लेखक – जयंत नारळीकर
पुस्तकाचे नाव – यक्षांची देणगी
सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प
नौलखा हाराचे प्रकरण म्हणजे आपल्या लक्षात येते की, या हाराशी आणि त्याच्या चोरी केल्याबद्दलची ही कथा आहे. पण ही कथा थोडी विलक्षण आहे..
आपण सर्वांनी शेरलॉक होम्स या गुप्तहेराने अनेक किचकट अशी प्रकरणं सोडवलेली वाचली आहे. पण त्याच्या सहकाऱ्याने म्हणजे जॉन एच वॉटसन याने या विलक्षण प्रकरणाची नोंद न सुटलेली प्रकरणे यात केली आहे.
एके दिवशी टाइम्स मध्ये एकाच पानावर दोन बातम्या वाचून जॉन वॉटसन अचंभित होतो.
पहिली बातमी – भारतातील महाराज रहिमतसिंह यांचा अतिशय किंमती हार चोरीला गेला.
दुसरी बातमी – प्रख्यात शास्त्रज्ञ बेपत्ता
मेट्रोपॉलिटन पोलिसांनी त्वरित स्कॉटलंड यार्डला पाचारण केले आणि हे प्रकरण इन्स्पेक्टर ग्रेगसन यावर सोपवण्यात आले. ही सर्व बातमी वॉटसन आणि होम्स आपल्या घरी छान नाश्ता करत वाचत होते. होम्सच्या मते या दोन्ही बातम्या एकमेकांशी जुळत होत्या. शास्त्रज्ञ सर जेम्स ब्रोडस्टेअर्स हे प्रख्यात शास्त्रज्ञ असले तरी त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम नव्हती. त्यांच्या प्रयोगाकरिता त्यांनी बरंच कर्ज काढलं होतं. काही वेळातच बेपत्ता झालेल्या शास्त्रज्ञ जेम्स ब्रोडस्टेअर्स यांची मुलगी अमेलिया ते हरवल्याची माहिती घेऊन येते. तिच्या माहितीनुसार त्यांच्या घरात ब्रोडस्टेअर्स यांची प्रयोगशाळा असते ज्यामध्ये त्यांच्याव्यातिरिक्त कुणालाही जाण्यास मनाई असते. जेवणाची वेळ झाल्यावर मिस आ अमेलिया प्रयोगशाळेचे दार ठोठावतात पण आतून काहीच उत्तर न आल्याने त्या आत जातात आणि तिथे कुणीच नसतं.
होम्स आणि वॉटसन, ब्रोडस्टेअर्स यांच्या घराची तपासणी करायला आल्यावर त्यांच्या निदर्शनास येतं की या प्रयोगशाळेत एक तळघर आहे जिथे जेम्स ब्रोडस्टेअर्स आपले प्रयोग करीत असत. ब्रोडस्टेअर्स आणि रहिमतसिंह हे दोघेही जीवश्च मित्र. रहिमतसिंह यांच्या दोन राण्या होत्या. मोठ्या राणीचा मुलगा उनाड आणि पैसे उधळणारा होता त्यामुळे महाराजांना काळजी वाटत होती की राज्याचं काय होईल. आणि छोट्या राणीचा मुलगा स्वाभिमानी आणि कर्तबगार होता पण ते त्याला काही मदत करू शकणार नव्हते. त्यामुळे आपल्याजवळ असलेला नौलखा हार छोट्या मुलाच्या वंशाजाकडे पोहचला तर बरं होईल अशी इच्छा महाराजांनी ब्रोडस्टेअर्स कडे केली.
ब्रोडस्टेअर्स ने खूप अभ्यास करून आपल्या प्रयोगशाळेत अशी एक यंत्रणा उभारली की वर्तमानकाळातील माणूस भविष्यकाळात जाऊन परत येऊ शकतो आणि तसेच त्यांनी केले. ब्रोडस्टेअर्स स्वतः ९० वर्ष पुढे जाऊन त्यांनी महाराजांच्या वंशजांना हार देण्याचे कार्य केले. परंतु त्यांच्या यंत्रणेला ९० वर्षे परत भूतकाळात यायला जमले नाही आणि म्हणून ब्रोडस्टेअर्स भविष्यकाळात अडकून राहिले.
ही यंत्रणा होम्सच्या लक्षात आली खरी पण हे प्रकरण तो सोडवू शकला नाही कारण हार तो परत महाराजांना देऊ शकला नाही.