गीत : प्रवीण दवणे
संगीत : नंदू होनप
स्वर : अजित कडकडे
दत्त दत्त नामाचा महिमा
भवसिंधु हा पार कराया अवतरली करुणा ॥धृ.॥
कृष्णामाई वाहे झुळझुळ, दत्त नाम हे घेत मंजुळ
नरसोबाच्या वाडी मधुनी करूया गुरु नमना ॥१॥
औदुंबर हे तेथे जाऊ गुरुरायाला हृदयी पाहू
तीन मुखातून त्रैलोक्यच उजळीतसे नयना ॥२॥
गाणगापुरी वास गुरूचा, भाळी लेऊया गंध उदीचा
धेनु विहरती वत्सलतेने श्वान शरण चरणा ॥३॥
जटा शिरावर रुळती सुंदर, मूर्तिमंत हे तेज मनोहर
सकल चराचर चरणावरती आले रे शरणा ॥४॥