जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन. उ. झाकिर हुसेन हे एक व्यक्तिमत्त्व बहुआयामी आहे. सोलो वादन, फ्युजन आणि साथसंगत हे तिन्ही प्रकार ते तितक्यानच तन्मयतेने व उत्तमरीत्या करतात. भारतीयांसाठी उ. झाकीर हुसेन हे सर्वश्रेष्ठ तबलावादक असले, तरीही जगाच्या व्यासपीठावर ते एक श्रेष्ठ संगीतकार म्हणून विराजमान आहेत. जगात सारे प्रवाह एकत्र येण्याचे श्रेय जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला जरी जात असले, तरीही संगीताच्या क्षेत्रात उ. झाकीर हुसेन यांनी ही प्रक्रिया अगदी सत्तरच्या दशकापासूनच सुरू केलेली आहे. उ. झाकीर हुसेन हे असे एकमेव तबलावादक आहेत, की ज्यांनी सर्व प्रकारच्या कलाकारांबरोबर आणि कला-प्रकारांबरोबर तबलावादन केलेले आहे. मग प्रसिद्ध गायिका गिरीजा देवी यांचा टप्पा असो, किंवा त्यांचीच ठुमरी किंवा झूला असो; किंवा पं. भीमसेन जोशी यांचा अभंग असो किंवा पं. जसराज जी यांचे भजन. हे सारे प्रकार आत्मसात करून त्यांनी या सर्वांबरोबर वादन केले आहे. इतकेच काय, तर देशातील प्रमुख गायकांबरोबर आणि वादकांबरोबर त्यांनी तबल्याची साथ करून प्रत्येकाची शैली सांभाळत आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले आहे.
उ. झाकीर हुसेन स्वतः तबला या वाद्याला व्यासपीठावर प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय मा. रवि शंकर, उस्ताद अली अकबर खां आणि त्यांचे वडील उस्ताद अल्लाराखा खां यांना देतात. कारण भारतीय संगीत सर्वप्रथम देशाबाहेर या तिघांनी नेले. ते जगमान्य कलाकार झाले आणि त्यानंतर अनेक कलाकार देशात-परदेशात आपली कला सादर करू लागले. परंतु या साऱ्या प्रक्रियेत कळस जर कुणी चढवला असेल तर तो मा.झाकीर हुसेन यांनी! वीस वर्षांचे असताना झाकीर हुसेन अमेरिकेला गेले. त्यांना तिथे बोलावण्यात पंडित रविशंकर यांचा फार मोठा आग्रह होता. तोपर्यंत ते देशभर दौरे करीत होतेच, परंतु अमेरिकेतला तो अनुभव त्यांच्या आयुष्याला नक्कीच मोठी कलाटणी देऊन गेला.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील तबला वादनाला जागतिक पातळीवर पोहचविण्याचे अमूल्य योगदान देणारे जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन
Advertisement