मराठी भाषेतील विनोदी लेखक व कथाकथनकार श्री. दत्ताराम मारुती मिरासदार. मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. असे असले, तरी ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांतून त्यांनी जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले आहे. तसेच अनेकदा त्यांच्या विनोदालाही कारुण्याची झालर असल्याचे दिसून येते.
एक डाव भुताचा आणि ठकास महाठक ह्या दोन चित्रपटांच्या संवादलेखनाबद्दल त्यांना पारितोषिके मिळाली आहेत. ‘व्यंकूची शिकवणी’ ह्या त्यांच्या गाजलेल्या विनोदी कथेवरुन गुरुकृपा हा मराठी चित्रपट काढण्यात आला होता. द. मा. मिरासदार यांच्या खास विनोदी शैलीतल्या निवडक कथांचा अत्यंत सुरस संग्रह म्हणजे मिरासदारी हे पुस्तक. गेल्या काही वर्षांत मराठी ग्रामीण कथेच्या उदयाबरोबर ग्रामीण वातावरणाशी संलग्न असणारी हास्यजनक कथा जन्माला आली. तिच्यात वृत्तीची विविधता आहे, केवळ एकसुरीपणा नाही. मिरासदारांच्या या कथांतून एक अनोखी मिश्किलपणाची, चमत्कृतीपूर्ण वळणांची व गमतीदार विक्षिप्तपणाची झाक वाचकाला अतिशय भावली. मिरासदारांच्या लेखनात अस्सल विनोदी अशी अनेक गावरान पात्रे आढळतात. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि त्याचे इत्तम सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत.
व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार या त्रयीने १९६२ सालापासून कथाकथन करून महाराष्ट्रातलील जनतेला भुरळ घातली होती. त्यातील द. मा. मिरासदार हे माईकसमोर उभे राहून हातवारे करीत बोलू लागले की, श्रोत्यांना एक अद्भुत नाट्य अनुभवायला मिळे. कथाकथनाचे तीन हजारांहून अधिक कार्यक्रम झाल्याने त्यात परिपक्वता दिसत होती. मराठीत विनोदाची परंपरा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांनी जोपासली आणि मिरासदारांसारख्या लेखकांनी ती समृद्ध केली.
विनोदी लेखक व कथाकथनकार द. मा. मिरासदार
Related articles
आवश्यक असा उपक्रम….बरयाचदा नावे फक्त माहिती असतात पण ‘साहित्यकल्प’ मुळे बरीच माहितीही मिळते.
धन्यवाद निशिगंध.
तुमच्यासारख्या वाचकांपर्यंत माहिती उपलब्ध व्हावी हा प्रयत्न.
असेच प्रोत्साहन आणि प्रेम कायम ठेवा.