– प्राची गोंडचवर / कविता /
माझ्याकडे मणभर अंधार आणि कणभर चांदणं…
कल्पनांचं माजघर आणि तेवढ्यातच नांदणं…
पडवीत खस्ता खाल्लेल्या आयुष्याच्या चपला…
परसात आशेचा पारिजात तगमगून जपला…
एक पायली-सोडवलेलं स्वातंत्र्य मोजायला…
एक सूप-त्यातलं रोमांच पाखडायला…
देवघर रिकामं कारण देव निघून गेलेला..
थिजलेलं मन आणि आठवांचा शेला…
जात्याच्या पोटात माझी इवली इवली स्वप्नं…
भरडलेलं काळीज आणि मोरपंखी दुखणं!
सौख्याची मंजिरी फुललीच नाही अंगणात…
चिंतेची लगीनघाई आणि द्वंद्वांचा सारीपाट…
खुंटीवर अस्सलपणाची टांगलेली लाज!
अनुभवांच्या नभाखाली शहाणपणाची बाज…
विरलेल्या नात्यांची पांघरायला गोधडी…
दिव्याखाली अंधार आणि तोरणंही बेगडी…
कुंपणाशी आयुष्याची झालेली माती!
पुन्हा येईन रुजून मी भेगाळून छाती!!
From the diary of π – प्राची गोंडचवर
Advertisement