- स्नेहा मनिष रानडे / ललित लेख /
चतुरंग च्या पुरवणीत मॅनेजमेंट गुरु या लेखातील ‘लक्ष्मीबाई’ हे व्यक्तिमत्त्व वाचताना डोळ्यासमोर उभी राहिली ती आपली आजी, कै. लक्ष्मीबाई अनंत फडके.
प्रथम पाहण्याऱ्याच्या मनात कर्तबगार, करारी आणि देखणे व्यक्तिमत्त्व म्हणूनच भावना उत्पन्न होतील. होतीच माझी आजी सुंदर, गोरीपान, घारे डोळे असणारी, कानात डाळिंबी माणकाच्या कुड्या घालणारी, चापूनचोपून नऊवारी साडी नेसणारी, फडके घराची शान होती. आजीचे व्यक्तिमत्त्व जितके देखणे आणि रूपवान तितकी कर्तबगारी ही कमालीची होती. वयाच्या 47 व्या वर्षी आजोबा गेल्यावर धडाडीने कुठेही न डगमगता मुलांना सोबतीला घेऊन प्रेस तीच सांभाळू शकली. प्रत्येक नवीन गोष्ट सचोटीने हाताळण्याची तिच्याकडे कला होती. नवीन गोष्टी शिकून प्रेस मधे काकांना व बाबांना मार्गदर्शन करणारी होती ती आजीच.
आजीच्या हाताला चव ही खुप सुंदर होती. कोणताही पदार्थ ती अगदी लीलया करत असे. तिच्या हातचा साखरभात म्हणजे अवर्णनीयच. अजूनही त्या साखरभाताची चव मनात व जिभेवर रेंगाळतेय. तिला पत्ते खेळायला खूप आवडायचे. लॅडीज खेळताना ती कोणाकडे कोणते पत्ते असतील याचा बरोबर अंदाज बांधायची. ते रूप वेगळेच भासायचे. इयत्ता पाचवी शिकलेली ही आजी दरवाजात बसून महाराष्ट टाईम्स पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत start to end वाचायची आणि पेपरमधील बातम्यांवर चर्चा करून आपली मते ठणकावून सांगायची. क्रिकेट विषयावर ती बोलायची. मराठी चित्रपट बघणेे हा छंद होता. सातच्या मराठी बातम्या हा तिचा weak point होता .
हीच आजी दादा काकाचे पुस्तक प्रकाशित होताना, माधवकाकांचे कामाचा झपाटा सांगताना, नंदा आत्याच्या वाडीतील मेहनतीचे वर्णन करताना, मालन आत्याच्या दुबई वर्णनाचे, बाबांच्या कामाचं कौतुक करताना थकायची नाही. त्याचबरोबर आई निवडणुकीला उभी राहिली, तिला प्रोत्साहन देणारी, मतदानाला जाणारी, निवडून आल्यावर कौतुकाने पेढा भरवणारी आजी हे एक वेगळेच रसायन होते.
संध्याकाळी ५ वाजता प्रेस बंद झाल्यावर बाहेरच्या ओटीवर बसून येणाऱ्याजाणाऱ्याची विचारपूस करायची. फोन घेणे, महत्वाचे काम असेल ते लिहून घेणे नंतर काकांना बाबांना सांगणे हे तीच करु जाणे. मात्र सात वाजले की बाहेरचा दरवाजा बंद केल्यावर आम्ही म्हणायचो “गडाचे दरवाजे बंद झाले”, त्यावेळी ती गालातल्या गालात हसायची. गणपतीच्या १० दिवसांत होणाऱ्या गोड पदार्थांत कोणाला स्वयंपाक घरात, कोणाला माजघरात, कोणाला ओटीवर चार वेगळे पदार्थ देणे हे आजीच करू जाणे.
आजीच्या काळ्या कपटातील खाऊ आणि वस्तु हा आमच्यासाठी चर्चेचाच विषय असे. कधी त्या कपाटातून काजू मनुका खजूर निघत असे त्यावेळी आमच्या आनंदाला उधाण येत असे. त्या कपाटाला फक्त आजीच हात लावत असे. त्यात पत्त्याचे कॅट नीट लावून ठेवलेल्या साड्या आणि अजून काय काय असे. अलिबाबाची गुहाच जणू. त्या गुहेत डोकावून पहाण्याची हौस आम्हाला असायची. एकटी घर सांभाळणारी, एकटी दुबईला जाणारी ही आमची आजी. कानातले माणकाचे कुडं हरवल्यावर मात्र एकदम हळवी झाली होती, बेचैन झाली होती. संपूर्ण घर त्यावेळी ते कुडे शोधत होतं कारण मोकळे कान बघायची सवयच नव्हती आणि त्यातल्याच एका कुडीची अंगठी बनवल्यावर आजीला झालेला आनंद वेगळाच दिसत होता तिच्यावर चेहऱ्यावर.
आठवणी तर खूप आहेत पण काय लिहायचे कसे लिहायचे हेच कळत नसल्यामुळे इथेच थांबते.