दृष्टीआड सृष्टी

0
14
Nature

लेखक – जयंत नारळीकर
पुस्तकाचे नाव – यक्षांची देणगी

सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प

आपल्या सूर्यमालेत पृथ्वी ग्रहाव्यतिरिक्त इतर दुसऱ्या ग्रहावर जीवसृष्टी आहे का याची पडताळणी विविध अनुसंधान प्रयोगशाळेद्वारे शास्त्रज्ञ करत असतात.

छोटू आपल्या वडिलांना दररोज एका भुयारीमार्गातून कामाला जाताना आणि कामावरून घरी येताना बघत असतो. एके दिवशी त्यालासुद्धा वाटतं की आपण त्या भुयारीमार्गापलीकडे काय आहे? बाबा दररोज तिथे जाऊन काय काम करतात हे बघावं. कारण त्यामार्गापलीकडे जाण्यासाठी त्यांच्या वसतीतील ठराविक जणांना अनुमती असते. त्यामुळे छोटूचं कुतूहल दिवसेंदिवस वाढत होतं.

एकदा आई-बाबांचं लक्ष नसताना छोटू बाबांच्या शर्टाच्या खिशातील पास काढून त्या भुयारीमार्गाच्या पलीकडे जातो. तिथली दुनिया काही वेगळीच असते. सगळीकडे यंत्र आणि वेगवेगळी उपकरणे पाहून छोटूला इथल्या दुनियेची मज्जा वाटते. पण या भागात कुणीतरी कमी उंचीचा आणि ओळखीचा चेहरा नसलेला मनुष्य आलेला पाहून तिथले दहा गणवेशधारी त्याला पकडून त्याला त्याच्या घरी परत सोडून येतात.

आईला हा सर्व प्रकार समजताच ती छोटूला खूप ओरडते, त्यावर बाबा छोटूला समजावून सांगतात की, “मी ज्या भागात जातो तो भाग जमिनीवरचा आहे. तिथे सामान्य माणसाला येण्या-जाण्याची परवानगी नाही कारण तिथल्या पऱिस्थितीत तो जगू शकणार नाही. आम्ही सर्व तिथे स्पेस-सूट घालून तिथे कामाला जातो. एकेकाळी इथली सर्व वसाहत जमिनीवर होती. पण हळूहळू वातावरणात फरक पडला आणि अनेक प्रकारची जीवसृष्टी नष्ट झाली. याला कारण सूर्याच्या पृष्ठभागावर झालेला बदल. आपल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण इथे जमिनीखाली कृत्रिम परिस्थितीत राहत आहोत.”

छोटूच्या बाबांनी त्याला नीट सर्व समजावले आणि आपल्या कामाला निघून गेले. तिथे त्यांना एका संगणकाच्या स्क्रीनवर आपल्या ग्रहावर काहीतरी मोठा धोका येतोय असं त्यांच्या नजरेस दिसून आलं. काहींना वाटलं की मोठा तारा आहे. छोटूच्या बाबाना संशय आला की या सूर्यमालेत आपल्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठेही जीवसृष्टी नाही तर कोण अंतराळयान पाठवेल.

वसाहतीमध्ये व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. त्यात असे आढळून आले की आपल्या ग्रहावर नुकत्याच आगमन झालेली याने ही परग्रहावरची आहेत. आपण त्यांना भस्मसात करू शकत नाही. तसे केल्यास तिथल्या जीवसृष्टीला अंदाज येईल की या ग्रहावरसुद्धा जीवसृष्टी आहे. त्यामुळे आपण काही काळासाठी या जमिनीवरची यंत्रणा शक्यतो शांत ठेवण्याचा प्रयत्न करु. तितक्यात तिथल्या संगणकामध्ये त्या यानाबद्दल हालचाल होताना दिसली. ते यांत्रिक हाताच्या साहाय्याने या ग्रहावरची माती उकरून काढत होते. तेवढ्यात उत्सुकता वाढत असलेल्या छोटूने त्या संगणकाचे एक बटण दाबले आणि परग्रहावरचे यंत्र बंद पडले.

नासाकडून एक बातमी प्रसिद्ध करण्यात आली. मंगळावर नुकतेच उतरलेले व्हायकिंग – १ हे अंतराळयान ठरल्याप्रमाणे प्रयोग करत आहे. पण काही अज्ञात कारणामुळे यानाच्या यांत्रिक हातात बिघाड झाला आणि नासाचे तंत्रज्ञ त्या बिघाडाचा अभयास करत आहेत.

त्यानंतर लगेच आनंदाची बातमी कळते की नासाच्या तंत्रज्ञांनी व्हायकिंग – १ मध्ये झालेला बिघाड दुरुस्त केला आहे आणि मंगळावरील मातीचे नमुने गोळा करू लागला आहे. या मातीच्या नमुन्यावर सर्व शास्त्रज्ञांचे उत्सुकतेने लक्ष होते. मंगळ ग्रहावर जीवसृष्टी असेल का या प्रश्नाचे उत्तर त्यांना या मातीच्या नमुन्यादेवारे मिळणार होते अशी आशा होती. पण व्हायकिंग मिशनने या बाबतीत नकारार्थी उत्तर दिले आणि मंगळ ग्रहावर जीवसृष्टी असल्याचा कोणताही पुरावा पृथ्वीवरील शास्त्रज्ञांना मिळाला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here