लेखक – जयंत नारळीकर
पुस्तकाचे नाव – यक्षांची देणगी
सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प
ही कथा आहे आकाशगंगेतील ज्या ग्रहावर जीवसृष्टी आहे त्या ग्रहाची ‘पृथ्वीग्रहाची’. आजपासून १०० वर्षांनी या ग्रहावर यांत्रिक आणि तांत्रिक असे कोणते बदल होतील ज्याने जीवसृष्टीला फायदा होईल की नुकसान.
या कथेत पाच मुख्य पात्रे आहेत –
मेजर दलजितसिंह सौंध (भारत) – भारतीय संरक्षण विभाग,
ऑनरेबल विलियम मॉनफ्रीक (इंग्लंड) – रॉयल एअर फोर्स,
डॉ. कार्टर पॅटरसन (अमेरिका) – शास्त्रज्ञ,
इल्या मोरोव्हिच (बेल्जियम) – हेर संस्थेचा एजंट आणि
चांग तेंग (चीन) – ऍटॉमिक एनर्जी प्रोग्राम शास्त्रज्ञ.
एका संस्थेने १०० लोकांच्या अर्जातून या पाच जणांची निवड केलेली असते. ही पाचही जणे एका वर्तमानपत्रातील मजकुराला प्रतिसाद देतात. मजकूर असतो – ‘नेहमीच्या शांत सुरळीत जीवनाला कंटाळलात? काही कर्तृत्व दाखवायची इच्छा असल्यास लिहा : बॉक्स ३४५७”
हे पाचही जण एका गोलाकार खोलीत पंचकोनी टेबलावर बसलेले असतात आणि त्यांच्या पुढ्यात एक पुस्तिका दिलेली असते जी त्यांना वाचायची असते. सर्वांचं वाचून झाल्यावर एक अदृश्य आवाज खोलीत ऐकलं जातो. “एकंदरीत तुम्हा सर्वाना प्लॅन पसंत पडलेला दिसतो?” या प्रयोगात भाग घ्यायचा की नाही हा पर्याय त्या पाचही जणांकडे नसतो. ‘शंभर वर्षे शरीर गोठवून दूर अंतराळात शनिग्रहाभोवती तुम्ही एका यानात घिरट्या घालणार आहात’ पृथ्वीवरची कोणतीही जागा पुढील शंभर वर्षात सुरक्षित राहणार नाही म्हणून हा मार्ग आहे. असे त्या पाचही जणांना सांगण्यात येते. त्या पाचही जणांपैकी कोणालाही अंतराळयान चालवता येत नव्हते आणि याची सर्व जबाबदारी या पाचही जणांनी घ्यायची होती. हे पाचही जणं विसाव्या शतकातील प्रतिनिधि म्हणून एकविसाव्या शतकात जाण्यासाठी १०० वर्षे आपलं शरीर गोठवून अंतराळात राहणार होते. त्यांना तशा सूचना देण्यात आल्या, १०० वर्षे पूर्ण होतील आणि जेव्हा तुम्ही परत पृथ्वीवर जाल तेव्हा तेव्हा काही दिवसांपूर्वी प्रथम तुमचा मेंदू काम करायला लागेल, मग डोळे, नाक, कान, जीभ, मग जबडा, मान, हात, कंबर आणि मग पाय.
वर्ष २०७७ – विसाव्या शतकातील त्या पाच जणांचं यान एकविसाव्या शतकातील अंतराळ संशोधन कार्यलयाने हेरलं आणि त्यांची विचारणा केली, सर्व पुष्टी झाल्यानंतर पृथ्वीवरील लोकांनी या पाच जणांचं स्वागत केलं. यानातून उतरल्या उतरल्या डॉ. पॅटरसनने तेथील एका शास्त्रज्ञाला विचारलं, “युनायटेड नेशन्सचे काय झाले? तो शास्त्रज्ञ म्हणाला, “त्या संस्थेचा अंत या शतकाच्या सुरुवातीलाच झाला. आर्थिक परिस्थिती विकोपाला गेली असल्याने ती संस्था बंद पडली.”
या शतकात सात खंडांऐवजी चारच खंड होते.
एक : उत्तर आणि दक्षिण अमेरिका;
दोन : युरोप (रशिया आणि सायबेरिया)
तीन : चीन, जपान, भारत, आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया
चार : मध्यपूर्व आशिया आणि आफ्रिका
हे खंड धर्म किंवा वंशभेद यांवर आधारित नसून अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून झाली होती. खंड १ आणि २ संपूर्णपणे सौर उर्जेवर अवलंबून होते. खंड ३ आणि ४ यांनी थोड्या प्रमाणात या ऊर्जेचा वापर सुरु केला होता पण अजून कोळसा, पेट्रोल आणि अणुशक्ती यांवर हे देश अवलंबून होते. अंतराळात बराच बदल झाला होता. आधुनिकीकरणाने प्रत्येक खंडाचे यान आणि सौरशक्तीकेंद्र होते. अंतराळ आता पूर्वीसारखे स्वच्छ राहिले नव्हते.
