– मानसी अद्वैत बोडस / स्फुट लेखन /
प्रिय शाळा,
तुला कसे संबोधू? कसे बोलू तुझ्याशी? कसे सांगू माझ्या मनातले विचार तुला…???
तुझ्या जवळ असताना सुट्टी मिळावी म्हणून देवाची कितीदा प्रार्थना केली असेन, पण आता कायमची सुट्टी मिळाल्यावर असे वाटतेय पुन्हा यावे तुझ्याबरोबर पि.टी. च्या तासाला प्रांगणात खेळावे, स्पर्धेत भाग घ्यावा, खूप खूप अभ्यास करावा, नवीन इयत्तेत गेल्यावर नवीन दप्तर, पुस्तके यांचा वास घ्यावा… कधी मधी अभ्यास केला नाही की शेवटच्या बाकावर बसावे आणि बाईंची नजर चुकवत असताना नेमके त्यांनी पकडावे आणि आमच्या मनातल्या भावना ओळखून त्यांनी नेहमी सारखे टपलीत मारून म्हणावे, “चल पुढच्यावेळी आण करून आणि दाखव” किवा उशीर झाला म्हणून एक पट्टी मारावी हातावर…
तूला माहितेय आई बाबा यांच्यानंतर शिस्त, आदर आणि प्रेम शिकवणारी अभ्यासाचे महत्व समजावणारी आणि कायम स्वरूपी आमच्या स्मृती पटलावर कोरली जाणारी एकमेव गोष्ट म्हणजे ‘शाळा’..
आता जाणवते तुझ्यापासून दूर जाऊन आम्ही काय गमावले आणि तुझ्याबरोबर असताना काय कमावले…
मला माहितेय तुझे प्रेम आणि आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी आहेत… तू केलेल्या संस्कारांना आम्ही कधीही विसरू शकणार नाही…
तुझी एक विद्यार्थिनी,
मानसी अद्वैत बोडस (पूर्वाश्रमीची : मानसी प्रभाकर केतकर)
मानसीअद्वैत #MansiAdvait