तेजस सतिश वेदक
सकाळी सर्वं आटपून डोळे चोळून बाहेर आलो डोळ्याची झोप काही गेली नव्हती. बाहेर आलो तर बघतो काय समोर खोबऱ्याच्या वाट्या माझी वाट बघत होत्या. अगदी नैवेद्याला ठेवल्यासारख्या. त्यात बाजूला विळी होतीच म्हणजे आता कामाला लागा हे त्या नारळावर लिहलेलं दिसत होतं. मी ती कवड डोळे चोळत हातात पकडली आणि तिच्याकडे बघत बसलो. एक विचार मनात आला की ह्या नारळात जशी जागा आहे तशी जागा मिळाली झोपायला तर काय मज्जा येईल बुवा अगदी थंडगार पण झोप लागेल ना ? ह्या विचारात बुडलो.
छत्तीस गुण जुळले की ते चांगले असतात असं ऐकलं होतं पण कधी पाहिले नाही. माझ्या नशिबी आलेले छत्तीस गुण आणि त्याचा आलेला अनुभव हा भलताच होता.. आम्ही दोघे अगदी विरुद्ध दिशा पकडलेली माणसे.. ठरवले तर एकत्र नाहीतर एकमेकांचे तोंड नाही बघणार ह्यातली गत होते कधीतरी. हाहाहा.. अरे देवा स्वाभाविक आहे मी एका मुलीबद्दल बोलतोय असं वाटणं.. कारण एका मुलीने झोप उडवणे आणि एका झोपेने झोप उडवणे ह्यात खूप साम्य असावं कदाचित. प्रेमात झोप न येणे हे ठीक पण दुपारी झोपून रात्री झोप न येणे हे इतरांचं सोडा पण मलाही न पटणारे होते. त्यामुळे छत्तीस गुण नाही तर छत्तीसचा आकडा म्हणतात तो हाच प्रकार असणार हे नक्की.
माझ्या नशिबात आलेली झोप ही त्यावेळीच्या कुंभकर्णाने घेतली असावी असं वाटतं.. पण आता तेही वाटून काहीच उपयोग नाही, कारण तो कुंभकर्ण ही गेला आणि माझी झोपही गेली होती. त्यामुळे झोप न येण्याचं नक्की कारण काय असावं हे एक माझ्यासाठी असणारं गूढ होतं.
असेच एकदा आम्ही सर्वं मित्र गोव्याला जाऊ असा विचार केला, नुसता केला नाही तर अमलातही आणला, गोवा म्हणजे आपल्याला वेगळं काही स्पष्टीकरण द्यायलाच नको आपली कुलदैवत गोव्यात नसली तरी दरवर्षी नित्य नियमाने तिथे जाणे म्हणजे गोवा. अश्याच गोव्यात आम्ही गेलो, प्रवासाचा त्रास इतका झाला की डोळ्याची झोप काही गेली नव्हती हॉटेल मध्ये जाऊन ताणून देईन असा विचार केला, मीच नाही तर सर्वांनी विचार केला आणि तो अमलात आणला, मी माझ्या रूममध्ये असलेल्या लाकडी फळ्या मोजण्याचं काम चालूच केलं, मग त्या झोपेचं काय झालं ज्याचा मला मगाशी भास झाला होता.. सकाळी ५:५६ झोपायचा बेत आखला होता आणि तस झालं पण मी पण झोपलो आणि ७:३० ला उठलो. झोपेचे तर तीन तेरा झालेच होते आणि हे कोणत्या ना कोणत्या दिवशी एका दिवसाआड घडतंच होतं.
