– सविता टिळक / कविता /
येतेस एक नाजूकशी कळी होऊन या जगात।
हळूहळू बागडू लागतेस घरभर, निनादू लागतो पैंजणांचा आवाज।
भातुकलीच्या खेळात रमतेस तासनतास।
चिमुकल्या हातांनी भरवतेस खाऊचा घास।
ऐटदार गणवेशात प्रवेश करून विद्द्यामंदिरात।
करू लागतेस विद्द्यादेवीची आराधना।
ठेवून मनात अनेक आकांक्षांना।
पार करत एक एक टप्पा, घालतेस यशाला गवसणी।
काळ सरतो झरझर आणि…
एक दिवस अचानक ओलांडतेस उंबरा माहेरचा।
फुलू, बहरू लागतेस सासरच्या अंगणी।
पसरत सुगंध तुझ्या प्रेमाचा
गुंफतेस नात्यांची गुंफण रेशीमबंधांनी।
सांभाळताना नवीन नाती, अचानक होते आगमन नव जीवाचे।
होते मन तृप्त, लाभता बिरुद आईचे।
करतेस पालन सजगपणे नव जीवाचे,
चढवतेस लेणे तुला लाभलेल्या संस्कारांचे
हा जीव जणू तुझ्या रुप, गुणांचा आरसा,
देऊ करतेस त्याला तुझ्या मूल्यांचा वारसा आणि वसा।
कन्या, भगिनी, सखी, माता सहचारिणी, …
किती रुपांमधून व्यक्त होत राहातेस,
उमटवतेस ठसा सर्वत्र तुझ्या अस्तित्वाचा
जीवनातल्या आव्हानांना लीलया पेलताना।
ध्यास सतत तुझ्या मनी, जग सुंदर करण्याचा।