लेखक – जयंत नारळीकर
पुस्तकाचे नाव – यक्षांची देणगी
सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प
शरद आणि सरिता, शरदच्या बालमित्राच्या म्हणजे दीपकच्या घरी अजमेरला आला होता. दीपकला तीन मुलींनंतर पुत्ररत्न लाभला होता त्यासाठी दीपकने आपल्या मुलाचं बारसं आयोजित केलं होतं. बारशाचा सर्व कार्यक्रम आटोपल्यावर शरद आणि दीपक गप्पा मारत बसले होते तेवढ्यात सरिताने शरदला बोलावत म्हटले की, “दीपकच्या आईने तुम्हाला आणि मला बोलावलं आहे.” दीपकच्या आईने शरद आणि सरिताला प्रश्न केला की, तुलाही तीन मुली आहेत मग आता तुझा वंश पुढे चालवण्यासाठी वंशाचा दिवा हवा. सोन्यासारख्या मुलींना पाठचा भाऊ नको का? तू कृष्णानंद स्वामी यांच्याकडे जा, दीपकसुद्धा त्यांच्याकडे गेला होता त्यांच्या प्रसादाने त्याला बघ पुत्रप्राप्ती झाली.” हे ऐकून शरद तिथून त्यांना नमस्कार करून निघून गेला.
या प्रसंगानंतर आपल्या निवासस्थानी गेल्यावर शरद आणि सरिता थोडे अस्वस्थ होते. दोघांनी बागेमध्ये फेऱ्या मारण्याचा निर्णय घेतला. सरितानेच बोलण्यास सुरुवात केली. दांपत्यांना आगाऊच होणाऱ्या बालकाचं लिंग ठरवता येईल अशी शक्यता विज्ञानाला निर्माण करता आली नाही का? हल्ली तू झोपेमध्येसुद्धा काहीतरी बडबड करत असतोस, कित्येक वेळा तंद्रीत असतोस. सरिताच्या अशा बोलण्याने शरद थोडा गोंधळला आणि म्हणाला हल्ली मी एका संशोधन कार्यात आहे आणि तुला ती गोष्ट संगवई की नाही या विचारात आहे. शरदला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे याची सरिताला जाणीव झाली. शरद सांगू लागला…
तुला जीन्स आणि क्रोमोझोम यांच्याबद्दल माहीत आहेच. X आणि Y तऱ्हेचे क्रोमोझोम लिंग ठरवतात. नर XY तर मादी XX
प्रत्यक्ष जीवसृष्टीच्या क्षणी हा निर्णय घेतला जातो आणि त्याप्रमाणे आईच्या गर्भात लिंग ठरवलं जातं. विश्वात स्त्री पुरुषांची संख्या समान असावी या हेतूने निसर्गाने हा नियम बनवला असावा. कारण XX आणि XY या दोन्हीपैकी नवीन अपत्यात कुठला संयोग व्हावा याचं नियंत्रण अजून मानवाला शक्य झालं नाही. पण समजा स्त्री पुरुषाचा संयोग होण्यापूर्वी काही उपायानं पुरुषातल्या X मधल्या स्त्रीच्या X शी जोडी करू दिली नाही तर नववीन जीव हा नक्कीच नर असेल. हे विचार करायला सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात अवघड आहे कारण आपल्या नियमात ढवळाढवळ होऊ नये याकरिता निसर्गाने अडथळे निर्माण केले आहेत. पण दैवयोगाने हे अडथळे पार करून जाण्याची एक गुरुकिल्ली माझ्या हाती लागली आहे. माझ्या प्रयोगशाळेत मी काही प्रयोग करत असताना मला हा शोध लागला. तसा मी प्राण्यांवर करून बघितला पण आता मला माणसांवर हा प्रयोग केल्यावर या शोधाची खात्री पटेल. कोणाच्या हाती हे सूत्र लागू नये म्हणून मी याला नाव दिलं आहे फाईव्ह स्टार पोयजन, दिसायला अगदी पाण्यासारखं.
सरिता हे सर्व ऐकून झाल्यावर शरदला म्हणते की, आपणच हा प्रयोग आपल्यावर करून बघूया. मला मुलगा हवाय म्हणून नाही तर तुझ्या संशोधनाला चालना मिळेल. हे सर्व सांगत असताना त्यांच्यासमोर दीपकचा भाऊ ब्रजेश येऊन त्यांना भेटतो. दीपक आणि सरिता ब्रजेशला मुंबईला आपल्या घरी भेट देण्याचं सांगतात. ब्रजेशही मुंबईला त्यांच्या घरी नक्की येईन असे आश्वासन देतो.
