– तेजस सतिश वेदक
कर्रर्रर्रर्र…… असा आवाज झाला आणि डोळे उघडले.. सकाळचे साडे पाच झाले होते, आज अजून थोडं बिछान्यावर लोळत पडावं असं वाटत होतं. पण माझ्या नशिबी ते होणार नाही हे माहित होतं. कारण मी तर एक शिक्षण असूनही साधी गृहिणी असल्याने पदरी पडेल ते आपलं हेच मानलं त्यामुळे दिवसाचा रहाटगाडे ओढणे हे हात बघून सांगणारा ज्योतिषी ही बदलू शकत नव्हता.. आणि आज त्यात रविवार..म्हणजे दोन काम जास्त वाढणार इतर रविवार प्रमाणे हे मात्र विधिलिखित असावं… कारण ते माझ्या आजीपासून आईपर्यंत आणि आईकडून माझ्यापर्यंतचा प्रवास अगदी न चुकता करत आलेला आहे.. आजही तेच नेहमी प्रमाणे सकाळचे कार्यक्रम आटोपले अंघोळ, देवपूजा, ह्या दोन गोष्टी झाल्या आणि नाश्त्याला काय बनवू… असे विचार करता घराचे न छापलेले मेनू कार्ड डोळ्यासमोर आले. रविवारी मोजकेच ठरलेले पदार्थ करण्याचा बेत आखला होता, म्हणजे कसे थोडा तेवढंच आराम. आराम असं वाटलं पण घरातील कुकला आलेल्या फर्माईशी काही थांबल्या नाहीत.. त्यामुळे नऊला मिळणारा नाश्त्याचा ठोका नेमका चुकला, एका कामाला उशीर झाला की पुढच्या कामाला उशीर होणार हे पोरांना आणि नवऱ्याला कुठे कळणार सर्वांचा नाश्ता झाला आणि जरा उसासा टाकून निवांत बसली होती.
जरा मोबाईल घेऊन मी मैत्रिणीचे मेसेज वाचत होती.. तेवढ्यात मुलाला पाणी लागले आणि ह्यांनी तर मोठी ओर्डर सोडली जरा एक फक्कड चहा करतेस का?
नाही बोलायचं तर खूप मन होतं पण काय करणार म्हणून एक चहा आणि एक ग्लास पाणी नेऊन दिले, हे तर ते स्वतःहून करूच शकत होते…नाही जमत असं काहीच नसतं, आम्हा बायकांना थोडी जमत होतं आम्ही पण शिकलो ना. ह्या सर्वांच्या नादात माझा मोबाईल आणि त्यातील मेसेज तसेच अनरीड राहिले माझयासारखे… आणि मी पुन्हा जेवणाच्या कामाला सज्ज झाली..
त्यात आजचा रविवार म्हणजे साधा नव्हता आज संपूर्ण भारत बंद जाहीर केला होता त्या कोरोना नावाच्या प्रादुर्भावामुळे.. त्यामुळे कुठे जायची सोय नव्हती मुलं आणि आमचे हे पण घरीच होते.. मदतीच्या हाताची अपेक्षा करत होते. पण काही उपयोग नव्हता.. कारण एकाचे दोन आणि दोनाचे चार काम कधी वाढतील नाही समजणार… त्यापेक्षा न सांगितले तर बरं अस बोलताच हाताला नुसता अचानक फेस आला काय झालं कुणाचं ठाऊक नंतर लक्षात आलं की ह्या विचारात भांड्यांच्या साबणाने भलताच जोर पकडला होता, भांडी घासणे हा पारंपरिक सण म्हणून आपण घोषित करूच शकतो, कारण आताच मी नाश्त्याची भांडी घासते आहे दुपारी जेवणाची आणि संध्याकाळी चहाची आणि रात्री परत आहेतच तेच सोपस्कार.. जादूचे बेसिन असल्यासारखे वाटले मला नुसती भांडी आणि जादूच्या पाण्यातून बुडबुडे यावेत तसा तो फेस … एवढी कामं बघून तर आता माझ्या तोंडाला फेस यायचा बाकी राहिला होता..
प्रचंड राग मनस्ताप ह्यात जेवणाचा बेत रागात का होईना उत्तम झाला होता… रविवार असल्याने मटण चिकन तर हवेच त्याशिवाय थोडी होतो रविवार पूर्ण ज्याने कोणी ही प्रथा चालू केली त्याने त्यावेळी सांगायला हवे होते चिकन आणून देणे फक्त चालणार नाही पुरुष मंडळींनी पण जरा मदतीला हातभार लावावे…निदान त्यानिमित्ताने का होईना मदत मिळालीच असती.. ह्या विचारानेच एवढी खुश झाली की पुन्हा कामाला जोर आला आणि भांडी घासायला सुरवात केली.
