- मानसी उपेंद्र वैद्य / कविता /
छान सुंदर निसर्गातल्या सुंदर रमणीय स्थळी,
जन्मले, वाढले अन् बागडले मनमोकळी.
बाल्य सरले, तारुण्याने बहरले, अंगांगी मोहरले,
भेटता सखा, मनासारखे सारे घडले.
सभोवताल सारे जणू स्वर्गासारखे भासू लागले,
सुखाच्या सरीत प्रियकराने नखशिखांत भिजवले.
मिलनाची साक्ष आमच्या, प्रेमाचे ते प्रतिक,
वाढू लागले दिवस मासी माझ्या कुशीत.
आनंदाच्या शिखरावर होतो आम्ही दोघे,
नियतीला मात्र नामंजूर होते हे सारे.
सर्व सुखद असूनही का वाटावे मला असे,
काहीतरी वेगळे हवे म्हणून इथून जावे असे.
अधिवासाच्या सर्व सीमा पार करुनी,
पोहोचले मानवाच्या जगामध्ये.
एक भेटला मनुष्यप्राणी, दुजा नुसताच बघे,
आणखी एकाला आले प्रेमाचे उमाळे.
समोर ठेवून माझ्यापुढे खाणे अन् पिणे,
मला वाटले आहे सुंदर इथले जिणे.
खाऊ घालता प्रेमाने मीही खाल्ले आनंदाने,
हाय पण घात झाला, होत्याचे नव्हते झाले.
मुख अन् सारे शरीर कल्लोळले,
जिवंतपणी मरणयातना काय ते कळले.
कसा ठेवावा कोणावरही आंधळा विश्वास,
ज्याच्यावर ठेवला त्याने हिरावला
माझा अन् माझ्या न जन्मलेल्या बाळाचा श्वास.
सांगाल का हो कुणी माझे काय चुकले?
नवीन पाहण्याची आस भारी पडली
जन्मण्यआधी गेलं माझे बाळ बळी.
चूक कोणाची, शिक्षा कोणाला,
हा विचार व्यर्थ आहे.
आता लवकरच माझा अंत आहे.
रे मानवा नको दाखवू इतके क्रौर्य,
जमलेच कधी तर दाखव तुझे शौर्य.
एवढेच सांगते यापुढे कोणीही मानव,
नव्हें नव्हें हे तर क्रूर दानव,
विश्वासाला अजिबात पात्र नाही.
ह्याच मानवावर मी विश्वासले
आणि तिथेच माझे चुकले.