‘लोकहितवादी’ गोपाळ हरी देशमुख

प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने लेखन करणारे इतिहासकार, पत्रकार, समाजसुधारक गोपाळ हरी देशमुख. लोकहितवादींनी समाजहिताला प्राधान्य देऊन सर्वांगीण सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठीचा आग्रह धरला होता.आपल्या समाजातील दोषांवर त्यांनी टीका केली समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा दूर करून सर्वांगीण सामाजिक प्रगतीचा विचार सर्वांनी केला पाहिजे समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्वतःची उन्नती साधावी. अंधश्रद्धा भोळ्या समजुती व संकुचित विचार यांचा त्याग करावा असे ते सांगत.

भारतीय समाजातील जातीव्यवस्था ही समाजाच्या अधोगतीला कारणीभूत झालेली आहे असे त्यांचे मत होते. म्हणून त्यांचा जातीव्यवस्था, वर्णभेद याला विरोध होता. उच्चवर्णीयांनी आपल्या वर्णश्रेष्ठत्वाच्या कल्पनांचा त्याग करून देशहितासाठी नव्या आचार विचारांचा अंगीकार करावा असे त्यांनी म्हटले होते. लोकहितवादींनी बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्वाची पद्धती, अशा अनिष्ट प्रथांवर टीका केली. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळाले पाहिजेत. त्यांना शिक्षण व विवाह याबाबत स्वातंत्र्य असावे विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार असावा, असे विचार त्यांनी स्पष्टपणे मांडले होते. सुधारणावादाचा विचार मांडणारे आणि स्वकियांवर प्रखरपणे टीका करणारे, त्यांचे दोष त्यांच्या लक्षात आणून देणारे तत्कालीन सुधारकामध्ये महत्त्वाचे सुधारक म्हणजे गोपाळ हरी देशमुख हे होत.

समाजाची उन्नती झाली पाहिजे आणि त्यासाठी संघटितपणे सर्वांनी प्रयत्न करावेत असे त्यांना वाटत होते. शिक्षण हे त्यासाठी महत्त्वाचे माध्यम असले पाहिजे, सामाजिक भेद दूर करून समाजामध्ये ऐक्य निर्माण व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आपल्या लिखाणातून त्यांनी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या भागांमध्ये सरकारी अधिकारी म्हणून ते गेले, त्या भागांमध्ये त्यांनी ग्रंथालय चळवळीला चालना आणि प्रेरणा दिली. तत्कालीन सनातनी समाजाला उद्बोधन करताना त्यांनी समाजाची करीला गरज लक्षात आणून दिली अशा या सामाजिक सुधारणेच्या काळामध्ये लोकहितवादींनी समाजाला योग्य दिशा देण्याचं कार्य केलं.

प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने यांनी समाजसुधारणाविषयक शतपत्रे लिहिली. भाऊ महाजन उर्फ गोविंद विठ्ठल कुंटे हे ‘प्रभाकर’ साप्ताहिकाचे संपादक होते. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका ‘शतपत्रांचा इत्यर्थ‘ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. मुळात संख्येने १०० असलेल्या या निबंधांत त्यांनी ‘संस्कृतविद्या‘, पुनर्विवाह‘, पंडितांची योग्यता‘, ‘खरा धर्म करण्याची आवश्यकता‘, ‘पुनर्विवाह आदी सुधारणा‘ ही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली. हेच निबंध लोकहितवादींची शतपत्रे नावाने ओळखले जातात. या शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाजसुधारणाविषयक विचार समाजासमोर मांडले. ही शतपत्रे प्रभाकर या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, वाङ्मयीन, ऐतिहासिक इत्यादी विषयांवर त्यांनी लहानमोठे असे सुमारे ३९ ग्रंथ लिहिले, दोन नियतकालिके चालविली, आणि ज्ञानप्रकाश व इंदुप्रकाश ही नियतकालिके काढण्याच्या कामी पुढाकार घेतला.

लोकहितवादींनी अनेक उत्कृष्ट इंग्रजी ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले. त्यांच्या लेखनातून लोकांच्या सर्वांगीण उन्नतीची तळमळ दिसून येते. जातिसंस्था हा देशाच्या उन्नती होण्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या लेखनातून केले. लोकहितवादी हे एकोणिसाव्याशतकाच्या पूर्वाधातील,म्हणजे रानडेपूर्व पिढीतील हिंदुस्थानातील अर्थशास्त्रज्ञ होते. मराठीतून लेखन करणारेही ते पहिलेच अर्थतज्ञ. ‘लक्ष्मीज्ञान‘ या ग्रंथाद्वारे त्यांनी अ‍ॅडम स्मिथ‘प्रणीत अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले. “मातृभाषेतून शिक्षण” या तत्त्वाचाही त्यांनी प्रसार केला.

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!