साफ करून जरा बिछान्यावर आडवी पडले डोळा नशिबाने लागला आणि मी स्वप्नात रंगून गेली.. काय छान स्वप्न होतं, आम्ही तिघेही स्वयंपाकघरात काम करत होतो, अद्भुत दृश्य होतं ते.. आमचे हे भांडी घासत आहेत, मुलगा भाजी चिरतोय, मी जेवण करत आहे.. आता स्वप्नात कॅमेरा असता ना तर एक फोटोच काढला असता काय गंमत झाली असती. तेवढ्यातच दाराची बेल वाजली होती स्वप्नात नाही अहो खरी बेल वाजली, अर्ध्यातासाची व झोप पण खूप आनंद देऊन गेली. दरवाजा उघडला आणि समोर पोस्टमन पत्र घेऊन उभा होता.. पत्र बाजूला ठेवलं आणि मी कामाला लागली.. संध्याकाळही तशीच गेली रात्री जेवण आणि भांडी आवरून अकरा वाजले होते .. बिछान्यावर पडली आणि सकाळी ठेवलेला मोबाईल आता पुन्हा चाळायला सुरवात केली… त्यात मैत्रिणीचा मॅसेज बघून मनात तीव्र राग आणि युद्ध सुरू झाले.. त्यात मॅसेज असा होता की, Today Ashok (म्हणजे तिचा नवरा) made dinner for me and it was amazing… आणि त्या बरोबर ४-५ फोटो खरं तर ती डोक्यात गेली होती माझ्या पण काहीतरी शिकवून गेली..
ग्रुपमध्ये पाठवल्याने इतर मैत्रिणी ही त्रासल्या होत्या.. काहींनी तर त्याच्या नवऱ्याने काही काम केले ह्याचे ही फोटो पाठवले होते.. त्यातले बरेच फोटो हे दाखवण्यापुरते होते. माझ्या कडे असे काहीच नव्हते पाठवण्यासारखे आणि सांगण्यासारखे..
काय सांगणार सकाळी चिकन आणून दिलं आणि मोबाईल गिरवला, पेपर वाचला.. हेच डोक्यात ठेऊन मी डोळे बंद केले..आणि विचार करू लागले.. की तिच्या नवऱ्याने केले म्हणून मी माझ्या नवऱ्याला सांगावं असं नाही पण घरी राबणारी एकटी स्त्री ही पूरक असली तरी तिला ही मदतीची गरज आहे. ती ही थकते. हे बघून मी सर्व फोटो दुसऱ्या दिवशी माधवला म्हणजेच माझ्या नवऱ्याला दाखविले आणि कसे दुसरे नवरे मदत करतात हे दर्शविले.
असेच एकामागून एक दिवस गेले आणि एके दिवशी संध्याकाळी बातम्यांवर सांगण्यात आले की पुढचे एकवीस दिवस भारत असाच बंद राहील फक्त गरजेच्या गोष्टी मिळतील.. हे ऐकताच मनाचा थारा गेला आणि मागचा रविवार पुन्हा डोळ्यासमोर आला, तो मैत्रिणीचा मेसेज, ते फोटो सर्व काही एका जलद ट्रेन सारखं गेलं आणि मी स्तब्ध होऊन विचार करत चालत होते आणि माझी नजर परवा आलेल्या त्या पत्रावर पडली, ते पत्र सासू सासऱ्यांचे होते आणि तेवढ्यात लँडलाईन वर फोन आला तो आमच्या ह्यांनी उचलला आणि मी पत्र वाचत होती. पत्रात असे लिहले होते की, येत्या गुढीपाडव्यासाठी आम्ही दोघे येत आहोत घेण्यासाठी येणे आणि फोन पण त्यासाठीच होता की आम्ही पोहचलो आहोत घ्यायला ये…
कोरोनाच सोडा पण घरात येणार संकट मला उद्यापासून घरात दिसणार हे कळून चुकलं होत. आता एकतर मला आजारी पडायचं नाटक करावे लागेल किंवा ग्लुकोजचे एक सलाईन लावून तरी तठस्त उभं रहावं लागेल हे नक्कीच…
असेच दिवसामागून दिवस निघून गेले पण बंद काही संपला नाही अजूनच वाढला आणि हे अजून सहन करणं शक्य नाही.. मनाशी निश्चय करून सासूबाईंशी बोलणं गरजेचं होतं किंवा स्वतःहून निर्णय घेणं.. थोडा वेळ थांबून मीच माझा निर्णय घेतला आणि सर्वांना एकत्र बोलवले. आता कुठे हे सर्व करते? जेवण वाढ आपण नंतर काय ती सामूहिक सभा घेऊच असे बोलून बहुतेक करून सर्वांनी माझी मस्करीच केली पण माझा निर्णय झाला होता.
कविता(गृहिणी): एकटे जेवण बनवण्याचा आजचा हा माझा शेवटचा दिवस!
माधव( कविताचा नवरा): काय? हे काय बडबडते आहेस?
कविता(गृहिणी): बरोबर बोलत आहे, नांगराला जुंपल्यासारखं दिवसभर राबायचं. कशाची मुळी मदत नाही, माझ्यात आणि घरकाम करणाऱ्यात काय फरक उरला आहे सांगा?