काही महिन्यांनंतर शरदला त्याच्या शोधामुळे पुत्रप्राप्ती होते आणि आपण यात सफल झालो आता हा प्रयोग सर्वाना सांगायला हरकत नाही याचा तो विचार करतो. सरिता विचारते की हे औषध मुलगा होण्यासाठी आहे. मुली होण्यासाठी तू शोध लावला आहेस की नाही. शरदने होकारार्थी मान हलवत सरिताला सांगितलं की ते औषध सुद्धा तयार आहे त्याचं नाव सिक्स स्टार पोयजन. इतक्यात ब्रजेशचा फोन आला. तो मुंबईत आल्याची बातमी देत तो घरी भेट देऊन शरदची प्रयोगशाळा बघून परत अजमेरला जाणार होता.
त्यानंतर शरद प्रयोगशाळेत गेला. आपल्या शोधाचे प्रयोग इतर जोडप्यांवर करून पाहायचे त्याने ठरवले. वीस जोडपी त्यादिवशी हजार होती. शरदने फाईव्ह आणि सिक्स स्टार संदर्भात सर्वाना कल्पना दिली. मात्र सिक्स स्टार घेण्यास एकही जोडपं तयार नव्हतं. शरदला याबद्दल कल्पना होती. ववीसही बायकांना योग्यवेळी फाईव्ह स्टारचे इंजेक्शन देण्यात आले. शरदचे सहकारी म्हणाले की, वीस जणांपैकी सोळा जोडप्याना पुत्रप्राप्ती झाली तरच तुझा शोध मान्य होऊ शकतो. त्यादरम्यान दीपकने शरदला कळवले की, ब्रजेश तुझ्या घरी येऊन अजमेरला येणार होता पण तो अजून आला नाही. आपल्या शोधात व्यस्त असल्याने शरदने ही त्याकडे जास्त लक्ष दिले नाही.
काही महिन्यांनी इतर जोडप्यांवर केलेल्या प्रयोगाचा निकाल लागला. वीस जणांपैकी फक्त दहा जणांना पुत्रप्राप्ती झाली होती. शरदचा शोध पूर्णपणे फसला. आपल्या सहकाऱ्यांत तोंड दाखवायला जागा राहिली नाही. नर्व्हस ब्रेकडाऊन होऊन तो महाबळेश्वरला सरिताबरोबर हवापालट म्हणून निघून गेला. तिथेही तो सारखा आपले फॉर्मुले तपासून बघत होता. हे प्रयोग फसले आणि सरितावर केलेला प्रयोग यशस्वी झाला, असं कसं घडलं? याच विचारात सारखा होता. काही दिवसांनी महाबळेश्वरला असताना शरदला त्याच्या सहकाऱ्याचा, नरेशचा फोन आला, आणि त्याने सांगितले की ज्या जोडप्यांवर त्याने प्रयोग केले होते त्यात निव्वळ पाणी होते. मीसुद्धा तुझी ती फाईव्ह स्टारची बाटली घेऊन तपासली त्यात नुसतं पाणी आहे. हे ऐकून शरदच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा आली. सरिताला त्वरित घेऊन तो मुंबईला निघाला. घरी पोचवून त्याने प्रयोगशाळेचा रस्ता धरला. त्यानेही तपासून बघितले निव्वळ पाण्याव्यतिरिक्त त्या बाटल्यांमध्ये काहीही नव्हते. आपल्या नकळत कुणीतरी प्रयोगशाळेत येऊन या बाटल्या बदललेल्या आहेत. आपण हे औषध पुन्हा तयार करू शकतो आणि प्रयोग करू शकतो. शरदने सर्वाना विचारले तिथे ठेवलेल्या बाटल्यांचे कुणी हात लावला होता का. सर्वानी हेच उत्तर दिले की विष लिहिलं असल्यामुळे कुणीही त्या बाटल्यांना हात लावला नाही.
