– सविता टिळक / कविता /
‘मैत्री’… शब्द उच्चारल्यावरच मन कसं प्रफुल्लित होतं ना.. चेहऱ्यावर हळूच एक हास्य उमटतं…
आई, वडिलांइतकंच निस्वार्थ, निरपेक्ष प्रेमाचं नातं म्हणजे मैत्री…
एकटं, एकटं वाटताना साथीला उभं राहणारं नातंही मैत्रीचंच..
तोल जाऊ नये म्हणून सावरणारा हात मैत्रीचा…
आणि प्रगती करण्यासाठी प्रेरीत करणारा शब्द मैत्रीचा…
नात्यांच्या भाऊगर्दीत एक धागा मोलाचा!
निर्व्याज अशा मैत्रीचा!
ग्रीष्मात तप्त जमिनीला
शांतवणारा पाऊस वळवाचा!
आयुष्याच्या रखरखाटात
आनंदाचा वर्षाव मैत्रीचा!
वादळात हेलकावणाऱ्या नावेला मूक आधार शिडांचा!
जीवनसंघर्षात तसाच अबोल हात मैत्रीचा!
एक असाही धागा मैत्रीचा।
ग्रीष्मात अवचित पडलेल्या शरदाच्या चांदण्याचा।
एक असाही धागा मैत्रीचा।
निर्व्याज अशा स्नेहाचा।
असाही धागा मैत्रीचा, चुलबुल्या दोस्तांचा।
जो घेऊन येतो दिवस आनंदाचा
आणि करतो भार हलका दु:ख, चिंतांचा।
एक असाही धागा मैत्रीचा।
निर्मळ मनाच्या सख्यांचा।
संवादांच्या लहरींनी जोडणारा।
वाहता प्रवाह आनंदाचा।
एक असाही धागा मैत्रीचा।
निष्कपट मनाच्या मित्र, मैत्रिणींचा।
पाठीवर कौतुकाची थाप देणाऱ्या।
नि:स्वार्थ अशा प्रेमाचा।
एक असाही धागा मैत्रीचा।
कौतुकभरल्या प्रेमाचा।
जो करतो प्रोत्साहित।
आणि जागवतो उत्साह नवं काही करण्याचा।