माधव( कविताचा नवरा): मी पण तर काम करतोच की, भाजी आणून देणं किराणा आणून देणं. मदत तर होते ना?
कविता(गृहिणी): होते ना मदत! पण ती मदत आठवड्यातून एकदा किंवा दोनदा! बाकी ? कुठे जेवण करा, भांडी घासा, जागा पुसा, केर काढा, भाजी निवडा, देवाची पूजा, खिडक्या कपाटे साफ करा, हे कुठे आहे त्यात? हे सर्व मी करते, ते पण तुम्हाला वेळेवर जेवण देऊन.
माधव(कविताचा नवरा): अगं पण तू घरीच असतेस, आणि तुला हे जमतं म्हणून
कविता(गृहिणी): तुम्ही ही घरीच आहात सध्या, तुम्ही ही सुरवात केली की जमेल हळूहळू. मी पण काही गोष्टी इथे येऊनच शिकली
सासू: अग त्याला नाही जमणार, त्याने नाही केलीत अशी कामे,
कविता(गृहिणी): मग आता करेल, तुम्ही तुमच्यावेळीच त्याला तुम्हाला मदत करायला सांगितली असती तर आज असे झाले नसते.
उद्यापासून प्रत्येकाला आपापली कामे वाटून दिले जाईल, आणि हे पक्क झालं आहे
सासरे: मला हे पटत आहे मी सहमत आहे
सासू: अहो!!!
कविता(गृहिणी): जेवणाचे कक्ष माझ्याकडे राहील, नेहमी प्रमाणे आई तुम्ही भाजी निवडून किंवा चिरून द्याल, बाबा देवाची पूजा आणि त्याची तयारी , माधव तू केर काढणे लादी पुसणे दूध आणि इतर किरकोळ गोष्टी बघशील..
यश आणि जय तुम्ही भांडी घासणे आणि रात्री बिछाना घालणे
आपापली भांडी त्याचवेळी घासली तर भांड्यांचा ढीग पडणार नाही आणि काम कमी होईल..
यश आणि जय(कविता ची मुले): पण पण आई… भांडी काय घासायची मला नाही आवडत! मित्र काय म्हणतील? हसतील ती आमच्यावर
कविता(गृहिणी): का काय झालं त्यात .. आमच्यावर पण हसत असतीलच की मैत्रिणी.. मग आम्ही कामं सोडून देऊ? तुम्हाला नसेल जमणार तर बाबा करतील ते काम.
माधव( कविताचा नवरा): छे छे… मी तर यश आणि जयशी सहमत आहे..
मलाही नाही जमणार..
कविता(गृहिणी): का? मग ठीक आहे जेवणाचं पण बाहेरच बघा कुठे होत असेल तर. तुम्हा पुरुषाचं एक बरं आहे बायकी काम केली तर मित्र काय म्हणतील म्हणून विचार करतील आणि हजार कारणं देतील, पण जिला दुसऱ्याच्या घरून आपण आणली आहे जी सात वचने देऊन तिला विश्वास दिला आहे त्या वचनातील सहकार्याच काय? कुठे गेलं ते सहकार्य?
सासू: तुला आमचा त्रास होत आहे का?
कविता(गृहिणी): नाही तर, मला का त्रास होईल, पण प्रत्येकाला जाणीव होणं गरजेचं आहे म्हणून मी बोलले, जबाबदारी ही फक्त एकाची नाही तर सर्वांची असायला हवी. माधव ने मदत केली तर यश आणि जय मदत करतील मला आणि पुढे त्यांच्या बायकांना… आणि हे पुढे असच चालले तर कोणतीही स्त्री स्वयंपाकघरात एकटी पडणार नाही.
आणि हो मी नोकरी करायचा ही विचार केला आहे. आणि तेव्हाचे नियम वेगळे असतील.
आज मला काय झालं काहीच कळलं नाही. अंगात आलेली ताकद ही कोणतीतरी दैवी शक्ती असावी असा अंदाज आहे.. त्या ४-५ फोटोची काय जादू होती की सर्व चित्र घरात बदलून गेलं आणि मी पुन्हा विचारात डुबली
माधव( कविताचा नवरा): कविता.. अगं ए.. कविता, लक्ष कुठे आहे, मग आता जेवणाचं काय ?
कविता(गृहिणी): हा हा हा…. आत्तापुरतं आहे जेवण. हे नियम उद्यापासूनचे आहेत.
तेवढ्यातच आमच्या चाळीतील ग्रुपमध्ये एका काकूने आपल्या नवऱ्याने आपल्यासाठी कसे आणि काय जेवण बनवले हे सांगून पुन्हा तेच फॉर्व्हडेड ४-५ फोटो पाठवले…जे मैत्रिणीने केले होते. आणि तोच एक मनात हशा फुटला.. कारण ते ४-५पदार्थ कोणतेही असो किंवा कोणीपण बनवलेले असो पण त्यामुळे होणारा बदल हा उद्यापासून माझ्या घरात घडणार होता हे नक्कीच..