– स्नेहा मनिष रानडे / कविता
यावर्षी वारी नाही म्हणून
मन सगळ्यांच चुकचुकलं
पण विठूरायाचं दर्शन
सगळ्यांनाच झालं…
कोणाला तो पोलिस, डॉक्टरमध्ये दिसला
शेतकऱ्याबरोबर शेतात राबताना दिसला
मला मात्र विठूराया बापामध्येच दिसला…
कमरेवर हात ठेवून बाप पण म्हणला
न घाबरता कर संकटाचा सामना
त्यामुळे मला मात्र विठूराया बापामध्येच दिसला…
मुलांबरोबर तो घरात क्रिकेट देखील खेळला
स्वतःच्या अभ्यासाची उजळणी करत मुलांबरोबर शिकला
त्यामुळे मला मात्र विठूराया बापामध्येच दिसला…
बावरलेल्या घरच्यांना धीर त्याने दिला
एकनाथांच्या श्रीखंड्याप्रमाणं घरात मदतीचा हात पुढे केला
त्यामुळे मला मात्र विठूराया बापामध्येच दिसला…
वारी नाही म्हणून नाराज नाही झाला
प्रेमाने आपल्याच बापाच्या गालावरून हात त्याने फिरवला
त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य बघुन मनोमनी सुखावला
त्यामुळे मला मात्र विठूराया बापामध्येच दिसला…