खंड १ आणि २ यांमध्ये मानवाचे आयुर्मान ५५ वर्षांपर्यंत घसरले होते तसेच खंड ३ आणि ४ यांमध्ये मानवाचे आयुर्मान ६५ पर्यंत होते आणि दरवर्षी ते कमी होत चालले होते. गेल्या पन्नास वर्षात मानवाची प्रजोत्पादनक्षमता कमी होत गेली होती. एकविसाव्या शतकात जीवांसरांनी बरीचशी यांत्रिक झाली होती आणि कौटुंबिक जीवन, परस्पर जिव्हाळ्याचे संबंध दीर्घकाळ टिकणारी मैत्री हे सर्व लुप्त झाले होते.
या समस्यांपैकी त्या पाचही जणांना एक महत्वाची समस्या भेडसावत होती ती म्हणजे, हे चारही खंड, प्रामुख्याने १ आणि २ पूर्णपणे अंतराळात असणाऱ्या सौरशक्तिकेंद्रावर अवलंबून आहेत आणि ही बंद पडली तर सर्व जीवन बंद पडल्यासारखे होईल. कारण यंत्रे बंद पडली तर दुरुस्त करण्यासाठी यंत्रेच लागतील आणि ती यंत्रे कुठल्या शक्तीवर चालतील? खंड १ चा जास्त अभ्यास करून त्या पाचही जणांना भविष्याबद्दलची शंका वाटायला लागते. कारण, सर्व सौरशक्तिकेंद्रे पृथ्वीबाहेर फिरतात आणि सूर्यप्रकाशात आली की चालू होतात. मोठी केंद्रे बंद झाली की लहान केंद्रे पण बंद होतात आणि या लहान मोठ्या केंद्रांवर लक्ष ठेवणारा एक संगणक पृथीवर खंड १ मध्ये आहे. या चारही खंडांमध्ये कुठलीही शत्रूता भावना नव्हती, आणि समजा युद्ध झालेच तर कुठल्या खंडाने आपले केंद्र बिघडवले याचा पत्ता लागेल असे नाही आणि म्हणून बाकी तीनही खंडांचे संगणक स्वतःच निकामी होतील असा आत्मघातकी योजना या संगणकांमध्ये होती.
२०७८ या वर्षी सूर्याच्या पृष्ठभागात थोडा बदल झाला आणि बदलामुळे खंड १ आणि २ ची दोन्ही सौर केंद्रे बंद पडली. त्यांचे संगणक जागे झाले आणि बिघाडाचे कारण आणि त्याच्या दुरुस्तीचे पर्याय शोधू लागले. पण संगणकांना पर्याय शोधात आलेच नाहीत कारण एकविसाव्या शतकातील शास्त्रज्ञांनी संगणकांच्या लक्षात आलेच नाही कि सूर्यात काही बदल होतील आणि त्यामुळे आपल्या शक्तिकेंद्रावर काही परिणाम होईल. त्यामुळे खंड १ आणि २ च्या संगणकांनी खान ३ आणि ४ च्या संगणकांना निकामी होण्याचे संदेश पाठवले.
खंड ३ आणि ४ मधील काही केंद्रे अणुशक्तीवर म्हणजेच कोळसा, पेट्रोल यासारख्या इंधनांवर चालू असल्याने संपूर्ण पृथ्वीला म्हणजे चारही खंडांना एकत्र संदेश देता येईल याची व्यवस्था त्या पाच व्यक्तींनी काही महिन्यापूर्वी एक टेप रेकॉर्ड केली आणि टीव्हीच्या साहाय्याने सर्व लोकांपर्यंत माहिती दिली – “विसाव्या शतकात यंत्रांचा पुष्कळ उपयोग केला जात असे पण त्याचे नियंत्रण मानवाच्या हाती होते. एकविसाव्या शतकात हे नियंत्रण बहुतकरून यंत्र, संगणकावर गेले होते. या शतकात संहारक शस्त्रे वापरण्यापेक्षा शत्रूची शक्तिकेंद्रे नष्ट करण्याची सोया करण्यात आली होती आणि हा निर्णय संगणकांवर सोपवण्यात आला होता. ‘अमुक पर्याय तपासून अखेरचा पर्याय म्हणून हा निर्णय घे’ असे शास्त्रज्ञ सांगून मोकळा झाला. पण आम्ही पाचही जणांनी काही तरतुदी करून या समस्यांवर ठराविक काळासाठी काही उपाययोजना केल्या आहेत आणि त्यामुळे आमच्या अंदाजाप्रमाणे पुढल्या ५० वर्षात पृथ्वीवर एकही शक्तिकेंद्र राहणार नाही. संगणकाने अखेरचा पर्याय निवडल्याने आम्ही कल्पिलेली बिकट परिस्थिती उद्भवली तर काही केंद्रे चालू राहतील आणि ही रेकॉर्ड केलेली टेप लावली की तुम्हाला ही केंद्रे का चालू राहिली याचे गूढ उकलेल.
तुम्ही या परिस्थितीतून बोध घ्याल अशी आमची आशा आहे, तसे झाले तर आमचे १०० वर्षांचे गोठून राहणे सफळ झाले असे आम्ही समजू.. नमस्कार!