– सविता टिळक / कविता /
नाते कुठले ठरते मोठे?
जे बनते रक्ताच्या संबंधाने…
की जुळते प्रेमाच्या रेशीम बंधांनी…
मोल ठरते मोठे कशाचे?
सहवासातून वाटू लागलेल्या लळ्याचे…
की भेटींविनाही मनात रुजलेल्या जिव्हाळ्याचे…?
नात्यातलं प्रेम वसतं वय, मान, अपेक्षांच्या मर्यादशील चौकटीत
फुलतं नातं प्रेमाचं, माळावर स्वच्छंद झुलणाऱ्या गवतफुलासम निरागस आनंदात
असतील जर नात्यांनाही रंग आणि गंध…
असेल का नात्यातल्या प्रेमाचा रंग लाल?
ठेवा भावव्यक्तीत सावध, उत्कटता असे सुचवणारा
आणि प्रेमाच्या नात्याला असेल गर्द हिरव्या रंगाचा गारवा, मनाला सुखावणारा…
असेल का नात्यातल्या प्रेमाला गंध…
क्षणकाल दरवळणाऱ्या
उंची अत्तराच्या फवाऱ्याचा?
भरून राही क्षणिक, गंध ज्याचा आसमंती
आणि प्रेमाच्या नात्याचा गंध असेल का
वर्षोनवर्षं जपलेल्या कुपीतल्या अमूल्य अत्तराचा?
ज्याच्या सुगंधाच्या स्मृती मनात अखंड रुंजी घालती…
गुंते नात्यातलं प्रेम देण्या-घेण्याच्या व्यवहारात
प्रेमातलं नातं खुलतं निरपेक्ष मुक्तबंधांत…
होईल जर नात्यातलं प्रेम निर्मोही।
नात्यातलं प्रेम आणि प्रेमाचं नातं ही संपून जाईल दुही।