– मेघना अभ्यंकर / स्फुट लेखन /
त्या दिवशी मुट्टुच्या किनाऱ्यावर आपल्या परकराचा ओचा बांधून आपल्या बापाबरोबर जाळ्यात अडकलेले मासे पटापट काढुन फेकणारी, ती डोक्याला चपचपीत तेल, अबोलीचा गजरा, मध्ये भांग आणि एक वेणी, मळखाऊ रंगाचं परकर-पोलकं घातलेली, मध्ये मध्ये आपल्या बापाशी हसत बोलत असणारी आणि हो, मध्ये मध्ये हसताना दिसणारे, तिच्या त्या काळासावळ्या रंगामध्ये पांढऱ्या छटा भरणारे तिचे एकसारखे दात…
मुटटुच्या किनाऱ्यावर या आधीही आणि त्या नंतरही अनेकदा जाऊनसुद्धा ती एकच छबी माझ्यामनात का बसली असेल? मुट्टुच्या किनाऱ्याचा विषय काढल्यावर किंवा अंधुकसा विचारही डोक्यात आल्यावर वीज चमकल्याप्रमाणे ते एकच चित्र डोळ्यासमोर का तरळत असेल, असा विचार मी सध्या रिकामी असल्यामुळे बसल्या जागी करत होते.
मग लक्षात आलं की असं होण्याची ही काही पहिली वेळ नाही. या आधीही अशा कुठल्या कुठल्या जागेच्या, घटनांच्या, माणसांच्या छबी माझ्या डोक्यात उतरुन कायमच्या वास्तव्य करायला लागल्या आहेत. बरं, या छबी काही माझ्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटना, पहिले-वहिले प्रसंग, अती दु:ख किंवा अति आनंद देणाऱ्या आठवणींच्या आहेत असं देखील नाहीये..
म्हणजे ज्या दिवशी मी मुट्टुला गेले होते आणि तिला पाहिलं तेव्हा ती काही माझी पहिली वेळ नव्हती, त्याआधी मी अनेकदा जाऊन आले होते, असंही नवहतं की त्या नंतर मला तो किनारा आवडायला लागला, ज्या मुटट् किनारा पाहिल्या नंतर मी लगेचच त्या जागेच्या प्रेमात पडले होते अगदी लव्ह ऍट फस्ट साईट टाईप्स, किंवा असंही नवहतं की तो माझा मुट्टुला भेट देण्याचा शेवटचा दिवस होता, तर सांगायचा मुद्दा असा की तो कोणताही विशेष दिवस नव्हता आणि तरीसुद्धा ती छबी माझ्याडोक्यात कायमची उतरली…
आणि मी म्हणते तसं, जे माझ्या आत्ता लक्षात आलयं त्याप्रमाणे, हे असं होण्याची पहिलीची वेळ नाहीये, म्हणजे अशा कुठल्यातरी क्षणी, कुठल्यातरी वेळी माझ्या डोक्यात एक कॅमेरा सुरु होतो आणि मेंदूने कोणतीही आज्ञा न देता फटाफट जे घडतंय त्याचे कॅन्डीड फोटो काढतो आणि कॅन्डीड म्हणजे खरे खरे कॅन्डीड हं…. आता आपण करतो तसं नाही… ऐ, मी तिकडे बघते तू माझा कॅन्डीड फोटो काढ, खरेखरे कॅन्डीड, जेव्हा तुमचा कोणी फोटो काढत आहे हे तुम्हाला माहिती ही नसतं, जेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचे नैसर्गिक भाव टिपले जातात, अगदी आहेत तसे… अगदी तसं माझ्या डोक्यातला हा कॅमेरा फोटो काढत राहतो…नाहीतर काय कारण आहे कि सगळ्या लहानपणीच्या आठवणींमधुन आम्ही पोहून झाल्यावर, ओल्या केसांनी ह्त्तीघाटावर बसून शेंगा खातोय, हे चित्र मला माझ्या भावंडांच्या कपड्यासकट लक्षात राहील किंवा सायकलच्या समोरच्या दांड्यावर मी आणि माझी लहान बहिण उभी राहीली असताना आणि नानांनी (आजोबांनी) आणून दिलेल्या त्या लालबुंद टॉमेटोचा रंग अजूनही मला लक्षात आहे, किंवा पहिल्यांदा प्रेमात पडले तेव्हा ओढ्याच्या शेजारुन जात असताना माझ्याकडे बघून गोड हसलेला तो आज इतक्या वर्षांनी सुद्धा त्याच्या