अपेक्षा एका शहीदाची

1
596

– योगिनी वैद्य / कविता /

तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही
अशा प्रसंगांना तोंड देतो आम्ही
आमच्या कामाचे तोंडदेखले कौतुक करणे
यात काही शहाणपण नाही

घरबसल्या कळणार नाही तुम्हाला
आमच्या मनातली खळबळ
कारण सीमेवरच्या आगीची आम्ही
तुम्हाला लागू देत नाही झळ

आम्हालाही वाटते राहावे
सतत आपल्या माणसांच्या सहवासात
पण या इच्छेमुळे होत नाही
कसूर आमच्या कर्तव्यात

करताना शत्रूंशी दोन हात
वेळप्रसंगी व्हावे लागते दगडासारखे कठोर
कारण देश संरक्षणाकडेच
सतत असते आमची नजर

न करता गाजावाजा
करतच असतो आम्ही अहोरात्र काम
तरीही प्राण गमावल्याशिवाय
कुठे मिळतो योग्य मान

विसरु नका की आम्हीदेखील
माणसेच आहोत हाडामांसाची
कधीतरी वाटू दे तुम्हाला
फिकीर आमच्याही आयुष्याची

आमच्या वाट्यास येते
ती तोंडदेखली श्रद्धांजली आणि उपेक्षा
कधीतरी हे चित्र बदलेल
हीच एका शहीदाची अपेक्षा

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here