काही दिवसांनी वर्तमानपत्रात बातमी येते की, उत्तरप्रदेश येथे एक बाबा जोडप्यांना औषध देत आहे. ज्यांना पुत्रप्राप्ती हवी आहे त्यांना तो ते ठराविक औषध देतो आणि त्या जोडप्यास पुत्रप्राप्ती होते. AIIMS ने सुद्धा या विलक्षण बाबाच्या औषधाची तपासणी करण्यास एक पथक पाठवले. परंतु जोडप्यांना पुत्रलाभ झाला हे निश्चित पण बाबा त्या औषधांबद्दल बोलण्यास तयार नाहीत. याची खात्री शरदने केली असता, त्याला संशय आला की आपण केलेला शोध याच बाबाने चोरला आणि दार उत्तरप्रदेशमध्ये तो लोकांना देतोय.
सर्व आवश्यक सामान घेऊन शरद उत्तरप्रदेशमध्ये त्या बाबाजीची भेट घेण्यास गेला. तिथे पोचल्यावर शरदला बाबाची भेट घेण्यास अटकाव करण्यात आला. व्यवस्थापकाला ५० रुपये आणि बाबाला काहीतरी गुप्त पत्र देत शरद बाबाजीची भेट घेण्यात यशस्वी झाला. आश्रमाच्या मागच्या बाजूला असलेल्या खोलीत शरद आणि बाबाजींची भेट झाली. तुम्ही कधीतरी येणार हे मला माहीत होते, वर्तमानपत्र वाचून आलात ना? बाबाजींनी विचारले. बाबाजींनी त्या खोलीत दुसरं कुणी नाही ना, खिडकीतून कुणी बघत तर नाही ना याची खात्री करून शरदला विचारले, पहचाना मुझे? खोट्या दाढीमिश्या काढून ठेवत बाबाजी हसले. ब्रजेश? तू? शरद आश्चर्याने उद्गारला. नकली केस वापरणारा काही मी पहिला बाबा नव्हे, ब्रजेश म्हणाला.
जेव्हा तू आणि सरिता वाहिनी बागेमध्ये बोलत बसला होता आणि तू तिथे तुझ्या शोधाबद्दल सांगत होता तेव्हा मी तिथेच झाडामागे लपून तुमचं बोलणं ऐकत होतो. आणि म्हणून मी तुमच्या घराची आणि प्रयोगशाळेची भेट घेतली. रविवार असल्याने प्रयोगशाळेत कुणीच नव्हते त्यामुळे तिथून मला तुझ्या त्या दोन बाटल्या पळवून नेण्यास यश आले.
तू माझ्या या शोधाचा असा गैरफायदा करून घेतलास? शरद चिडून म्हणाला. शरदभाई मला माफ कर, तुला खूप त्रास झाला, ब्रजेश म्हणाला.
तू म्हणालास की तुझ्याकडे असलेलं फाईव्ह स्टार औषध संपलं. सिक्स स्टारचे काय? शरदने ब्रजेशला कुतूहलाने विचारले. ब्रजेश म्हणाला, त्याचा मला कधी उपयोग झालाच नाही. कारण इतक्या जोडप्यांपैकी कुणालाही कन्यारत्न नको होते. शरद तिथून सुन्न मनाने मुंबईला निघून आला. महिनाभर तो प्रयोगशाळेकडे गेला नाही. त्यानंतर प्रयोगशाळेत जाऊन त्याने सहकाऱ्यांसोबत परत शोधावर प्रयोग केले पण त्यात शरदला रुची नव्हती. त्याचा तो शोध यशस्वी ठरला. वीसपैकी वीस जणांना पुत्ररत्न झाले होते. सरिताने विचारले, तुझा शोध यशस्वी झाला पण तू खुश दिसत नाहीस. शरद म्हणाला, “मी ब्रजेशला भेटून आलो तेव्हाच माझे डोळे उघडले. कुणाही जोडप्यांना कन्यारत्न नकोय. सर्वाना पुत्रप्राप्ती हवी. कल्पना कर जर हा शोध जगजाहीर झाला तर काय परिणाम होतील? मुलांचं प्रमाण भरमसाट वाढेल. मुलींचं प्रमाण कमी. मानवाची पुढची वाढ खुंटेल. यावर कोणी नियंत्रण पण ठेऊ शकणार नाही कारण प्रत्येकजण आपलाच विचार करणार. सर्वाना पुत्रप्राप्ती भावी हीच इच्छा असणार.”
मग पुढे काय करायचं ठरवलं आहेस? सरिताने विचारले. ठरवलं नाही.. करून आलो.. काळ प्रयोगशाळेत जाऊन माझ्या सर्व नोट्स मी जाळून टाकल्या. आता माझ्या डोक्याशिवाय या शोधाबद्दल कुणाला काहीच माहित नाही.