डोळ्यासमोर लख्ख पाहू शकते.

गच्चीत झोपताना मी आज्जीच्या साडीची शिवलेली पातळसर गोधडी अंगावर घेते आणि त्या गोधडीच्या प्रत्येक स्तरातून चांदणं पाझरतं, शर्मिष्ठेच्या केसांतून पाझारायचं तसं.. डोक्यावर पांघरुन घेतलं, तर पाघंरुणाच्या आत आपण चांदणं धरुन ठेवलंय असं वाटतं, हातावरती पडणारं चांदणं, केसावरती माळलं जाणार चांदणं, चेहऱ्यावर सजणारं चांदणं, आकाशात हसणाऱ्या, रात्रीच्या अंधाराला प्रसन्न ठेवणाऱ्या, चंद्राची सोबत करणाऱ्या त्या असंख्य चांदण्यांपैकी आपण एक आहोत असं वाटायला लागतं…. पाझरतं आलेल्या चांदण्यांचा हात धरुन चंद्राजवळ जाण्याची कल्पना मी आजवर कितीतरी वेळा केली आहे….. कदाचित त्या चंद्राच्या शेजारी बसून मला पुन्हा पाहता येतील, कोणी चंद्राचा प्रकाशाने झोपेतच चलबिचल होणारा ययाति, कोणी सुकेशनी शर्मिष्ठा, कोणी गवाक्षातुन चंद्राची वाट पाहणारा चातक, कोणी चांदण्या पांघरलेला, कोणी चांदण प्यायलेला, चांदण्याचे हात प्रियकराच्या गळ्यात घालणारी सखी, कोणी शीतलतेला आसुसलेली राज्ञी, कोणी, कोणी असेच, बरेच, जमिनीवर राहून आकाशाशी नातं बांधणारे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here