लेखक – जयंत नारळीकर
पुस्तकाचे नाव – यक्षांची देणगी
सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प
श्री. मनोज दत्त हे एक कलकत्ता येथील amateur astronomer आहेत. लहानपणापासून त्यांना आकाशाकडे पाहायचा छंद होता. मोठेपणी भरपूर पैसा कमावल्यावर त्यांनी स्वतःसाठी एक दुर्बीण विकत घेतली जिच्या सहाय्याने ते अवकाशातील होणाऱ्या हालचाली बघू शकत होते. त्यांच्या पत्नी सौ. इंद्राणीदेवी दत्त यांची त्यांच्याकडे तक्रार असायची की, “रोज रोज तेच तेच तारे. पाहायचं तरी काय एवढं त्यांच्यात तासन् तास?” दत्तबाबू त्यांच्या पत्नीच्या या तक्रारींकडे नेहमी दुर्लक्ष करीत असत कारण ज्यांना या खगोलशास्त्राचे वेड आहे तेच या गोष्टींचा आनंद घेऊ शकतात असे त्यांचे मत होते.
दत्तबाबूंच्या मनात एक अभिलाषा होती की आपण अवकाशातून एक धूमकेतू शोधून काढावा ज्याला सर्व जग मान्य करेल आणि तो धूमकेतू ‘दत्त धूमकेतू ‘ किंवा ‘कॉमेट दत्त ‘ या नावाने जगप्रसिद्ध होईल. पण आपल्याकडे असणाऱ्या छोट्या दुर्बिणीने धूमकेतू दिसणं अशक्य अशी त्यांची मनःस्थिती झाली होती. कारण सध्याच्या यांत्रिक युगात मोठ्या मोठ्या दुर्बिणी आकाशाकडे डोळे लावून बसल्या आहेत आणि आपल्या छोट्या दुर्बिणीने धूमकेतू दिसणे अशक्य आहे याची त्यांना जाणीव होती.
दररोज रात्री आकाशाकडे पाहत असताना एके दिवशी अचानक त्यांना एका तारा मंडलात एक पुसट पण वेगळीच हालचाल झालेली दिसली. अनेक शंका मनात आल्या पण त्यांनी स्वतःचीच खात्री करून घेतली की आपल्या दुर्बिणीतून नवा धूमकेतू दिसत आहे.
दोन दिवसांनी कलकत्ता येथील एका वर्तमानपत्रात मनोज दत्त यांनी धूमकेतू शोधल्याचा दावा करणारी बातमी प्रकाशित झाली. दत्त यांनी आपला शोध कोडाईकॅनलच्या वेधशाळेेला कळवून त्याची पुष्टी करून घेतली. आणि त्या धूमकेतू ला कॉमेट दत्त अशी मान्यता ही मिळाली.
अशी बातमी सर्वत्र पसरताच दत्त यांना अनेक ठिकाणी बोलावण्यात आले, त्यांचा सत्कार करण्यात आला. पण खूपच कौतुक झाल्याने त्यांना या सत्कारांबद्दल कंटाळा यायला लागला. त्यांच्या पत्नीने देखील त्यांना सांगितले की, ” धूमकेतू अनिष्टकारक असतो म्हणून त्याचा शोध तुमच्याकडून लागायला नको होता.” त्यावर दत्तबाबूंनी तिला या अंधश्रध्देवर विश्वास ठेऊ नये याबद्दल सांगितले.
त्याचवेळी लंडन जवळील केंब्रिज किंग्ज कॉलेजच्या जेम्स फोसाईथ नावाच्या युवकाने दत्त कॉमेटबद्दल माहिती मिळवली आणि नेचर या साप्ताहिकात ती प्रकाशित करण्यास संपादकाला सांगितले. त्याच्यानुसार हा दत्त कॉमेट हा काही काळानंतर पृथ्वीवर येऊन आदळण्याची शक्यता होती. पण त्या संपादकाने तू माहिती प्रकाशित न करता ती आपल्या मित्राला म्हणजे डिफेन्स सायन्स अॅडवायजर, मॅजेस्टीज गवर्नमेंट मधील जॉन मॅक्फर्सन याला ती माहिती दिली आणि त्यामुळे जेम्स आणि जॉन यांची भेट होऊन दत्त कॉमेट याबद्दल चर्चा झाली.
कॉमेटबद्दल निश्चित अजूनही विधान करता येत नाही. काही कारणामुळे कॉमेट दत्तची कक्षा जर बदलली नाही किंवा जर तो सूर्याजवळ असताना मोडकळीस आला नाही तर पृथ्वीशी होणारी टक्कर अटळ आहे.
त्यानंतर जेम्स आणि जॉन यांनी मिळून जगातील वरिष्ठ शास्त्रज्ञ यांना बोलावून एक सभा घेतली ज्यात श्री. मनोज दत्त सुद्धा आमंत्रित होते. सर्वांनी या धूमकेतूबद्दल चर्चा केली. पृथ्वीवर येऊन आदळण्यात त्या धूमकेतूचा किती संभव आहे किंवा ती टक्कर आपण कशी रोखू शकतो याबद्दल अनेक राष्ट्रांच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी आपापली मते व्यक्त केली त्यातून एक मार्ग निघाला. ठराविक दिवसांच्या अंतरावर अंतराळ यान सोडून धूमकेतूच्या अण्वस्त्रांचा मारा करू जेणेकरून त्याची कक्षा बदलेल आणि पृथ्वीवर तो येऊन धडकणार नाही.
इथे कलकत्त्यात दत्तबाबूंच्या घरी सौ. इंद्राणी देवी दत्त यांनी होम हवन करायचे योजिले होते जेणेकरून आपल्या पतीने लावलेल्या धूमकेतूच्या शोधामुळे त्यांच्यावर काही घातक परिणाम होऊ नयेत. या होम हवानामुळे दत्त नाराज होते.
ते त्या दिवसाची वाट पाहत होते की कधी लंडनहून त्यांना डॉ. जॉन यांचं पत्र येतंय. तेवढ्यात एक खलिता त्यांना मिळतो ज्यात डॉ. जॉन यांनी धूमकेतू वर मिळवलेल्या विजयाची पुष्टी दिलेली असते आणि ही गोष्ट ते त्यांच्या पत्नीला सांगतात पण त्यांच्या पत्नीचे म्हणणे असते की, तिने केलेल्या होम हवानामुळेच हा धूमकेतू पृथ्वीवर आदळला नाही.
यावर दत्त स्वतःशीच बोलत राहिले, अंधविश्वास आणि सयुक्तिक विचार करण्याची प्रवृत्ती यांच्यातली वैचारिक तफावत केवढी मोठी आहे. एकविसाव्या शतकातील वैज्ञानिक युगात पदार्पण करू पाहणाऱ्या मानवजातीला ही वैचारिक तफावत परवडेल का? ती केव्हा दूर होणार? या प्रश्नांचे दत्त यांच्याकडे उत्तर नव्हते.