– स्नेहा रानडे / लघुकथा /
दोन दिवस वनिता अस्वस्थ होती. पण त्या अस्वस्थेचे कारण तिला कळत नव्हते. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन म्हणजे तिच्या घरच्यांसाठी celebration चा दिवस.. या दिवशी सगळी बहीण-भांवडे एकत्र येत मजेत गप्पा मारत ओवाळून राखी बांधून घेताना चेष्टामस्करी करत मग वनिताच्या हातचा नारळी भात तीची speciality वर सगळे जण तुटून पडत..
रक्षाबंधन म्हणून तिने लवकरचा गजर लावला. सकाळी लवकर तिला नारळी भात, डांळिंब्यांची उसळ, पोळ्या, सगळा साग्रसंगीत स्वंयपाक करायचा होता..
रात्री वनिताला झोपेत दोन डोळे आणि कानात कुणीतरी नारळाची वडी कर म्हणून सांगत होते.. तिला जाग आली… आज तिला सुरेंद्रची आठवण झाली.. सुरेंद्र वनिताचा मोठा भाऊ ५ वर्षापुर्वी car अपघातामध्ये अचानक देवाघरी गेला त्यामुळे वनिताचा मोठा आधार गेला..
पण तिला उठल्यावर राहून राहून ते डोळे आणि नारळाची वडी कर असा आवाज घुमत होता… मग तिने सगळा स्वंयपाक पटापट उरकला. सगळे नातेवाईक यायला अजून वेळ होता.. का कोण जाणे तिने पटकन अजून नारळ खरवडला आणि वड्यांचा घाट घातला त्यावर तिचा नवरा म्हणाला, “आज एकदम नारळाच्या वड्यांचा घाट कसा काय.. सुरेंद्र ला फार आवडायच्या ना.. ते ऐकताच वनिताच्या डोळ्यात पाणी आलं.” छान वड्या तयार झाल्या होत्या. पण तिने कोणालाही त्या पुढे केल्या नाहीत.. पण मनातील अस्वस्थता थोडी कमी झाली होती.
संध्याकाळी सगळे नातेवाईक गेल्यावर वनिता पटकन म्हणाली, “मी जरा लक्ष्मीनारायण देवळात जाऊन येते.” त्याबरोबर मुलांनी तिला सांगितलं, “अगं आई दमली असशील! बस जरा आराम कर.. उद्या जा देवळात.” पण वनिताला काही राहवेना.. ती पटकन आरतीचं ताट राखी घेऊन तयारच झाली.. तिचा उत्साह बघून नवरा म्हणाला, “चल मी घेऊन जातो तुला गाडीवरून.” वनिता छानशी हसली आणि नवरा तयार होईपर्यत खुर्चीवर टेकली…
ते दोघे देवळात आले वनिताने त्या लक्ष्मीनारायणालाच ओवाळले, राखी ठेवली आणि नारळ्यांच्या वड्या पण ठेवल्या.. आता तिला बरं वाटत होतं, तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं…
तेवढ्यात तिथे एक व्यक्ती बसलेली होती पण त्यांची तब्येत थोडी खालावल्यासारखी वाटत होती. त्या व्यक्तीला चक्कर येत होती BP low झाल्यासारखं वाटत होतं त्वरित गोड काहीतरी खायला हवं होतं. त्या व्यक्तीने वनिताला विचारलं मला काहीतरी गोड मिळेल का जरा गरगरतं आहे.. वनिताने त्या व्यक्तीच्या डोळ्यांत बघितले आणि पटकन आरतीच्या ताटातील नारळाची वडी त्यांच्या हातात दिली.. कुठून तरी पाणी आणून दिले. ते प्यायल्यावर वडी खाल्ल्यावर त्या व्यक्तीला जरा बरे वाटले.. आणि “धन्यवाद ताई” म्हणून तो निघून गेला पण वनिताला ते डोळे ओळखीचे वाटले. त्यातील हास्य तिला आठवत होते..
घरी आल्यावर तिला खूप बरं वाटत होतं.. समाधान झालं होतं..
रात्री लवकर आटपून ती झोपली आणि परत तिच्या कानात आवाज आला “वड्या मस्त झाल्या होत्या वने.. आणि ते हसरे डोळे…. वनिता खाडकन् जागी झाली. तिच्या लक्षात आलं सुरेंद्र गेल्यावर त्याचे नेत्रदान केले होते.. आज तिचं रक्षाबंधन साजरं झालं होतं…