शर्टाच्या रंगासहीत का डोळ्यासमोर येत असेल, लहानपणी दादा-ताईने आजीला न विचारता दुकानातलं चॉकलेट घेतलं होतं आणि मी ते आजीला सांगितलं होतं तेव्हा त्यांना न जेवण्याची शिक्षा मिळाल्यामुळे त्या चौघांच्या जेवणाच्या सतरंजीवर मी एकटीच जेवते आहे हे का आठवत असेल, आजपर्यंत पावसाने भरलेली तळी खूप बघितली आहेत तरी पांगऱ्याचे तळं आणि कुडकुडणारी मलाच तेव्हाच त्या कॅमेऱ्याने टिपलं असेल… याला काही कारण नाही… त्या कॅमेऱ्याला वाटलं तेव्हा त्याने फोटो काढले आणि दिले माझ्या मेमरीकडे साठवायला…
आणि या कॅमेऱ्याची अजून एक गंमत म्हणजे, जसे पुर्वी आपल्याला फोटो धुवून मग अल्बम मिळायचा ना तसे, हे फोटो सुद्धा मला लगेच मिळत नाही, चांगली पाच- सहा वर्ष जातात, मग कोणत्यातरी एका क्षणी ते फोटो डोळ्यासमोर येतात आणि जेव्हा येतात तेव्हा त्या फोटोच्या मागचा-पुढचा सगळा काळ स्वत:बरोबर घेऊनच…
त्यामुळे माझी ही एकवीस वर्ष ही अशी काही फोटोंमध्ये बांधली गेलेली आहेत जशी ही फोटोची गोष्ट झाली तशीच गाण्याची, मला गाण्याची फार आवड आहे किंवा त्यातलं कळतं असं नाही… पण आवडलेलं गाण एकदाच ऐकून मला बंद नाही करता नाहीत, मी त्याचा हात धरुन त्याला माझ्यासोबत सगळीकडे फिरवते… त्यामुळे ते आठ- पंधरा दिवस मी काहीही करत असताना तुम्ही मला ते गाण गुणगुणतानाच बघाल.. माझ्या या सवयीला कंटाळून माझी रुममेट मला अनेकदा म्हणायची, “तुला कंटाळा नाही का गं येत? एकच गाणं गाऊन…”
पण जोपर्यंत त्या गाण्याने माझा हात पकडला आहे तोपर्यंत मला त्याचा कंटाळा नाही यायचा, मग मध्येच जसं आलं नसताना सुचना देता ते गाणं हात सोडून निघून जातं, त्यामुळे अशा या गाण्यांनादेखील आपोआप फोटो जोडले जातात, कई बार युंही देखा है, ये जो मन की सीमा रेखा है, मन तोडने लगता है… हे गाणं आता कधीही ऐकलं की मी मुंबईच्या घरी पिवळा टि—शर्ट आणि क्रिम कलरची शॉर्ट्स घालुन भांडी घासते आहे हेच चित्र माझ्या डोळ्यासमोर येतं, तर एक लडकी को देखा तो ऐसा लगा (नवीन वालं) हे गाणं जगभरात कुठेही ऐकलं तरी मला मी ऑफिस मध्ये बसून काम करते आहे असंच चित्र डोळ्यासमोर दिसतं, का तर, मी एका ठिकाणी काम करत असताना तिथल्या बॉसला साधारण एक १०० वेळा हे गाणं ऐकवलं होतं आणि त्याने ही ते ऐकलं होत, मेरा मन कहेना लगा .. हे गाणं मला फारसं आवडत ही नाही तरीसुद्धा तो मगाशी सांगितलेला गोड हसणारा मुलगा आणि हे गाणं आजतागायत कधीही वेगळं झालं नाहीये, खरंतर या गाण्यांचा आणि त्या चित्रांचा काहीही संबंध नाहीये, पण तरीही या गाण्यांनी आणि डोक्यातल्या त्या कॅमेराने काढलेल्या चित्रांनी एकमेकांना निवडलं आणि आता ते कधीही डोळ्यासमोर आले तर इतके परफेक्ट वाटतात की याशिवाय यांना इतर काही सुट झालंच नसतं असं वाटतं….
आवराआवरीच्या बाबतीत मी बेशिस्त असले तरी, माझी स्मरणशक्ती भलतीच नीटनेटकी आहे, त्यामुळे तिने माझ्या डोक्यात आठवणींचा एक कप्पा बांधला असेल, त्या गोलाकार डब्या असतील आणि त्या प्रत्येक डबीवर फोटो आणि फोटोच्या खाली गाणं लिहून ठेवलं असेल की काय अशी मला शंका येते…