एकदा एका रविवारी, दुपारी माझं जेवण आटोपलं आणि लिखाणाचं काम सुरू केलं. थोड्यावेळाने अचानक डुलकी लागली, छान दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत झोपून गेलो. कदाचित दुपारची कोंबडी अंगावर आलेली असणार नाहीतर एवढी झोप ती पण मला येणं म्हणजे कठीण. अचानक मी उठलो आणि पुरता घाबरलो होतो.. कारण मी दुपारी झोपलो होतो. हे कारण घाबरायला पुरेसं होतं, कारण दुपारची झोप म्हणजे रात्री झोप नाही, हे माझ्या कुंडलीतच लिहिलं असावं आणि जसा विचार केला तशीच रात्र गेली, सोबतीला माझ्या फक्त मीच, तो वर फिरणारा पंखा, आणि कानात मधुर आवाजात गाणारी ती गायिका.. तेवढ्यात सकाळचा अलार्म वाजला आणि बाबा उठले, तेव्हा घडाळ्यात सकाळचे पावणे चार झाले होते. नाही डोळ्याला डोळा लागला आणि नाही पापणीला पापणी लागली, पण उद्या माझी ऑफिसमध्ये वाट लागणार हे समजलं होतं.
अनेकदा मला असं वाटायचं की मीच कुंभकर्ण आहे, ह्या कलियुगातला रिव्हर्स व्हर्जन, ज्याला अजिबात झोप येत नाही. त्यावेळी माझ्या मनात एक प्रश्न पडला आणि तो मी लगेच उचलला आणि तो असा की माझ्यासारखे असे कोण आहे का ज्यांना झोप येत नाही किंवा झोपेचं प्रमाण कमी आहे, आणि उत्तर मला सापडलं, उत्तर होतं ‘नाही’. कारण मी माझ्या भोवताली असलेल्या माणसांना नेहमीच झोपलेलं बघत आलो आहे. काहीना तर कुठेही म्हणजे अगदी कुणाच्या लग्नात का होईना झोप येते, काही तर घोरत पडतील हात पाय पसरून पण आपल्या बाजूचा आपल्यामुळे जागा आहे ह्याची खबरही नसते त्यांना.
असा प्रसंग माझ्याबरोबर कोकणात झाला होता, रात्री मी एका मित्राबरोबर झोपलो असता तो खूप घोरत पडला होता, आणि ह्याचा आवाज ऐकून मला झोप येणं कठीण होतं.. हाताने सरकवून त्याला उठवून थोडा काय डुलकी लागायची तर तितक्यात आवाज पुन्हा चालू, तेवढ्यात तो मित्र उठला आणि उलटून मला विचारतो “काय रे जागा का तू? झोप ना” त्यावेळी एवढया रात्री आलेला राग व्यक्त ही करू शकत नव्हतो, आणि पुन्हा आवाजात झोपण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एक गोष्ट पक्की झाली, नक्कीच माझ्या पाचवीला माझ्या झोपेला पुजले नसणार किंवा बारस्याला बोलावले नसणार नाहीतर माझ्यावर रुसून बसायचे त्या झोपेचे कारण काय?
कोरोना मुळे काही दिवसांसाठी भारत बंद असल्याची बातमी आली.. आणि ऑफिसला सुट्टी मिळाली, म्हणजे दुपारी झोपा, रात्री उशीरा झोपा किंवा उशीरा उठा, सगळ्याचा योग जुळून आला होता. उशिरा उठण्याचा योग आमच्या घरी जुळून येणं म्हणजे कठीण आहे. लॉकडाऊन मध्ये झोपण्याचं ताळतंत्र सुटलं होतं.. work from home मध्ये झोपण्याचं सुख काहीतरी वेगळंच आहे हे उमजलं.
कधी झोपलो कधी उठलो ह्याचा थांग पत्ता लागत नाही. परवा असेच झाले झोपलो होतो आणि काही तासांनी जाग आली, तर पहिला प्रश्न मनाला हाच विचारला सकाळ आहे की संध्याकाळ. पण पुन्हा तेच रात्री झोप नाही. पण आता सवय झाली होती त्या वेळाक्रमाची. दुपारी झोप, रात्री Netfilx आणि सकाळी वर्क from home. त्यामुळे सकाळी लवकर उठून आवरणे हे अनिवार्य झालं होतं. मग ते कीती वाजता ही झोपा.
आईची तितक्यात हाक आली… काय रे.. नारळाच्या कवडी खवणून झाल्या का?
मला खाडकन जाग आली गुडघ्यावर ठेवलेली हनुवटी सरकली आणि पुन्हा माझ्या झोपेचं खोबर झालं होतं आणि त्या खोबऱ्याचा माझ्या झोपेसारखाच किस पाडला गेला होता…